माझा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यांमध्ये सावखेड या छोट्याशा गावात झाला . जेमतेम ५०० ते ६०० लोकवस्ती असलेलं खेडं गाव . गावामध्ये २२ तास लाईट नसायची . पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असे . फाट्यापासुण गाव २ ते ३ किलोमीटर लांब असल्यामूळे गावात गाडी येत नव्हती . गावात चौथी पर्यंत शाळा होती .
आई वडील सहा महीने शेती आणि सहा महीने ऊस तोडी करण्यासाठी दुसर्या जिल्ह्यात जात असे . पुढे आईवडील दोन भावंडांना घेऊन मुंबईला आले . भाड्याने खोली घेऊन मिळेल ती मोलमजुरी करुन आपला उदर निर्वाह करू लागले .
माझे शिक्षण चौथी पर्यंत गावाला आजी जवळ झाले . त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी ही मुंबईला आईवडील यांच्याकडे आलो . घरात आम्ही चार भावंडे होतो . मी घरात मोठा असल्यामूळे माझ्यावर बर्यापैकी जबाबदार्या होत्या . शाळेतून घरी आल्यावर आईला घरकाम करण्यास मदत करू लागलो . कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही. आईबरोबर लोकांच्या घरची कामे करू लागलो . परिवार मोठा होता आणि घर लहान होतं.
दहावीला असताना अभ्यास करायचा कुठे हा प्रश्न होता. मी व माझे वर्ग मित्रांनी शाळेचे संचालक हांडे सर यांना भेटून परिस्थिती सांगितली . आम्हाला रात्री शाळेमध्ये अभ्यासासाठी एक वर्ग हवा होता . सरांनी आम्हाला एक वर्ग उपलब्ध करुन दिला . दहा पंधरा दिवस जे काही जमेल तेव्हढं वाचलं आणि पेपर दिले .
दहावीच्या निकालाच्या दिवशी शाळेत जाण्यासाठी हिम्मत होत नव्हती . कारण की गणित आणि इंग्रजी विषयाचा पेपर खूप अवघड गेला होता . म्हणून नापास होण्याची भीती वाटत होती . कशी तरी हिम्मत करुन आईला सोबत घेऊन रिझल्ट आणण्यासाठी शाळेत गेलो तर रस्त्यातच एक वर्ग मित्र भेटला व त्याने सांगितले की तू पास झालास . माझा आनंद गगनात मावेना . माझी पावले शाळेच्या दिशेने झपझप पडू लागली . शाळेत गेलो असता सर्व वर्ग मित्र एकमेकांना अभिनंदन करत होते .
दहावी पास झाल्यावर पुढे काय ??
वडील इयत्ता दुसरी शिकलेले आणि आईने तर शाळेचे तोंड देखील बघितले नव्हतं. घरात अठरा विश्व दारिद्र्य होते . एका जवळच्या नातेवाईकांनी सांगितले ITI कर म्हणून , मी ITI ला अड्मिशन घेतले. ITI पूर्ण केला परंतु कमी होती पैशाची आणि पुढील मार्गदर्शनाची . त्यानंतर अकरावीला नाईट कॉलेजला प्रवेश घेतला, परंतु सर्व भावंडे शिकत असल्यामूळे फी भरण्यासाठी देखील माझ्याजवळ पैसे नव्हते . त्यावेळी नाईट कॉलेज चे प्राचार्य यांनी फी भरण्यासाठी काही महिन्याचा कालावधी दिला .
सकाळी ६:०० वाजता उठून घरोघरी पेपर टाकणे , त्यानंतर ९:०० ते ६:०० एका छोट्याशा प्रिंटिंग प्रेस मधे काम करणे व संध्याकाळी ६:३० ला धावत पळत कॉलेज ला पोहचणे असा दिनक्रम सुरू झाला .
बारावीला असताना पुन्हा एकदा अभ्यास कुठे करायचा हा प्रश्न पडला . घर लहान असल्याने घरात अभ्यास करणे शक्य नव्हते . त्यातच संकट म्हणून की काय घर मालकाने घर खाली करण्यासाठी तगादा लावला .
त्यानंतर लगेचच आम्ही नवीन खोली भाड्याने घेतली .
मी व माझे काही वर्ग मित्रांनी मिळून कॉलेजच्या प्राचार्यांना भेटून परिस्थिती सांगितली . त्यांनी आम्हाला शाळेच्या संस्थाचालक कडे घेऊन गेले . त्यांनी आम्हाला एक वर्ग अभ्यासासाठी उपलब्ध करुन दिला . पेपर असल्यामूळे कामावर काही दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या. सकाळी पेपर टाकून झाल्यावर घरी न जाता मी व माझा मित्र थेट पायी चालत घाटकोपरच्या सर्वोदय हॉस्पिटलच्या आवारात अभ्यास करण्यासाठी जात असे. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत अभ्यास करू लागलो . यामध्ये माझा मित्र संजय पाटील याचे खूप मोठे योगदान आहे . मला इंग्रजी आणि अर्थशास्त्र या विषयाची खूप भीती वाटत होती . त्याने माझ्याकडून व्यवस्थित अभ्यास करवून घेतला आणि तो स्वतः नाईट कॉलेज मधून पहिला आला .
बारावी पास झाल्यावर माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण लागले . मुंबई विद्यापीठात कला शाखेच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला . सकाळी पेपर टाकून झाल्यावर छोट्याशा कंपनीत कामाला जाऊ लागलो . संध्याकाळी कामावरून आल्यानंतर MS-CIT , TYPING(मराठी , इंग्लीश ) हे कोर्स पूर्ण केले . काही मित्रांच्या मार्गदर्शनाखाली MPSC अभ्यास सुरू केला . त्यानंतर BEST मधे एक वर्षांचा प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केला . मुंबई विद्यापीठातून एम . ए . पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले .
मला जाणीव होती माझ्या परिस्थितीची आणि आईवडिलांनी केलेल्या कष्टाची .
ध्येय फक्त एकच की सरकारी नोकरी मिळवायची .
सन २०१३ मधे मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मी मेरिट मधे आलो आणि सरकारी नोकरीचे ध्येय असलेलं माझं स्वप्न साकार झाले .
*संजय बागुल*
COMMENTS