राठोडांच्या राजीनाम्याची मागणी करुन सेनेत वजन वाढलेल्या एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी शिवसेनेतील दुसरा गट सक्रिय झाला आहे.
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड हे रडारवर असताना, आता शिवसेनेमध्ये त्यांच्या राजीनाम्यावरुन दोन गट पडले आहेत. संजय राठोड हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातले मानले जात असून, राठोडांच्या राजीनाम्याची मागणी करुन सेनेत वजन वाढलेल्या एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी शिवसेनेतील दुसरा गट सक्रिय झाला आहे. या दुसऱ्या गटात शिवसेना खासदार भावना गवळी असून, गवळी-राठोड यांच्यामधील वाद सर्वश्रुत आहेत. त्यामुळे आता भावना गवळी यांचा एक गट संजय राठोड यांच्या विरोधात असल्याचे खाजगीत बोलले जात आहे. तसेच भावना गवळी यांच्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील बाजोरिया, देशमुख यांच्यासारखे नेते देखील राठोडांच्या विरोधात आहेत.
राठोड शिंदे गटातले
शिवसेनेमध्ये वजनदार नेते म्हणून ओळख असलेल्या नगरविकास मंत्री यांचा शिवसेनेत एक गट आहे. या गटामध्ये संजय राठोड सुद्धा आहेत. त्यामुळे संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करून शिंदे गटाला धक्का देण्याचा इरादा शिंदे विरोधक गटाचा असल्याचे खाजगीत सांगितले जात आहे. त्याचमुळे आता एका गटाकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याशी खाजगीत बोलले असता त्यांनी मात्र शिवसेनेत दोन गट नसल्याचे सांगत, संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यामध्ये काही मतभेद होते मात्र लोकसभा निवडणुकीआधी ते मिटल्याचे सांगितले.

COMMENTS