- - आ. सोळंकेनी भूमिपूजन करून काय साध्य केले याची चर्चा तालुक्यात
माजलगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील दिंद्रुड येथे होत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ दोनच दिवसापूर्वी दि.२२ रोजी एका शेतकऱ्याच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु त्याच कामाचे शुक्रवारी स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांनी परत भूमिपूजन केले या प्रकारामुळे माजलगाव तालुक्यात चर्चा ला उधाण होत आहे. एवढ्या मोठ्या अनुभवी नेत्याने श्रेय लाटण्याचा हा प्रकार म्हणजे बेगाणी शादी मे अब्दुल्ला दिवाना असाच असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य जनतेतून उमटत आहेत.
मतदारसंघातील दिंद्रुड येथे भाजप-शिवसेना सरकारच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मंजूर केला होता. 23 जुलै 2019 रोजी या प्रा.आ.केंद्राच्या बांधकामासाठीच्या निधीस मंजुरी मिळाली होती. तर 4 सप्टेंबर 2019 रोजी पूर्णतः प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. गावचे भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांनी वेळोवेळी स्थानिक पासून ते मंत्रालयापर्यत पाठपुरावा करून या कामाच्या मंजुरीला मूर्त स्वरुप दिले.
बांधकामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर सदरील कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ दि.२२ रोजी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हस्ते करून बळीराजाचा सन्मान करण्यात आला. मात्र परत त्याच कामाचा भूमिपूजन कार्यक्रम केल्यामुळे शेतकऱ्याचे हात शुभ नाहीत का? की आमदारांना शेतकऱ्यांची अलर्जी आहे असा सवाल उपस्थित होत आहे. मतदार संघात करण्यासारखे खूप काही असताना एकाच कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन करून आमदारांना नेमके काय साध्य करायचे आहे असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
-------
- मुख्यमंत्री सहायता आरोग्य कक्षाचे तत्कालीन प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी या कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो लोकांना मोफत आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. याच प्रमाणे दिंद्रुड परिसरात नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून शेटे यांनी ३ कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला व पाठपुरावा करून दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे हस्ते भूमिपूजन केले होते. असे असताना आमदार प्रकाश सोळंके यांनी शुक्रवारी याच कामाचे दुसऱ्या वेळेस भूमिपूजन करून घेतले याचीच सर्वत्र चर्चा होत आहे. सोळंके आमदार होऊन आठ महिने झाले मग आतापर्यंत त्यांनी का भूमिपूजन केले नाही असा प्रश्न गावकऱ्यातून उपस्थित होत आहे.
-------
- लोकांना सुविधा मिळाव्यात यासाठी आपण आरोग्य केंद्रास मंजुरी आणली होती.सोळंके लोकप्रतिनिधी आहेत,ते भूमिपूजन करू शकतात.--ओमप्रकाश शेटे.
COMMENTS