नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलिसउपनिरीक्षकासह  एक जवान शहीद, तिघे जखमी

 






गडचिरोली{ खास प्रतिनीधी }  १७ मे


  जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील घनदाट जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असलेल्या पोलिस पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात अतिशीघ्र कृती दलाचा पोलिस उपनिरीक्षक आणि विशेष अभियान पथकाचा एक जवान शहीद झाले आहेत. सोबतच गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकाचे तीन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.



नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने (३०) व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात आज सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास शीघ्र कृती दल व सी-६० पथकाचे जवान आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी प्रथम भूसुरुंगस्फोट घडवून लगेच गोळीबार केला, अशी माहिती आहे. पोलिसांनीही गोळीबाराने नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, यात पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले, तर गोंगलू ओक्सा, राजू पुसली व दसरु कुरचामी हे जवान जखमी झाले. दसरु कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर आहे.


शहीद जवानांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले, तर जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शहीद धनाजी होनमने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत.


२ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली व कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सृजनक्का हिला कंठस्नान घातले होते. तिच्या हत्येचा निषेध म्हणून नक्षल्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावून २० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी हिंसक कारवाया करणे सुरु केले आहे. अशात ही घटना घडल्याने गडचिरोलीसह राज्यात खळबळ उडाली आहे.




टिप्पण्या