माहूर :तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक घडामोड म्हणून माहूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटांवरून थेट १०० खाटांच्या सर्वसुविधायुक्त उपजि...
माहूर :तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक घडामोड म्हणून माहूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटांवरून थेट १०० खाटांच्या सर्वसुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यातच आधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून रुग्णांना बाहेरगावी जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
नगर पंचायत माहूरचे नगराध्यक्ष फिरोज हाजी कादर दोसानी यांनी याबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आरोग्य सेवा संचालक (राज्यस्तर) मुंबई येथील डॉ. सुनिता गोल्हाईत यांनी टपाली पत्राद्वारे प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
माहूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर भाविकांची तरंगती लोकसंख्या असते. त्यामुळे ट्रामा केअर सेंटरची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. यापूर्वी ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव मंत्रालयात रखडला होता. मात्र, वाढती लोकसंख्या व आपत्कालीन आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेऊन १०० खाटांचे सर्वसुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी नगराध्यक्ष दोसानी यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे माहूर दौऱ्यावर आले असता निवेदनाद्वारे केली होती.
शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.४६/पासु-२ दि. २५ ऑगस्ट २०२५ अन्वये कार्यवाही सुरू करण्यात आली असून, आयुक्तालयाच्या पत्र क्र. आसेआ/कक्ष-३/टे-७/ग्रारु माहूर १०० खाटा श्रेणी/१७१३२-१३४/२५ दि. १० डिसेंबर २०२५ नुसार १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यास तज्ज्ञ डॉक्टर, शस्त्रक्रिया विभाग, प्रसूती कक्ष, आपत्कालीन सेवा, अत्याधुनिक उपकरणे अशा सर्व सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. दुर्गम भागातील रुग्णांना इतर शहरात जाण्याची गरज भासणार नाही.दरम्यान, हा प्रस्ताव मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, लवकरात लवकर शासनस्तरावर मंजुरी मिळून रुग्णालय प्रत्यक्षात सुरू व्हावे, अशी अपेक्षा तालुकावासीयांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS