स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रेरणादायी पुस्तके बाजारात आली आहेत, येत आहेत. त्यात विश्वास नांगरे पाटील यांचे 'मन में है विश्वास' आणि मनोजकुमार शर्मा यांचे 'ट्वेल्थ फेल' ह्या पुस्तकांचा क्रम अगदी वरचा आहे. ह्या पुस्तकांनी आणि ह्या पुस्तकांच्या लेखकांनी नवीन पिढीला अक्षरशः झपाटले आहे. याच मालिकेतील सूरज गुरव यांनी लिहिलेले 'विद्यार्थीधर्म' हे अतिशय प्रेरणादायी पुस्तक नुकतेच बाजारात आले आहे. लेखक सूरज गुरव हे मूळचे सांगली जिल्ह्यातील असून सध्या ते नांदेड येथे अपर पोलीस अधीक्षक ह्या पदावर कार्यरत आहेत. त्यांची पोलीस दलातील कामगिरी अतिशय प्रशंसनीय राहिली आहे. पोलीस महासंचालक यांच्याकडून त्यांना उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून ३ वेळा सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे सर्वोत्कृष्ट अन्वेषणाचे पदकही त्यांना मिळाले आहे. यापूर्वी त्यांचे 'माझं गडप्रेम' हे पुस्तक प्रकाशित झाले असून ते इतके वाचकप्रिय ठरले, की आता त्याची तिसरी आवृत्ती येत आहे.
पोलीस दलात प्रवेश करण्यापूर्वी लेखक शिक्षक होते. त्यामुळे ह्या शिक्षकाची विश्लेषणाची आणि विषय सोपा करून सांगण्याची शैली ह्या पुस्तकाच्या पानोपानी जाणवते. लेखकाने ह्या पुस्तकाची मांडणी अतिशय नियोजनपूर्वक चार विभागांत केली आहे. पहिल्या विभागात केवळ स्पर्धा परीक्षेच्याच नव्हे, तर सर्वच विद्यार्थ्यांशी वेगवेगळ्या विषयांवर मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधला आहे. उदाहरणार्थ, झोप माणसाला कितीही प्रिय असली, तरी विद्यार्थी जीवनात ती एक नंबरचा शत्रू ठरते. विद्यार्थ्यांनी झोपेवर नियंत्रण मिळवले, तर आपण असाध्य ते साध्य करू शकतो, असा विश्वास पहिल्याच प्रकरणात दिला आहे. विद्यार्थ्यांना व्यायामाचे आणि योगासनांचे महत्त्व पटवून दिले आहे. बारीकसारीक सवयींच्या बाबतीत विद्यार्थ्यांना सावध केले आहे. चांगल्या सवयी व्यक्तिमत्त्वाला घडवतात, तर वाईट सवयी मनुष्याला बिघडवतात, असा खणखणीत इशाराही दिला आहे. युवा पिढी आहाराच्या बाबतीत फारच बेफिकीर असते. त्या बाबतीतही प्रेमळपणे मार्गदर्शन केले आहे.
दैनंदिनी किंवा रोजनिशी लिहिणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी स्वतःचे उदाहरण देऊन पटवून दिले आहे. सर्वात महत्त्वाचे असतात आपले आईवडील आणि आपले कुटुंब. लेखकाने एका लेखात आईवडलांच्या त्यागाची आणि समर्पणाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले आहे. समाजातील कष्टकरी वर्गाकडे, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीकडे युवकांचे लक्ष वेधले आहे. जीवनाने संधी दिली असता त्या संधीचे सोने करता आले नाही, की आयुष्याची माती होते, अशा परखड शब्दांत जाणीव करून दिली आहे. करिअरच्या मार्गावर वाटचाल करत असताना आपल्यासमोर एखादा आदर्श हवाच! तरुण वयात भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण असणे स्वाभाविक आहे. पाय घसरण्याची, प्रेमात पडण्याची दाट शक्यता याच वयात असते. अशा निसरड्या वयातील तरुण तरुणींना वेगवेगळे किस्से सांगून लेखकाने सावध केले आहे. वेळीच प्रेमाचा रोग बरा झाला नाही, तर त्याचा 'देवदास' होतो, अशा शब्दांत बजावले आहे. शेवटी ते म्हणतात, 'प्रेम करण्यासाठी आयुष्यभर वेळ मिळेल. आता ही दोन - तीन वर्षे मन लावून फक्त अभ्यास करा'.
आयुष्याला सुरुंग लावणारी वस्तू मोबाईलच्या रूपाने विद्यार्थ्यांच्या हातात आली आहे. हा मोबाईल सावलीपेक्षाही अधिक काळ आपल्या सोबत असतो. अशा मोबाईलवेड्या विद्यार्थ्यांना लेखकाने 'चोवीस तासांपैकी बारा तास अभ्यासाचा ध्यास' अशा शब्दांत गुरुमंत्र दिला आहे. युवकांना आभासी जगातून खेचून वास्तविक जगात आणले आहे. काही मुले गरीब परिस्थिती, प्रारब्ध, नशीब ह्या गोष्टींची ढाल पुढे करून पलायनवादी भूमिका स्वीकारतात. अशा पळपुट्या युवकांचे कान पिळताना लेखकाने स्पष्ट शब्दांत सुनावले आहे, 'प्रारब्ध, नशीब ह्या गोष्टी दुबळ्या माणसाच्या संकल्पना आहेत. प्रयत्नवादी माणसे या गोष्टींना तितकेसे महत्त्व देत नाहीत'. या संदर्भात त्यांनी विकास नाईक आणि कृष्णात पिंगळे ह्या ध्येयवादी युवकांच्या यशोगाथा सांगितल्या आहेत. विद्यार्थिदशेत चुकून जरी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मित्राची संगत लागली, तर आयुष्याचे कसे नुकसान होते, याचे काही दाखले दिले आहेत. 'एका क्षणाचा राग, एका क्षणासाठी हीरोगिरी करण्याची तुमची धडपड, आयुष्यभरासाठी आपली अंधा-या कोठडीत रवानगी करते', अशा शब्दांत बेसावध युवकांचे डोळे उघडले आहेत.
पुस्तकाच्या पहिल्या भागात विद्यार्थी जीवनासाठी सर्वसाधारण माहिती दिल्यानंतर दुसर्या भागात लेखकाने स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. सुरुवातीला स्पर्धा परीक्षांविषयी पायाभूत माहिती दिली आहे. अलीकडे एमपीएससी आणि यूपीएससी हे परवलीचे शब्द बनले आहेत. स्पर्धा परीक्षांचा श्रीगणेशा कधी करावा? या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी कोणत्याही पदवीच्या पहिल्या वर्षापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे सांगितले आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना दरवर्षी ३ ते ५ लक्ष विद्यार्थी बसतात. उलट पदांची संख्या काही हजारांत असते. हे व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यापूर्वी स्वतःला ८ प्रश्न विचारायला हवेत. ते प्रश्न कोणते आहेत, हे पुस्तकातच वाचले पाहिजेत. शेवटी लेखकाने म्हटले आहे : 'यशस्वी झालो, तर स्वर्गसुद्धा थिटा पडतो आणि अयशस्वी झालो, तर नरकसुद्धा अपुरा पडतो'. ह्या विधानावरून स्पर्धा परीक्षांचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. यशस्वी डावपेच आणि मनस्वी अभ्यास ह्या शब्दांत यशाचे गुपित सांगितले आहे. आपण स्पर्धा परीक्षांच्या रणांगणातले खरे योद्धे आहोत की बाजारबुणगे आहोत, हे आपल्यालाच ठरवायचे आहे, असेही म्हटले आहे.
एखाद्या विद्यार्थ्याला अनेक वेळा प्रयत्न करूनही स्पर्धा परीक्षेत यश येत नाही. असा युवक डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. कदाचित त्याची आवड आणि हुशारी इतर क्षेत्रात त्याचे करिअर निर्माण करू शकते. अशा परिस्थितीत निराश न होता प्लॅन बी तयार ठेवावा, असा
सबुरीचा सल्ला दिला आहे. स्पर्धा परीक्षा हे एकमेव करिअर क्षेत्र असूच शकत नाही, अशा शब्दांत युवकांना धीर दिला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना मित्र आणि मैत्रीची भूमिका किती महत्त्वाची असते, हे लेखकाने आपले आपल्या मित्रांचे उदाहरण देऊन पटवून दिले आहे. पृष्ठ क्रमांक ९३ आणि ९४वरील ते वर्णन मुळातून वाचण्यासारखे आहे.
त्यातून मैत्रीची ताकद लक्षात येते. लेखकाने बालपणापासून पोलीस अधिकारी बनण्याचा अक्षरशः ध्यास घेतला होता. नेमके वाचन, मुद्देसूद लेखन, चिंतन आणि उजळणी, प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव, वेळेची बचत, योग्य मार्गदर्शन, अचूक दिशेने वाटचाल करून लेखकाने अखेर अधिकारी पदाला गवसणी घातलीच! इथे आकर्षणाचा सिद्धान्त अनुभवाला येतो.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मौजमजा, सण, उत्सव, सेलिब्रेशन, मित्र, पार्टी, प्रवास आणि टाईमपास या सर्व गोष्टींना पूर्णपणे बाजूला सारून अभ्यासाचे नियोजन करावे, असा मित्रत्वाचा सल्ला दिला आहे. लोक पोलिसांकडे फक्त रक्त आणि अश्रू घेऊन येतात, अशा शब्दांत समाजातील कठोर वास्तव मांडले आहे. 'लोकसेवा आयोगाची फसवणूक कराल, तर जेलमध्ये जाल' ह्या प्रकरणात लेखकाने 'एक वेळ यश मिळाले नाही, तरी चालेल पण गैरमार्गाचा वापर करून जेलची हवा खाणे कधीच परवडणारे नाही' अशा शब्दांत सावधगिरीचा इशारा दिला आहे. तुम्ही कष्टपूर्वक अधिकारी झालात, तरी आपण आपले जुने दिवस विसरू नयेत. आपण ज्यांच्यासाठी अधिकारी झालो आहोत, त्या सर्वसामान्य माणसांची काळजी घ्यावी, अशी जाणीव करून दिली आहे.
पुस्तकाच्या पहिल्या दोन भागांत लेखकाने स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीची माहिती दिली आहे. तिसऱ्या विभागात प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती दिली आहे. पुस्तकांचे वाचन करताना 'पोमोडोरो' तंत्र कसे अवलंबावे, याविषयी मार्गदर्शन केले आहे. हस्ताक्षर हा शालेय जीवनापासूनच दुर्लक्षित असा विषय आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये दीर्घोत्तरी प्रश्न सोडवावे लागतात. त्यासाठी हस्ताक्षर चांगले असणे आवश्यक आहे. म्हणून लेखकाने सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व पटवून दिले आहे. पुस्तके वाचून नोट्स कशा काढाव्यात, याची शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे. केलेल्या अभ्यासाचे चिंतन, मनन व उजळणी करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ग्रूप डिस्कशन किंवा गटचर्चा हा भाग अतिशय महत्त्वाचा असतो. त्यासाठी कोणती पथ्ये पाळावीत, याबद्दल अवगत केले आहे. नकाशावाचन ही अशीच एक दुर्लक्षित आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्याबद्दल काही युक्तीच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व्हायचे असेल, तर त्यासाठी शारीरिक क्षमता ही पायाभूत बाब आहे. शारीरिक वजन, उंची, छाती, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, पुलअप्स, धाावणे इ. कसोट्यांची काटेकोर नियमावली समजावून सांगितली आहे. परीक्षागृहात प्रवेश करण्यापूर्वी सोबत कोणकोणते साहित्य घेऊन जायचे, याविषयी नेहमीच गडबड गोंधळ होतो. पेन, स्केल, पॅड आणि घड्याळ ही साधने सगळेच वापरतात, पण लेखकाने या संदर्भातील अनेक बारकावे निदर्शनास आणून दिले आहेत. स्पर्धा परीक्षा हे एक युद्ध आहे आणि ह्या युद्धात आपण सर्व शस्त्रे सोबत घेऊन तयारीनिशी उतरायला हवे, अशी मल्लिनाथी केली आहे. सलग चार पाच वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, यशापयशाच्या हिंदोळ्यावर झुलत असताना खूप मानसिक ताण येतो. त्या ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी एखादा छंद जोपासणे किती गरजेचे आहे, हे लेखकाने फारच छान विशद केले आहे. शिवाय तुमच्या मुलाखतीच्या वेळी छंदाविषयी प्रश्न विचारले जातात, ते वेगळेच!
स्पर्धा परीक्षेतील शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा असतो मुलाखतीचा. मुलाखतीत तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होत असते. पॅनेलमधील तज्ज्ञ मंडळी तुमचे सर्वांगाने परीक्षण- निरीक्षण करीत असते. मुलाखतीतील विजय म्हणजे तुमचा अंतिम विजय असतो. ह्या मुलाखतीची तयारी कशी करावी आणि मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे कसे जावे, आपली वेशभूषा, केशभूषा, बोलण्याची शैली आणि शिष्टाचार याविषयी तपशीलवार मार्गदर्शन केले आहे. ह्या पुस्तकातील शब्द म्हणजे केवळ छापील शब्द नव्हेत, तर ते लेखकाचे अनुभवाचे बोल आहेत आणि म्हणूनच ते अनमोल आहेत.
प्रस्तुत पुस्तकातील चौथा आणि शेवटचा भाग एखाद्या परिशिष्टासारखा वस्तुनिष्ठ आणि माहितीपूर्ण आहे. यात राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, वैकल्पिक विषयांची यादी, कंबाईन प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, परीक्षेची योजना, गुणदान योजना, कंबाईन परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणारी पदे, शारीरिक चाचणीचे अर्हता निकष, गुणवत्ता यादी तयार करण्याची पद्धत, यूपीएससीच्या माध्यमातून भरली जाणारी विविध पदे, त्या परीक्षेतील मुख्य विषय, विविध परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके अशी सगळी तपशीलवार माहिती दिली आहे. हे पुस्तक म्हणजे स्पर्धा परीक्षांचा वाटाड्या आहे, गाईड आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही.
लेखकाने ह्या पुस्तकाला दिलेली 'विद्यार्थ्याला कर्तव्याची आणि कर्तृत्वाची जाणीव करून देणारे पुस्तक' ही टॅग लाईन अगदी यथार्थ आणि समर्पक आहे. लेखकाने नवागतांना उपदेश करण्यासाठी म्हणून हे पुस्तक लिहिलेले नाही, तर 'आधी केले मग सांगितले' असे ह्या पुस्तकाचे स्वरूप आहे. 'हे मी माझ्या भावंडांना सांगितलेच पाहिजे' ह्या अपरिहार्यतेतून हे लेखन अवतरले आहे. लेखकाने विद्यार्थ्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षेविषयीची भीती दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचाही जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. तारुण्यावस्थेतील प्रलोभनांपासून दूर राहण्यासाठी सजग-सावध केले आहे. तारुण्यसुलभ गोडगुलाबी स्वप्ने आणि कठोर जीवनवास्तव यातील भेदाची जाणीव करून दिली आहे. ही जाणीव करून देत असताना लेखकाच्या शब्दांना वेगळीच धार आली आहे.
'विद्यार्थीधर्म' ह्या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने विद्यार्थ्यांना मोठी स्वप्नं पाहायला आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करायला शिकविले आहे. ध्येयवादी बनायला शिकविले आहे. ह्या पुस्तकाला लेखकाच्या दाहक अनुभवाचे आणि सत्शील आचरणाचे भक्कम अधिष्ठान लाभले आहे. ह्या पुस्तकात लेखकाचे जीवनविषयक आणि समाजजीवनविषयक अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि टोकदार चिंतन दिसून येते. युवा पिढीचे पाय जमिनीवर राहावेत, त्यांना कठोर वास्तवाची जाणीव व्हावी, यासाठी लेखकाने वाचकांचे लक्ष कष्टकऱ्यांच्या श्रमाघामाकडे वेधले आहे. लेखकाने कृतज्ञता हे मूल्य कटाक्षाने पाळले आहे.
लेखकाची ओघवती भाषाशैली ही ह्या पुस्तकातील सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. ही भाषा प्रसंगी मृदू - मवाळ बनते आणि प्रसंगी परखड आणि सडेतोड बनते. उन्मार्गी बनत चाललेल्या एखाद्या मुलाच्या मुस्कटात खाडकन मारून त्याचे डोळे उघडावेत, तसे हे पुस्तक प्रभावी आणि परिणामकारक झाले आहे.
लेखकाने आपला प्रतिपाद्य विषय समजावून सांगण्यासाठी आपल्या जीवनातील अनेक उदाहरणे आणि दाखले दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्वत्ताप्रचूर न होता आकलनसुलभ, वाचनीय झाले आहे. पृष्ठ क्रमांक ५६वर गर्दीचे मानसशास्त्र फारच छान वर्णन केले आहे.
पोलिसी तपासाचे विविध रंजक आणि उद्बोधक किस्से सांगितले आहेत. लेखकाची वर्णनशैली इतकी चित्रदर्शी आहे, की वाचत असताना ते चित्र आपल्या नजरेसमोर साकार होते. एखादा चलत्चित्रपट पाहतो आहोत, असे आपल्याला वाटते. आजच्या पिढीतील युवकांना प्रेरणा मिळावी, यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टाने आणि जिद्दीने यशस्वी झालेल्या काही तरुणांच्या संघर्षगाथा आणि यशोगाथा सांगितल्या आहेत. हे सर्व वर्णन करत असताना लेखकाची लेखणी कुठेही भावनाशील किंवा एकांगी होत नाही. उलट लेखकाने प्रत्येक विषयावर अतिशय संतुलित विचार मांडले आहेत. लेखकाने आणि त्यांच्या मित्रांनी अनुभवलेले हलाखीचे दिवस, त्यांच्यातील परस्परपूरक दृढ मैत्री, जिद्द आणि परिश्रमांचे जे कथन केले आहे, त्यातून लेखकाची ध्येयनिष्ठा आणि संवेदनशीलता दिसून येते.
ह्या संपूर्ण लेखनात कुठेही नकारात्मकता नाही. कमालीची सकारात्मकता हा ह्या पुस्तकाचा ठळक विशेष आहे. हे पुस्तक वाचकाला स्वतःसोबत समाजाचाही विचार करायला भाग पाडते. लेखकाने एका प्रेमळ शिक्षकाच्या, हितचिंतक मित्राच्या आणि कल्याणकारी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून हे पुस्तक लिहिले आहे. यात लेखकाचा कोणताही आवेश नाही किंवा अभिनिवेश नाही. बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय हा लेखकाचा उदात्त हेतू ह्या पुस्तकाच्या पानोपानी प्रतीत होतो. वरील मजकुराशिवाय, वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी पुस्तकाच्या प्रत्येक पानावर एकेक प्रेरणादायी विचार छापला आहे. ह्या पुस्तकात नाही, असे काहीच नाही. जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारे हे अतिशय प्रांजळ असे लेखन आहे.
लेखकाने वेळोवेळी ज्येष्ठ लेखक-कवींची अवतरणे उद्धृत केली आहेत. यावरून लेखकाचा व्यासंग आणि बहुश्रुतता दिसून येते. पुस्तकाच्या सुरुवातीला आणि शेवटी छापलेले व्यंकटेश भट, चरणसिंग राजपूत, सागर खर्डे, धर्मेंद्र पवार, कृष्णात पिंगळे, नीलेश शेवाळकर, ऋषीकेश शिंदे, रणजित झपाटे, धनराज पांडे, गणेश बिरादार, विजय पाटील, तानाजी सरावणे, राजेंद्र कचरे, मनोज बोरगावकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि न्या. सुनील वेदपाठक ह्या अधिकारी व्यक्तींचे पुस्तकाविषयीचे अभिप्राय अतिशय बोलके आहेत.
'विद्यार्थीधर्म' हे पुस्तक म्हणजे 'विद्यार्थीधर्मा'ची जीवनाधिष्ठित आचारसंहिता आहे. ह्या आचारसंहितेचे निष्ठेने पालन केल्यास जीवनाचे कल्याण होईल, यात शंकाच नाही. सध्या बाजारात व्यक्तिमत्त्व विकासाची आणि सेल्फ हेल्पची जी पुस्तके उपलब्ध आहेत, त्यात ह्या पुस्तकाचा क्रमांक अगदी वरचा लागतो. बारावी उत्तीर्ण होऊन पदवीच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात हे पुस्तक द्यायला हवे, जेणेकरून तरुण युवकांना दिशा मिळेल आणि पिढीतील यशाचे प्रमाण वाढेल.
'विद्यार्थीधर्म' : लेखक : सूरज गुरव
प्रकाशक : बायफोकल पब्लिकेशन्स, आंबेगाव, पुणे.
मुखपृष्ठ : अतुल भुरेवार, नांदेड.
पृष्ठे : २३६ किंमत रु. ३००
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

addComments
टिप्पणी पोस्ट करा