नांदेड : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या महिलांचे बंद झालेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्थसाहाय्य पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी जनवादी महिला संघटनेच्या रणरागिणींनी उभारलेल्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. महिलांच्या हक्कांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या राज्यव्यापी आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधले असून, बंद आणि अनियमित अर्थसाहाय्याचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला अर्थसाहाय्य मिळाल्यानंतर ई-केवायसीच्या अटींमुळे राज्यातील लाखो महिलांचे पैसे बंद झाले. अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहावे लागले. विशेषतः दुष्काळग्रस्त भागातील आदिवासी, शेतमजूर आणि गरीब कुटुंबातील महिलांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
या अन्यायाविरोधात जनवादी महिला संघटनेच्या नेत्या माजी खासदार वृंदा करात, मरियम ढवळे, प्राची हातीवलेकर, नसीमा शेख, उज्वला पडलवार यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. निवडणुकीपूर्वी महिलांना योजनेचे आश्वासन देऊन नंतर ई-केवायसीच्या नावाखाली त्यांना लाभापासून वंचित ठेवणे हा महिलांचा विश्वासघात असल्याची भावना आंदोलनातून व्यक्त करण्यात आली.
या संघर्षात जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि सन्मानाचा प्रश्न घेऊन उभारलेल्या या लढ्यामुळे बंद झालेले अर्थसाहाय्य पुन्हा सुरू करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. महिलांच्या एकजुटीचा आणि संघटित संघर्षाचा हा विजय असून, पात्र लाडक्या बहिणींना त्यांचे हक्काचे अर्थसाहाय्य मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार जनवादी महिला संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.


COMMENTS