---------------------------------------------------------------
भारतामध्ये महिलांवर आजही अत्याचार होत आहेत. महिला एकजुटीने राहिल्यास त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्या मुकाबला करू शकतात. कोव्हीडच्या संकट काळात परीचारीकांनी रुग्णांची चांगली सेवा केली. सर्वच क्षेत्रात महिला आज आघाडीवर आहेत. महिलांनी आता स्वतःची सुरक्षा स्वतःच केली पाहिजे. असे स्पष्ट उदगार ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस.के शेट्ये यांनी जागतिक महिला मेळाव्यात काढले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने ८ मार्च २०२१ रोजी वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलच्या सभागृहात जागतिक महिला दिन संपन्न झाला. याप्रसंगी युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, कोव्हीडच्या संकट काळात डॉक्टर, सिस्टर, मेडिकल स्टाफ यांनी रुग्णांची चांगली सेवा केली. आज सर्वच क्षेत्रात महिला अग्रस्थानी आहेत, परंतु अजूनही महिलांचे पूर्णपने सबलीकरण झाले नाही. महिलांवर अत्याचार व बलात्काराचे प्रमाण वाढत चालले आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महिलांनी आवाज उठविला पाहिजे. मुंबई पोर्ट तृस्टचे रुग्णालय डी. वाय. पाटील रुग्णालयाला हस्तांतर करण्यास आम्ही दोन्ही कामगार विश्वस्तानी बोर्ड मीटिंगमध्ये कडाडून विरोध केला आहे, मात्र हस्तांतर झाल्यास नोकरीत असलेले कामगार व निवृत्तीवेतनधारक यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा बाबत 18 ऑक्टोबर 2019 रोजी औद्योगिक कलह कायदा 1947 च्या कलम 12/ 3/ सी नुसार मुंबई पोर्ट ट्रस्ट व डी. वाय. पाटील बरोबर कायदेशीर करार केला आहे. तेंव्हा कामगारांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. कोव्हीड काळात अनेक संकटे असताना शीला भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला दिन साजरा करण्यास पुढाकार घेतला, त्याबदल त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार. महिलांनी आपली एकजूट अशीच कांयम ठेवावी.
याप्रसंगी युनियनचे प्रसिद्धिप्रमुख व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, डॉ.आरती उगावकर, मेट्रन श्रीमती शुक्ल, सिस्टर श्रद्धा साळगावकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छापर भाषणे केली. युनियनच्या कार्यकर्त्या व महाराष्ट्र हिंद मजदूर सभेच्या महिला नेत्या श्रीमती शीला भगत यांनी सभेचे सूत्र संचालन केले तर श्रीमती मनीषा डोंगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महिलांची उपस्थिती चांगली होती.
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन.

COMMENTS