दोघांचा शोध सुरु, बचाव पथकाची शोध मोहीम सुरु
पौळाचीवाडी परिसरातील घटना
-----------------------
- मादळमोही, दि.२४ (संतोष भारती ) :- गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी खळेगाव परिसरात दि.२३ जूलै रोजी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पौळाचीवाडी येथील असणाऱ्या अमृता नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे या नदीला पूर आला. दरम्यान बालमटाकळी येथील एका मोटारसायकल चालक आपल्या दोन मुलासह या पुलावरून जात असताना जोराच्या वाहात पुराच्या पाण्यात वाहुन
गेले. यातील मुलीचा मृतदेह आणि मोटारसायकल आज सकाळी खळेगाव येथे सापडली तर अन्य दोन व्यक्तींचा फायरब्रिगेड पथकांच्या वतीने शोध येथील बंधाऱ्यातील पाण्यात आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील बालमटाकडी ता शेवगाव येथील कृष्णा घोरपडे हा आपल्या सासरवाडीला देवप्रिंपी ता गेवराई येथे आला. दरम्यान दि.२३ जूलै २०२० रोजी सायंकाळच्या सुमारास गेवराई तालुक्यातील चकलांबा, पौळाचीवाडी, खळेगाव परिसरात जोरदार पाऊस पडला. दुर्दैवाने कृष्णा घोरपडे (वय- ३५, आपला मुलगा वय- ८ मुलगी वैष्णवी वय- ५) हे मोटारसायकल वरुन जात असताना अमृता नदी वरील पौळाचीवाडी जवळ पुलावरून जात होते. पण जोरदार पाऊस झाल्यामुळे नदीला पुर आला. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे घोरपडे यांनी वाहत्या पाण्यात मोटारसायकल घातली. या वेळी ते मोटारसायकलसह वाहून गेले. रात्र असल्याने याची कल्पना कुणालाच नव्हती. दरम्यान खळेगाव येथील तीन युवकांनी याच पुलावरून गाडी घातली, त्यांचीही गाडी स्लिप होऊन ते नदीत पडले. मात्र तिघांनाही पोहता येत असल्याने ते गाडी सोडून किनार्यावर आले व घरी जाऊन आज सकाळी ते परत आपली गाडी शोधण्यासाठी नदीत उतरले असता त्यांना त्यांची गाडी न सापडता दुसरीच गाडी सापडली. यावरून अन्य लोकही नदीत पडले असल्याची शंका आली. याच दरम्यान घोरपडे यांचे नातेवाईक अमृता नदीच्या पुलाजवळ आले, कारण रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या घरच्यांना फोन करून सांगितले होते की, मी पौळाचीवाडी जवळ आहे, आता खूप पाऊस पडतोय, असे म्हणून फोन ठेवला होता. त्यानंतर त्यांचा फोन लागलाच नाही. त्यामुळे नातेवाईक त्यांच्या शोध घेण्यासाठी पौळाचीवाडी, खळेगाव येथील अमृता नदीच्या पुलाजवळ आले होते. त्यांचा शोधाशोध घेतल्यानंतर ५ वर्षीय वैष्णवी या मुलीचा मृतदेह दुपारी सापडला. मात्र कृष्णा घोरपडे आणि मुलगा याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू होता. उशीरापर्यंत स्थानिक पोलीस प्रशासन, तलाठी किंवा मंडळ अधिकारी कुणी दाखल झाले नव्हते. दुपारच्या सुमारास फायरब्रिगेड पथकाने नदीमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न चालू होता. यावेळी स्थानिक नागरिक, युवक यांनी ही शोधण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, चकलंबा पोलीस ठाण्याचे सपोनि विजयकुमार देशमुखयांच्यासह पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागातील कर्मचार्यांनी धाव घेतली.
चैकट
- दोघांचा शोध चालू आहे...
- -----------------------------------------
- या घटनेबद्दल खळेगाव येथील युवकांनी बीड जिल्हाधिकारी यांना या घटनेबद्दल फोनवरून माहिती दिली गेली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने फायरब्रिगेड पथकांला घटनास्थळी पाठविण्यात आले. ११ ते १२ वाजेनंतर या पथकाने नदीमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न चालू होता. दरम्यान पौळाचीवाडी ते खळेगाव अंतरावर नदीत सदर व्यक्तींचा शोध घेण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. आता शोध लागत नसल्याने उद्या सकाळी एनडीआर पथकाला पाचारण करण्यात आले असून परत शोध घेतला जाणार आहे अशी माहिती पीएआय बप्पासाहेब झिंझुर्डे यांनी दिली.
COMMENTS