सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी
स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असलेला देशभरातील प्रामुख्याने अठरा राज्यात बंजारा समाज पहायला मिळतो.महाराष्ट्रात बंजारा समाज विदर्भ,मराठवाडा, खांदेश या विभागात मोठ्याप्रमाणावर आहे.तर मुंबई लगत विशेषतःठाणे,पालघर यासह पुण्यात देखील आढळून येतो.शिक्षण,शेती बरोबरच या समाजात राजकीय जागृतीचे प्रमाण देखील वाढते आहे. आजवर या समाजाने महाराष्ट्राला दोन कर्तबगार मुख्यमंत्री दिले. ज्यात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महानायक वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईकांचा उल्लेख होतो.आजवर बंजारा समाज हा कांग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा.परंतु कॉंग्रेसच्या प्रदेश नेतृत्वास आपल्याच या बालेकिल्ल्याचे योग्य जतन करता आले नसल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसून आले.२०१९ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत एकाही जागेवर उमेदवारी दिली जात नसल्याने समाजात नाराजी होती मात्र शिवसेनेचे विदर्भातील तडफदार नेते संजय राठोड यांनी बंजारा समाजात आपली पकड मजबूत केली.त्यामुळे शिवसेना पक्षाला बंजारा समाजासारखा एक मोठा समाज आपल्या बाजुस करण्यात जे काही यश मिळाले त्यात माजी खा.तथा तत्कालीन विधानपरिषद सदस्य आ. हरिभाऊ राठोड यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.ते यश शिवसेना किती काळ टिकवून ठेवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोडांच्या राजीनाम्यामुळे बंजारा समाजात प्रचंड खदखद व अस्वस्थता निर्माण झाली आहे.'बंजारा समाजाचे नेतृत्व संपविण्याचे खुप मोठे षडयंत्र रचले गेले आहे'.अशी उद्विग्न प्रतिक्रिया आज बंजारासोबतच ओबीसीत पहायला मिळते.
*शिवसेनेला 'संजय राठोड' चा पर्याय हरिभाऊ होऊ शकतील?*
'शिवसेनेचे नेते' म्हणून ओळख असलेले माजी मंत्री संजय राठोड यांचे पुनरागमन कधी होईल हे येणारा काळ सांगेल.परंतु बंजारा समाजात जी प्रचंड खदखद व नाराजी आहे.त्याकडे शिवसेनेने दुर्लक्ष करून चालणार नाही.काॅंग्रेसने देखील मागील काळात असेच दूर्लक्ष केल्याने त्याची परिणती जी आहे ती पहायला मिळाली आहे.या सर्व गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नाना पटोले यांनी राजकीय चातुर्य दाखवत आपल्या प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष म्हणून बुलढाण्याचे संजय राठोड व सचिन नाईकांची निवड केली.राष्ट्रवादी नाईक घराण्यातील इंद्रनील नाईकांकडे केंव्हाही मोठी जबाबदारी देऊन बंजारा समाज आपल्याकडे ओढण्यासाठी सर्वांना चेकमेट देऊ शकते.धनंजय मुंडेवर दोषारोप दाखल असतांना राष्ट्रवादीने मुंडेची विकेट पडू दिली नाही.हे सुद्धा राजकीय दृष्टीने बघावेच लागेल.परंतु राठोडाच्या रूपाने मात्र आपला आेपनर फलंदाज शिवसेनेला टिकवून ठेवता आलेला नाही अशी देखील एक चर्चा आहे.शिवसेना महाआघाडी सरकारात मुख्य भूमिकेत राहून सूद्धा बंजारा समाजासारखा एक मोठा समाज गमावणे हे शिवसेनेच्या कदापीही हिताचे ठरणार नाही.म्हणून शिवसेनेने संजय राठोडच्या या विजनवासात हरिभाऊ राठोडसारख्या अनुभवी व ज्येष्ठ नेत्याला संधी देऊन तुर्तास बंजारा समाजाची नाराजी दूर करता येऊ शकेल.याही पुढचा विचार केल्यास हरिभाऊ राठोडाचा फायदा घेत शिवसेना महाराष्ट्राबाहेर बंजारा बहुल राज्यात आपली गर्जना करण्यात सफल ठरू शकते.कारण मध्यप्रदेश,कर्नाटक,आंध्रप्रदेश,गुजरात व राजस्थानात महाराष्ट्रा इतकीच बंजाराची लोकसंख्या या राज्यात आहे.जवळच्या तेलंगणा व छत्तीसगडासह युपी,पंजाब,हरियाणा व दिल्लीत देखिल बर्यापैकी आहे.मुख्य म्हणजे हा देशभरातील समाज आजही एकमेकाशी'कनेक्ट' आहे.
*हरिभाऊ राठोड आणि शिवसेनेची आपुलकी*
देशभरात ओळख असलेला बंजारा,विमुक्त घुमंतूचा अभ्यासू नेता म्हणून हरिभाऊ राठोड यांची ओळख आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी हरिभाऊ राठोड आणि प्रकाश शेंडगे यांनी ओबीसीची मोट बांधली होती.या निवडणूकीत प्रकाश शेंडगे,बालाजी शिंदे,युनूस मनियार,अरूण खरमाटे व पी.बी.कुंभार यांनी प.महाराष्ट्रात तर हरिभाऊ राठोड यांनी विदर्भ,मराठवाडा व खांदेशात शिवसेनेचा प्रचार केला.राठोडांनी अनेक जाहिर सभा देखील घेतल्यात.शिवाय उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांनी ठाण्यात 'मिशन मुख्यमंत्री' हा कार्यक्रम देखील आयोजित केला होता.बंजारासह ओबीसी मधील अतीमागास बारा बलुतेदार,विमुक्त भटक्या समाजात ते आजवर नेहमी सक्रिय राहिले आहे.शिवाय पुढीलवर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणूकी देखील आहेत.या एकुणच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडे हरिभाऊ राठोडच्या तुलनेत बंजारा समाजातून दुसरा नेता आजघडीला नाही.शिवसेना अशा परिस्थितीत बंजारा समाजाची नाराजी कशी दूर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेनेने अधिक काळ दूर्लक्षही करून चालणार नाही. अन्यथा याचा राजकिय फायदा स्वाभावीकच महाआघाडी मधिल काॅंग्रेस व राष्ट्रवादी देखिल घेणार नाही,हे
कशावरून?


COMMENTS