नांदेड. (प्रतिनिधी) 'बार'करिता आवश्यक असलेला सकारात्मक अहवाल तसेच 'ना'हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार रूपये लाच स्विकारून...
नांदेड. (प्रतिनिधी) 'बार'करिता आवश्यक असलेला सकारात्मक अहवाल तसेच 'ना'हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार रूपये लाच स्विकारून तक्रारदाराचा संशय आल्याने ईस्लापूर ठाण्यातील नाईक पो.कॉ. रामेश्वर आलेवाड हा पळून गेला आहे. ही घटना ८ जून रोजी दुपारी नांदेड जिल्ह्यातील ईस्लापूर येथे घडली.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील ईस्लापूर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या ३४ वर्षीय रामेश्वर आनंदराव आलेवाड यांनी प्रस्तुत प्रकरणातील 'तक्रारदार' यांच्या 'बार'चे नाहरकत प्रमाणपत्र व त्यासंदर्भात 'सकारात्मक' अहवाल देण्यासाठी १२ हजार रूपये लाचेची मागणी केली. या प्रकरणातील संबंधित तक्रारदार पुरूष (वय-४८, रा. ईस्लापूर जि. नांदेड) यांची ३० मे रोजी 'एसीबी'कडे तक्रार प्राप्त झाली. तद्नंतर 'एसीबी' अर्थातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून १ जून रोजी या प्रकरणाची पडताळणी झाली.
विशेष बाब म्हणजे, ८ जून रोजी उपरोल्लेखित पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस नाईक आलेवाड याने पंचासमक्ष १२ हजार रूपये लाचेची मागणी केली. याशिवाय, आरोपी आलेवाड हा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने स्वतः १२ हजार रूपये लाच स्विकारली. त्याचवेळी, आरोपी पो. ना. रामेश्वर आलेवाड यांना या प्रकरणातील तक्रारदार यांचा संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम घेवून पळून गेले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
उपरोल्लेखित कारवाई ही 'एसीबी' तथा लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड विभागाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व पोलीस उप अधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहूल पखाले व त्यांचे सहकारी पोलीस हे. कॉ. बालाजी तेलंगे, पोलीस नाईक गणेश केजकर, गणेश तालकोकुलवार, सचिन गायकवाड आणि शेख मुजीब यांच्या पथकाने केली आहे.

COMMENTS