विद्यार्थ्यांना घडवताना चे अनुभव सांगतायत आदर्श शिक्षिका सौ चंद्रकला कदम बिरादार
🔴द. सक्सेस स्टोरी* 🔴
जून महिन्याचा पहिला दिवस! मी माझी गाडी पार्क केली व वर्गाकडे मोर्चा वळवणार तोच एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज कानावर पडला. मी लगबगीने तिकडे धाव घेतली पाहते तर काय ?चौथीला येणारी एक मुलगी मोठ्याने रडत होती. शाळेत यायला नको म्हणत होती व तिचे पालक तिला रागवून ओढत वर्गाकडे घेऊन "वर्गात बस" म्हणून सांगत होते. मी त्या पालकांना समजावले व घरी पाठवून दिले त्या मुलीच्या पाठीवरून हात फिरवला व पर्स मधील खाऊ काढून खायला दिला व तिला थेट माझ्या जवळच बसवून घेतले .नंतर तिच्याशी मी बोलण्यास सुरुवात केली.मधून मधून प्रश्नही विचारले. गोष्टीही सांगितल्या. नंतर तिने तिचे हळूच नाव सांगितले "छकुली". दुपारची सुट्टी होईपर्यंत छकुलीचा मूड जरा बरा झाला व तीही माझ्याशी मधून मधून बोलायला लागली. जवळजवळ महिनाभर हाच उपक्रम सुरू होता. तिला मी आल्या आल्या पर्समधला खाऊ द्यायचा, जवळ बसून घ्यायचे व तिच्याशी गप्पा मारायच्या .महिन्याभरानंतर आश्चर्य घडले!!! माझी छकुली आता न रडता पालकांशिवाय शाळेत येऊ लागली .तिला माझी व पर्यायाने शाळेची गोडी निर्माण झाली. एखाद्या विद्यार्थ्याला शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी शिक्षकाचे संपूर्ण कसब पणाला लागत असते. विद्यार्थ्यांची मानसिकता कशी समजून घ्यायची हे आता बारा-तेरा वर्षांच्या सेवेतून मला नक्कीच अवगत झाले होते !आजपर्यंत अशा अनेक छकुल्या हाताखालून गेल्या की ज्या शाळेत येताना रडायच्या पण शाळेतून घरी जाताना मात्र हसत हसत जायच्या. त्यासाठी आजवर राबविलेल्या उपक्रमांची व केलेल्या प्रयत्नांची नकळतच आठवण झाली व मन भूतकाळात गेले. शिक्षण क्षेत्रात 2007 साली मी पदार्पण केले तेव्हा पहिल्याच वर्षी माझ्या पहिलीच्या वर्गाचा पट होता 43 !!!त्याचक्षणी 43 पैकी 43 मुले प्रगत करण्याची खूणगाठ मी मनाशी बांधली आणि मनोमन ठरवले की इथून पुढे कोणता का वर्ग मिळेना एकही मूल कधीच अप्रगत ठेवायचे नाही. जवळजवळ बारा-तेरा वर्षांच्या सेवेमध्ये अथक प्रयत्न करून यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न केला . अध्यापन अधिक रंजक पद्धतीने कसे होईल याच प्रयत्नात राहिले.त्यासाठी कम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही, टॅब या आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न केला .2017 साली माझ्याकडे इयत्ता तिसरीचा वर्ग होता वर्गाचा पट होता फक्त 16. पण त्याहीवर्षी लोकसहभागातून सुमारे 25000/ रुपये किमतीचे पाच टॅब मिळवले व माझ्या शाळेची "टॅबलेट स्कूल" म्हणून जिल्हाभर ओळखही निर्माण झाली . हे माझ्यासाठी सर्वात मोठे यश मिळवून देणारे कार्य होते असे मला वाटते आणि विद्यार्थीही या टॅबच्या मदतीने अधिक आनंददायी पद्धतीने शिकू लागले होते. अलीकडेच एका वर्षी वर्ग अध्यापनात "ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीचा" उपयोग करण्याचे मी ठरवले होते व त्यातूनच 5000 रू स्वतः खर्च करून ज्ञानरचनावादी चित्रांचे स्वतःच फरशीवर रेखाटन केले. त्याचाही मुलांना अध्ययन अध्यापनात खूप उपयोग झाला. तेरा वर्षांच्या सेवेमध्ये अध्यापनाच्या नवनवीन कल्पना सुचत गेल्या त्यातूनच दप्तराविना शाळा उपक्रम, कार्यानुभवातील विविध वस्तू बनवणे, वृक्ष माझे मित्र उपक्रम, बाल आनंद मेळावा, पालखी सोहळे, माता-पालक मेळावे, विविध दिन साजरे करणे, विद्यार्थी वाढदिवस साजरे करणे, भेळ उपक्रम, रांगोळी, मेहंदी, पाककला स्पर्धा , सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, विविध खेळ स्पर्धा,सहलींचे आयोजन ,स्नेहसंमेलने, स्पर्धा परीक्षा अशा एक ना अनेक नवोपक्रमांतून पालकांशी संपर्क साधून लाखो रुपयांचा लोकसहभाग गोळा करता आला.यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आनंददायी बनवून पट वाढवण्यास नक्कीच यश मिळाले. आजही अनेक वर्षे झाली तरी माझ्या "त्या छकुली" चा फोन शिक्षक दिनाच्या दिवशी न चुकता दरवर्षी येतो .चौथीच्या वर्गात बसायला रडणारी, वर्गात यायला नको म्हणणारी छकुली आज छोट्याशा खेडेगावात राहूनही उच्च शिक्षण पूर्ण करू शकली आहे याचा जास्त आनंद आहे. अशा कितीतरी छकुल्या माझ्या हातून घडल्या, त्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा मनापासून प्रयत्न केला व त्यात मी यशस्वी झाले असे मला वाटते.
कोणतेही काम आव्हान म्हणून स्विकारले त्यात जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडला नाही.अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडले. केवळ माझ्या असंख्य छकुल्यांसाठी!!!
पण इतक्यात प्रवास संपत नाही. अशा अनेक छकुल्या इथून पुढेही माझी वाट पाहत आहेत त्यासाठी मी सज्ज आहे पुन्हा एकदा!! नव्याने !!नवीन आव्हानां सोबत!!!
संकलन
सौ चंद्रकला कदम बिरादार
जि प प्रा शाळा बंडाचीवस्ती
(शेळवे)
ता पंढरपूर
9730918378
COMMENTS