माझे आजोबा पद्मश्री शामरावजी कदम यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव येथे दि.21 ऑक्टोंबर 1920 साली झाला. माझे आजोबा शामरावजी कदम हे माझ्या आईचे वडील होत. ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्या दिवशी दसरा (विजयादशमी) होता. माझ्या आजोबाचे वडील सखाराम उर्फ बाबाराव कदम पाटील हे निझामी राजवटीत लिंबगावचे पोलीस पाटील होते. पंचक्रोशीत ते वादळी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. अन्यायाच्या विरूद्ध स्वतः लढण्याची त्यांची वृत्ती होती. सर्व सामान्य गोरगरीब शेतकरी, शेतमजुर यांच्यावर नेहमी त्यांची माया असे. आजोबांच्या वडीलांच्यासामाजीक कार्याची छाप माझ्या आजोबांवर आपोआप पडली.
माझे आजोबा शामरावजी कदम यांचे शालेय शिक्षण लिंबगाव येथे झाले. उच्च शिक्षण नांदेड व हैद्राबाद येथे झाले. त्या काळातील कायद्याचे शिक्षण पूर्ण करणारे शामरावजी कदम माझे आजोबा हे खेड्यातील पहिलेच विद्यार्थी होते. त्यांनी काही काळ नांदेड येथे वकिली केली. वकिली करीत असतानाच बीडच्या कै.बलभीमराव कदम यांच्या नेतृत्वाखाली माझ्या आजोबांची शैक्षणिक चळवळीत सहभाग घेतला. गरीब विद्यार्थ्यांकरिता काही तरी केले पाहिजे म्हणून माझ्या आजोबांनी शैक्षणिक चळवळीअंतर्गत नांदेड येथे पहिले नुतन मराठी बोर्डींग सुरू करून शैक्षणिक कार्यातून समाजसेवेत सक्रिय सहभाग घेतला.
वकिली सुरू केल्यानंतर निजामाविरूद्ध झालेल्या चळवळीत गोविंदभाई श्रॉफ, नागनाथराव परांजपे, भगवानराव गांजवे, गोविंदराव पानसरे, साहेबराव बारडकर, जयवंतराव वायपनकर यांच्या समवेत लढ्यामध्ये माझ्या आजोबांनी सहभाग घेतला. याच लढ्यात हिंदु-मुस्लिम यांच्यातील तणाव दूर करून सामंजस्याचे वातावरण तयार करण्यात आजोबांचा सहभाग होता. मात्र माझे आजोबा शामरावजी कदम हे खर्याचे खोटे, खोट्याचे खरे करणार्या वकिली व्यवसायात अधिक काळ रमले नाहीत. त्यांनी वकिली सोडून दिली.
माझ्या आजोबांनी लगेचच समाजकारण सुरूवात केली. आपल्या सडेतोड भूमिकेमुळे शामरावजी कदम सर्वच क्षेत्रात शेवटपर्यंत कार्यरत राहिले. आपल्या मुल्याधिष्ठीत राजकारणाचा व समाजकारणाचा त्यांनी एक वेगळाच ठसा उमटविला. रंजलेल्या-गांजलेल्या माणसांच्या मनाला त्यांनी उभारी दिली. त्यामुळे माझ्या आजोबांच्या सभोवती माणसांची सारखी गर्दी असायची. आजोबा सत्तेच्या खुर्चीत असोत वानसोत माणसांची त्यांनी साथ कधी सोडली नाही. माझे आजोबा खरोखर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांचे कार्यक्षेत्रही विविध अंगांनी बहरलेले होते. माझ्या आजोबांनी नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर ंसंपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी ज्याकांही योजना आखल्या त्या केवळ कागदावरच आखल्या व जाहीर सभेतून बोलण्यापूरत्याच वापरल्या असे नसून त्या योजना प्रत्यक्षात राबविल्या म्हणूनच आज नांदेड जिल्हा व मराठवाडा प्रगतीपथावर असल्याचे आजची पिढी पाहत आहे.
माझे आजोबा पद्मश्री शामरावजी कदम यांचा संचार हा राजकारणापुरताच होता असे नाही. सहकार, शिक्षण,उद्योग, सांस्कृतिक, साहित्यीक, नाट्य, मराठवाडा विकास समिती या सर्वच क्षेत्रात त्यांचा सहभाग हा प्रत्यक्ष कृतीने राहिलेला आहे. समाजकार्य करण्याची जिद्द, महत्वाकांक्षा, उर्मी शामरावजी कदम यांच्यामध्ये होती.
माझे आजोबा 1958 साली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. आपल्या नव्या नव्या प्रयोगाद्वारे सहकारी चळवळीवर त्यांनी आपला ठसा उमटवून सहकार क्षेत्रात पकड बसविली. जिल्हा बँकेपासून ते राज्य शिखर बँकेच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात सतत अनेक वेळा पडत गेली. त्यांच्या कर्तबगारीने त्यांनी सहकारच्या माध्यमातून शेतकर्यांच्या घरात त्यांच्या दैनंदिन व्यवसायात उपयोगी पडतील अशा उत्पादन विक्री आणि प्रक्रिया यात सहकारी बँकेच्या माध्यमातून हातभार लावून आजोबांनी शेतकर्यांची मने जिंकली. त्याद्वारे जिल्हा तालुका खरेदी विक्री संघाची निर्मिती झाली. कलंबर सहकारी साखर कारखाना, वाजेगावची मराठवाडा सहकारी सुतगिरणी, बिलोली तालुक्यातील अर्जापुरचा सिमेंट पाईप कारखाना हे सर्व माझ्या आजोबांच्या कल्पनेतून उभे राहिले. माझे आजोबा स्वकर्तृत्ववारच पुढे आले.
निझामी राजवटीतून मुक्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकर्यांना सावकारशाहीने पुरूे नागविले होते. सावकाराकडून ऋण (कर्ज) काढून शेतकरी कधी बँकेच्या नादी लागलाच नाही. परंतु माझ्या आजोबांनी शेतकर्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून बँक व्यवहार समजावून दिला. सावकारशाहीच्या चक्रव्यहारातून शेतकर्यांना त्यांनीखर्या अर्थाने मुक्त केले. माझ्या आजोबांचा सर्वत्र दरारा होता. माझे आजोबा शारदा भवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष होते. शारदा भवन हायस्कूल पासून ते यशवंत कॉलेज, लॉ कॉलेज, फार्मसी कॉलेज, बी.एड.कॉलेज, महात्मा फुले हायस्कूल, नांदेड, इंदिरा गांधी हायस्कूल सिडको नांदेड, सावित्रीबाई फुले कन्याशाळा नांदेड या सर्व शैक्षणिक संस्थांचे आजोबा आधारवड होते. धर्माबादचे लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय, जांबचे नीती निकेतन विद्यालय या सार्या शिक्षण संस्था पद्मश्री शामरावजी कदमांनी नावारूपाला आणल्या.
माझ्या आजोबांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व खेडे फिरून पिंजून विकसित केले. त्यामुळेच पद्मश्रीच्या हजारो कार्यकर्त्यांचे ग्रामीण भागात जाळे विणल्या गेले. सर्वाच्या हातात-हात देऊन, सर्वांना बरोबर घेवून जाण्याचा माझ्या आजोबांचा स्वभाव असल्याने ते सर्वत्र लोकप्रिय होते. त्यांनी माणसे जोडण्याचे काम केले. त्यांनी माणसे कधी तोडली नाहीत. त्यांनी सहकार व पंचात राज्य संकल्पना उत्तमरितीने राबविली. कोणतेही काम हाती घेतले तर ते निष्ठेने व यशस्वीरित्या पार पाडत असत. निष्ठेने काम करण्याची सवय त्यांनी स्वतःला लावून घेतली होती. माणे आजोबा सामान्यातील असामान्य नेतृत्व होते. त्यांची लोकशाही कार्यपद्धती वाखाणण्यासारखी होती. बैठकीत कितीही गंभीर प्रश्न असला तरी ते सर्वांना बोलते करीत आणि आपले दडपण खादीच्या साध्या कार्यकर्त्यावर ही येऊ नये याची दक्षता ते घेत असत. एखाद्या प्रश्नांची तात्विक चर्चा मयादीत होऊ द्यायची आणि त्यावर व्यवहारिक तोडगा चटकन सुचवायचा यात त्यांचे कमालीचे कौशल्य होते. सत्तेसाठी किंवा पदासाठी हल्ली दिसून येणारी लाचारी आणि हांजी हांजी वृत्ती त्यांच्यापासून कोसो दूर होती. माझे आजोबां पद्मश्री शामरावजी कदम हे एक ताठ मानेचे, रोख ठोक बोलणारे, निःस्पृह, स्वाभिमानी पण प्रेमळ व सेवाभावी व्यक्तिमत्व होते. त्यांनी सहकार, प्रशासन, शिक्षण, उद्योग, कृषी, संगीत, साहित्य इत्यादी क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली. त्यांनी अनेक मोठीमोठी पदे भूषविली. दिगंत किर्ती संपादन केली. परंतु आपल्या वागण्या, बोलण्यातला, राहणीमानातला साधेपणा त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही. माझ्या आजोबांनी अनेक विधायक कामे आयुष्यभर केली. मूल्य विरहित व सत्ताकांक्षी राजकारणाच्या भाऊ गर्दीत माझ्या आजोबासारखी माणसे दुर्मिळच आहेत. त्यांनी केलेले कार्य नव्या पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आहे. थोडक्यात माझे आजोबा म्हणजे व्यक्ति एकःपॅले अनेक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन!
डॉ.शितलताई भालके (वैद्य)
मो.9422189274

COMMENTS