बाल जीवनाचे गाणे गाणारा काव्यसंग्रह : ‘गाऊ मजेत गाणे’

    बालपण हा मानवी जीवनातील सर्वांत निरागस, आनंददायी आणि कल्पनारम्य काळ असतो. या वयातील मुलांचे मन जिज्ञासू असते. सभोवतालच्या जगाकडे पाहण्या...

 

  बालपण हा मानवी जीवनातील सर्वांत निरागस, आनंददायी आणि कल्पनारम्य काळ असतो. या वयातील मुलांचे मन जिज्ञासू असते. सभोवतालच्या जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी कुतूहलपूर्ण असते. निसर्गातील रंग, फुलांचा सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाट, पावसाच्या सरी, खेळातील आनंद आणि नात्यांमधील प्रेम या साऱ्या गोष्टी बालमनाला सतत आकर्षित करतात. या समृद्ध भावविश्वाला शब्दरूप देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालकविता करीत असते.

   बालकविता हा साहित्यप्रकार केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही. बालकांच्या भावविश्वाची अभिव्यक्ती, भाषिक विकास, कल्पनाशक्तीची वाढ आणि जीवनमूल्यांची रुजवण यांसाठी बालकवितेला विशेष महत्त्व आहे. लयबद्ध शब्दरचना, नादमयता, गेयता, यमक आणि सहजसुंदर भाषा ही बालकवितेची प्रमुख वैशिष्ट्ये होत. बालकवितेच्या माध्यमातून मुलांना आनंद मिळतो, त्यांच्या मनात नवनवीन प्रश्न निर्माण होतात आणि त्यांची विचार करण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे बालकविता ही बालमनाच्या जडणघडणीतील एक महत्त्वपूर्ण साहित्यप्रकार आहे. 

  कवी बालाजी भागानगरे यांचा ‘बाला गं बाला’ या बालकवितासंग्रहानंतरचा ‘गाऊ मजेत गाणे’ हा दुसरा बालकवितासंग्रह पुणे येथील मिहाना पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी या संग्रहाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे, तर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक श्री. एकनाथ आव्हाड यांनी पाठराखण केली आहे. अत्यंत सुंदर मुखपृष्ठ आणि पुस्तकाच्या आतील बोलकी चित्र काढून पुस्तक आकर्षक करणारे ज्येष्ठ चित्रकार श्री संतोष घोंगडे यांनी कवितासंग्रहाच्या सौंदर्यात भर घातली आहे.

  ‘गाऊ मजेत गाणे’ या संग्रहात एकूण ४२ कवितांचा समावेश आहे. विषयवैविध्य हे या संग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ईश्वराची आराधना, सण-उत्सव, जंगली व पाळीव प्राणी, देशप्रेम, कृषीनिष्ठा, विश्वपर्यटन, ऋतुमान, संतांची शिकवण, संगीतकला, बालपणातील खाद्यसंस्कृती, कौटुंबिक नातेसंबंध आणि आनंददायी जीवनदृष्टी अशा विविध विषयांवर कवीने लेखन केले आहे. या विषयांमधून बालमनातील कुतूहल, आनंद, संवेदनशीलता आणि मूल्यविचार व्यक्त होतात.

या संग्रहातील पहिलीच ‘प्रार्थना’ ही कविता ईश्वराप्रती भक्तिभाव व्यक्त करताना मानवतेचा संदेश देते. कवी विश्वेश्वराला प्रार्थना करताना म्हणतात,

‘सर्वां हृदयी प्रेम भरी तू नको भेदभावना

सुख शांती रे नांदो जगती हीच एक कामना

ईर्षा मत्सर जावो सरुनी बंधुभाव दे खरा

हात जोडुनी तुझी प्रार्थना करितो विश्वेश्वरा’. (पृ. ११)

  अशा शब्दांत प्रेम, शांतता, बंधुभाव आणि समतेची भावना व्यक्त होते. बालमनावर लहानपणापासूनच मानवी मूल्यांचे संस्कार व्हावेत, ही या कवितेमागील भूमिका आहे. प्रार्थनेच्या माध्यमातून कवी केवळ ईश्वराचे स्मरण करीत नाहीत, तर समाजात परस्परांविषयी प्रेम आणि सद्भावना नांदावी, अशी अपेक्षाही व्यक्त करतात.

  भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना विशेष महत्त्व आहे. राखी, ओवाळणी, दिवाळी, होळी आणि खंडोबाची जत्रा अशा विविध विषयांवरील कवितांमधून कवीने सण-उत्सवांचे आनंददायी वातावरण उभे केले आहे. या कविता बालकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देतात. ‘दिवाळी’ या कवितेत कवीने दिवाळी या सणाचा आनंद ओघवत्या शब्दांत चित्रीत करतात,

‘दिव्य फटाके नभी रेखिती सुरेख नक्षी परोपरी

मांगल्याचे दीप घेउनी आली दिवाळी घरोघरी’. (पृ. ४४). 

  यात दिवाळीचे प्रकाशमय आणि मंगल वातावरण साकारले आहे. आकाशात उमटणारी रोषणाई आणि घरोघरी येणारा आनंद यांचे चित्रण कवीने नादमय शब्दांत केले आहे. सणांचे वर्णन करताना मुलांना संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच सामूहिक आनंदाची जाणीवही या कविता करून देतात.

  महाराष्ट्राला संतांची समृद्ध परंपरा लाभली आहे. वारकरी, महानुभाव, नाथ, दत्त, समर्थ आणि शैव अशा विविध संप्रदायांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनाला समृद्ध केले आहे. या परंपरेतील विचारांचा परिचय बालकांना करून देण्याच्या दृष्टीने ‘संतांची शिकवण’ ही कविता महत्त्वपूर्ण ठरते. कवी लिहितात,

‘संतांची ही भूमी आपुली कीर्तनात रे रंगूया

शिकवण त्यांची घेऊनी जगी ज्ञानदीप रे लावूया

ज्ञानासंगे रेडा गावे

कुत्र्यापाठी नामा धावे

वृक्षीवल्ली पक्ष्यांमेळी तुकाराम रे होऊया

संतांची ही भूमी आपुली कीर्तनात रे रंगूया’. (पृ. ३५)

  या कवितेतून संतपरंपरेतील समता, भक्ती, ज्ञान आणि सर्व सजीवांविषयीची आत्मीयता यांचा प्रत्यय येतो. संत नामदेव, संत तुकाराम आणि संतपरंपरेतील विविध प्रसंगांचा संदर्भ देत कवी मुलांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी जोडतात. संतांचे विचार केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणावेत, असा संदेश या कवितेतून मिळतो. संतविचारांची ओळख बालवयात करून देण्याचा कवीचा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहे.

   आजचे बालविश्व विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावाखाली विकसित होत आहे. नव्या तंत्रज्ञानाशी परिचित असलेल्या बालकांच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतिबिंब ‘नव्या युगाचे बालक आम्ही’ या कवितेत दिसते. कवी लिहितात,

‘नव्या युगाचे बालक आम्ही

तंत्रशास्त्र ते पुरे जाणतो

गेला आता काळ जुना तो

आम्ही काळासवे चालतो’. (पृ. १४)

   आधुनिक काळातील बालकांचा आत्मविश्वास आणि तंत्रज्ञानाशी असलेली त्यांची जवळीक व्यक्त होते. बदलत्या काळानुसार ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, याची जाणीव कवी करून देतात. परंपरेचा आदर राखतानाच विज्ञाननिष्ठ, विवेकशील आणि प्रगतिशील दृष्टिकोन स्वीकारण्याची प्रेरणा या कवितेतून मिळते. आजच्या डिजिटल युगातील बालकांच्या मानसिकतेचे प्रतिबिंब या कवितेत पाहायला मिळते.

  भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी आपल्या कष्टातून संपूर्ण समाजाच्या अन्नाची गरज भागवतो, तर जवान देशाच्या सीमांचे रक्षण करतात. या दोन्ही घटकांविषयी कृतज्ञता आणि आदराची भावना निर्माण करण्याचे कार्य ‘जय जवान जय किसान’ आणि ‘शेतकऱ्याचं पोरगं’ या कविता करतात.

‘जय जवान जय किसान’ या कवितेत कवी म्हणतात,

‘जवान होऊया, किसान होऊया

जय जवान जय किसान मंत्र गाऊया’. (पृ. ५१)

  अशा शब्दांत देशसेवा, श्रमप्रतिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त होते. देशाच्या सुरक्षेसाठी झटणारा जवान आणि समाजाचे पोट भरणारा शेतकरी हे राष्ट्राच्या उभारणीतील महत्त्वाचे घटक आहेत, याची जाणीव बालकांना या कवितेतून होते.

‘शेतकऱ्याचं पोरगं’ या कवितेत ग्रामीण जीवनातील कष्ट, संघर्ष आणि आत्मविश्वास यांचे दर्शन घडते. कवी लिहितात,

 ‘शेतकऱ्याचं कामकरऱ्याचं पोरगं मी हाय रं

आगीचा गोळा जळती ज्वाला ठिणगीचं एक हाय रं’. (पृ. ६०)

  या कवितेमधून ग्रामीण भागातील मुलांच्या जिद्दीचे आणि संघर्षशील वृत्तीचे चित्र उभे राहते. शेतकरी कुटुंबातील मुलांचे जीवन केवळ शाळा आणि अभ्यासापुरते मर्यादित नसते; त्यांना शेतीकामाचीही जाणीव असते. कष्टाची प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द या कवितेतून व्यक्त होते. ग्रामीण बालजीवनाचे वास्तव आणि त्यातील आत्मसन्मान यांचे चित्रण हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे.

   बालवयात अभ्यासाबरोबरच खेळ, मनोरंजन आणि शारीरिक हालचाली यांनाही महत्त्व असते. ‘हसा नाचा’ या कवितेतून कवी मुलांना आनंदाने जीवन जगण्याचा, अभ्यास करण्याचा, खेळण्याचा आणि चांगले संस्कार आत्मसात करण्याचा संदेश देतात. ते म्हणतात,

‘अभ्यास करूनी खेळा खेळा खेळूनिया अभ्यास करा

खेळ आणखी अभ्यासाचे सूत्र चांगले मनी स्मरा’. (पृ. ६२)

   अशा शब्दांत कवीस अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधण्याची प्रेरणा मिळते. अभ्यासामुळे ज्ञानात भर पडते, तर खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, शिस्त आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. क्रिकेटसारख्या सांघिक खेळांतून सहकार्याची भावना आणि परस्परांविषयी आदर निर्माण होतो. मुलांनी अभ्यासाचा ताण न घेता आनंदाने शिकावे आणि खेळातूनही जीवनानुभव मिळवावेत, अशी सकारात्मक जीवनदृष्टी या कवितेतून व्यक्त होते.

  बालकवितेचे यश तिच्या आशयाबरोबरच भाषेतील सहजता, लय, नाद आणि गेयतेवरही अवलंबून असते. ‘गाऊ मजेत गाणे’ या संग्रहात कवीने बालमनाला सहज समजेल अशी भाषा वापरण्याचा प्रयत्न केला आहे. कवितांतील यमक, लयबद्धता आणि गाण्याच्या स्वरूपातील रचना यांमुळे मुलांना कविता वाचताना, ऐकताना आणि गुणगुणताना आनंद मिळू शकतो. विविध विषयांमुळे बालकांच्या अनुभवविश्वाचा विस्तार होण्यासही मदत होते.

    ‘गाऊ मजेत गाणे’ हा कवितासंग्रह आनंद, संस्कार, ज्ञान आणि मूल्यशिक्षण यांचा सुरेख संगम घडविण्याचा प्रयत्न करतो. प्रार्थना, भारतीय संस्कृतीतील सण-उत्सव, संतांची शिकवण, विज्ञान-तंत्रज्ञान, देशप्रेम, शेतकरी आणि जवान यांच्याविषयीचा आदर, निसर्ग, ऋतू, प्राणी-पक्षी, संगीत आणि कौटुंबिक नातेसंबंध अशा विविध विषयांतून कवी बालमनाचा वेध घेतात.

   या संग्रहातील कवितांमध्ये बालकांच्या भावविश्वाशी संवाद साधण्याची क्षमता आहे. ‘गाऊ मजेत गाणे’, ‘गाणे मी गातो’, ‘फुले झाली चांदणे’, ‘ग्रंथ आपले गुरू’, ‘पाणी म्हणजे जीवन’, ‘पाऊसधारा’, ‘जलपरी’, ‘चला जाऊ कोकणात’ अशा काही कविता मुलांना आनंद देतात, काही त्यांच्या मनात मूल्यांची रुजवण करतात, तर काही आधुनिक जगाशी जुळवून घेण्याची प्रेरणा देतात. बालसाहित्याचा प्रमुख उद्देश बालकांना आनंद देतानाच त्यांच्या संवेदनशीलतेचा, कल्पनाशक्तीचा आणि विचारक्षमतेचा विकास घडविणे हा असतो. या दृष्टीने प्रस्तुत बालकविता संग्रह महत्त्वपूर्ण ठरतो.

   बालकांच्या हातात चांगले साहित्य पडणे ही त्यांच्या वैचारिक आणि भावनिक जडणघडणीसाठी आवश्यक बाब आहे. ‘गाऊ मजेत गाणे’ हा संग्रह अधिकाधिक बालवाचकांपर्यंत पोहोचावा, मुलांनी त्यातील कविता वाचाव्यात, गुणगुणाव्यात आणि त्यातून आनंदासोबत जीवनमूल्यांचीही शिकवण घ्यावी, हीच सदिच्छा!


- काव्यसंग्रह : गाऊ मजेत गाणे

- कवी : बालाजी भागानगरे

- प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन, पुणे

- प्रथमावृत्ती : १४ सप्टेंबर २०२६. पृष्ठ संख्या : ६४ 

- किंमत: ₹२५० रुपये 

 

डॉ नारायण शिवशेट्टे 

 अर्जापूर जि.नांदेड

मो.९४२२५५८५७३

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group