*व्यवस्था बदलल्याशिवाय स्त्रीमुक्ती अशक्य – कॉ. किरण मोघे*


"कल्चरल"ची फुले–शाहू–आंबेडकर–अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला -दुसरे पुष्प

नांदेड :

नवउदारमतवादी धोरणांनी स्त्रियांच्या श्रमाचे अवमूल्यन करून त्यांच्या श्रमाची उघड चोरी केली आहे. ही शोषणकारी व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी हिंसेचा वापर केला जातो. त्यामुळे स्त्रियांच्या दुःख व शोषणासाठी जबाबदार असलेली सामाजिक-आर्थिक व्यवस्था बदलल्याशिवाय खरी स्त्रीमुक्ती शक्य नाही, असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड किरण मोघे यांनी केले.

कल्चरल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित फुले–शाहू–आंबेडकर–अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना त्या “स्त्रीमुक्ती चळवळीची वाटचाल: उपलब्धी आणि आव्हाने” या विषयावर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्री चळवळीच्या अभ्यासिका डॉ. रमा नवले होत्या. यावेळी मंचावर कॉम्रेड लता भिसे सोनावणे, विमल नवसागरे, डॉ. शीतल गोणारकर व डॉ. मंदाकिनी माहुरे उपस्थित होत्या.

आपल्या व्याख्यानात कॉ. किरण मोघे यांनी स्त्री चळवळीचा ऐतिहासिक आढावा घेतला. हुंडाविरोधी कायदा १९६० मध्ये अस्तित्वात आला, तर १९८० मध्ये ४९८(अ) कलम लागू झाले; तरीही हुंडाबळींचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. उलट नवउदारमतवादाच्या काळात या शोषणाचे स्वरूप अधिक गंभीर झाले आहे. वैष्णवी हगवणे प्रकरण हे त्याचे केवळ एक उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धर्म व जातीय ओळखींच्या आधारे समाजात फुट निर्माण केली जात असून “चार मुले जन्माला घाला, घरी बसा” अशा घोषणांतून स्त्रीला परंपरेत कोंडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हे वेळीच ओळखून त्याला प्रतिकार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.


यावेळी स्मृतिशेष अशोक नवसागरे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड लता भिसे सोनावणे यांना प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठेपासून आजही स्त्रिया वंचित आहेत. “आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क हवा” एवढीच स्त्रियांची मागणी आहे; पण या माणूसपणाच्या स्वप्नावरही पहारे बसवले जात आहेत. अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांचा गौरव केला जातो—या अन्यायाविरुद्ध स्त्री चळवळ लढत आहे. हा पुरस्कार त्या लढ्यासाठी नवे बळ देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोपात डॉ. रमा नवले म्हणाल्या की, समाजउभारणीत स्त्रियांचे कष्ट सर्वाधिक असतानाही त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाले. स्त्रीमुक्ती ही केवळ स्त्रियांचीच नव्हे, तर माणूसपणाची लढाई आहे. ही लढाई स्त्री-पुरुषांनी मिळून लढली पाहिजे, असे त्यांनी  नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंदाकिनी माहुरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. शीतल गोणारकर यांनी करून दिला, तर उपस्थितांचे आभार विमल नवसागरे यांनी मानले.

टिप्पण्या