नांदेड. (प्रतिनिधी) भरधाव टँकरच्या जबर धडकेने दुचावरीवरील एक १५ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. ही घटना ६ जून रोजी दुपारी पावणेबारावाजेदरम्यान, नांदेड ते लातूर महामार्गावरील वसरणी परिसरातील दूध डेअरी चौकात घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नांदेडातील रहिमपूर, वसरणी येथील रहिवासी व १५ वर्षीय शाळकरी मुलगा शेख शोहेब शेख कलीम हा ६ जून रोजी दुपारी पावणेबारा वाजेच्यादरम्यान, त्याचा मित्र मिर युनूस अली मिर खुर्सीद अली याच्या (एमएच-२६, एडब्लू- ८७८२) या दुचाकीवर पाठीमागे बसून नांदेडच्या 'सिडको' परिसरातील माता रमाई आंबेडकर चौक तथा ढवळे कॉर्नरकडून गोदावरी नदीवरील नावघाट पुलाकडे जात होता. दरम्यान, नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय दूध डेअरी चौकात एमएच-१४, एचयु-१४६२ या टँकरच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून उपरोल्लेखित दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात शेख शोहेब याच्या डोक्याच्या उजव्या बाजूस आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा करूण अंत झाला. त्याचवेळी, उपरोक्त दुचाकीचा चालक मिर युनूस अली मिर खुर्सीदअली (रा.रहिमपूर-वसरणी नांदेड) हा जखमी झाला असून, या अपघातात त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार तथा सहाय्यक पोउपनि. डी. एन. मोरे खैरकेकर व मदतनीस महिला पो. कॉ. अश्विनी मस्के यांनी दिली आहे.
याप्रकरणी मयत मुलाचे काका शेख जावेद शेख ईसाक (रा. रहिमपूर-वसरणी, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात अखेर आरोपी टँकरच्या चालकाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व त्यांचे सहकारी-कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
COMMENTS