किनवट प्रतिनिधी : मागील कित्येक महिन्यापासून किनवट शहरातील प्रमुख बाजारपेठेच्या ठिकाणी राजरोसपणे मटका व जुगार सुरू असून या अवैध धंद्यामुळे ...
किनवट प्रतिनिधी : मागील कित्येक महिन्यापासून किनवट शहरातील प्रमुख बाजारपेठेच्या ठिकाणी राजरोसपणे मटका व जुगार सुरू असून या अवैध धंद्यामुळे गोरगरिबांची कुटुंबे उध्वस्त होत आहेत तर बऱ्याच वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे आपल्या स्तरावर विशेष मोहीम राबवून या अवैध धंद्यावर कायमचा आळा घालावा असे आशयाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना दिले आहे.निवेदनात नमूद केले आहे की मागील कित्येक महिन्यापासून किनवट शहरात ठीकठिकाणी मटका व जुगार या धंद्यानी उच्छाद घातला आहे. शहरातील भाजीपाला मार्केट,मटन मार्केट, बसस्थानक परिसर, सुभाषनगर, समतानगर,हमाल कॉलनी, रेल्वे स्टेशन, गंगानगर यासह आठवडी बाजार आणि प्रमुख चौकाच्या आजूबाजूला मिलन, श्रीदेवी, पद्मावती, टाईम बाजार,कल्याण या नावाचा मटका दिवसरात्र सुरू आहे. कमी वेळेत अधिक पैशाच्या लालसेपोटी कामगारवर्ग व मजूरदारवर्ग मटक्याच्या आहारी गेला असून दिवसभराची मजुरी या धंद्यात गुंतवून देशोधडीला लागत आहेत.
आठवडी बाजाराच्या दिवशी तर शहरातील आणि ग्रामीण भागातील तरुणवर्ग व सर्वसामान्य नागरिकांची मटका बुक्कीवर अमाप गर्दी पाहायला मिळते.मटका चालक हे किनवट शहरातील धनदांडगे मटका किंग असून त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांना हाताशी धरून शहरात ठिकठिकाणी मटक्याचा गोरखधंदा चालू केला आहे.धंद्यात दररोज करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असून पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून जागोजागी अवैध मटका व्यवसायाने थैमान घातले असून सुज्ञ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक रहिवाशांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मटका सुरू असलेल्या ठिकाणी कित्येकदा पैशाच्या देवाण-घेवान वरून भांडण तंट्यांचे प्रसंग उद्भवत असून धार्मिक सलोखा बिघडत आहे यापूर्वी अवैध व्यवसायामुळे किरकोळ भांडणाचे पर्यावसान जाती धर्मात होऊन कायदा व सुव्यवस्था बाधित झाली आहे.मटक्याच्या धंद्याव्यतिरिक्त जुगार व्यवसायाने शहरात मजबूत पाय रोवले असून जागोजागी दिवसभर जुगाराचे डाव सुरु आहेत त्यामुळे किनवट शहरातील सुज्ञ नागरिक,महिला, शालेयविद्यार्थी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे दृष्टीने या अवैध मटका बुक्की व जुगार अड्ड्यावर धडक मोहीम राबवून कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवेदनात केली आहे. अवैध धंद्या विरोधात कारवाई झाली नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.निवेदनावर शिवसेना उबाठा पक्षाचे शहरप्रमुख प्रशांत कोरडे, माजी शहरप्रमुख संतोष यलचलवार, प्रभू कोले, सुनील तकलवार,महेश मंडारे,जिन्ना पबतवार आनंद क्यातमवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS