प्रतिनिधी
सत्तर वर्षापासून प्रलंबित असलेला धनगर आरक्षण अंमलबजावणीचा तिढा सोडविण्यासाठी धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने आमदार-खासदारांना मोबाईल वर मिस कॉल करून आंदोलन केले जाणार आहे. एकूणच मिस कॉल वरून परत आलेल्या कॉलवर धनगर आरक्षणा बद्दल जाब विचारला जाणार असल्याची माहिती धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.
धनगर आरक्षण अंमलबजावणी यासाठी धनगर समाजात राज्यकर्त्या विरोधात प्रचंड रोषआहे.कोरोना महामारीच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करणे सोईचे दिसत नाही. त्यामुळे धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने आमदार-खासदारांना त्याच्या मोबाईल वर मिस कॉल करून त्यांचे मोबाईल हँग पडावेत असे आंदोलन केले जाणार आहे. विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा अशा चारही सभागृहातील महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना जाब विचारला जाणार आहे. सर्व लोकप्रतिनिधीच्या मोबाईल नंबर ची यादी आंदोलनकर्त्यांना मोबाईल वरच पुरवली जाणार आहे. लोकप्रतिनिधींकडून परत आलेल्या कॉलवर 'आजपर्यंत आपण विधानसभा अथवा लोकसभेत धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडला का?' हा एकच प्रश्न विचारला जाणार आहे. धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष,परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर केले जाणार आहे. 12 ऑक्टोबर सोमवार ते 18 ऑक्टोबर रविवार आठवडाभर हे मिस कॉल मारो आंदोलन चालले जाणार आहे. या आंदोलनात समाजातील प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेश संपर्क प्रमुख रविकांत हरकळ, धनगर साम्राज्य सेना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आशुतोष शेंडगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
COMMENTS