स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १२६ व्या जयंतीनिमित्त 'लेखन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा
नांदेड: कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि श्रमिकांच्या संघर्षाची महती लेखणीतून मांडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे महान मानवतावादी लेखक होते, असे प्रतिपादन पुरोगामी विचारवंत डॉ. शरद गायकवाड (कोल्हापूर) यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व अभ्यास केंद्र, विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अण्णा भाऊ साठे लेखन प्रेरणा दिन’ व जयंती कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते.
व्याख्यानातील प्रमुख मुद्दे:
अनुभवातून समृद्ध साहित्य: अवघ्या दीड दिवसाच्या औपचारिक शिक्षणावर मात करत अण्णाभाऊंनी प्रत्यक्ष जीवनातील संघर्ष आणि सामाजिक वास्तवाच्या बळावर तब्बल ७७ ग्रंथांची निर्मिती केली. त्यांच्या साहित्याचे २० हून अधिक जागतिक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.
साहित्याचा केंद्रबिंदू बदलला: अण्णाभाऊंनी सर्वसामान्य माणसाला साहित्याचा नायक बनवले. त्यांच्या लेखणीत सत्यशोधकी, मार्क्सवादी, आंबेडकरी, स्त्रीवादी आणि साम्राज्यवादविरोधी विचारांचा अपूर्व संगम आढळतो.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान: 'एक पाय तुरुंगात आणि एक पाय चळवळीत' अशा संघर्षात जगताना त्यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
'तमाशा' ते 'लोकनाट्य': तत्कालीन काळात तमाशावर बंदी असताना अण्णाभाऊंनी त्याला 'लोकनाट्य' हे नवे स्वरूप देत सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली.
अण्णाभाऊंचे कार्य भारतरत्नाच्या मोलाचे आणि ज्ञानपीठाच्या तोलाचे असल्याचे डॉ. गायकवाड यांनी ठामपणे नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी अण्णाभाऊंनी शोषित आणि सामान्य माणसाचा चेहरा जगासमोर प्रभावीपणे मांडल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनीता पाटील यांनी केले, आभार डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी मानले, तर मुख्य संयोजक डॉ. मारुती गायकवाड यांनी यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. या प्रसंगी डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. प्रमोद लोणारकर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. बाबुराव जाधव यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpeg)
COMMENTS