पुणेहून चंद्रपूरला जाणाऱ्या होमगार्डांच्या ट्रॅव्हल्सचा उनकेश्वर येथे भीषण अपघात 48 होमगार्ड जखमी, 3 जणांची प्रकृती गंभीर

 

किनवट प्रतिनिधी : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड निवडणूक कर्तव्य पूर्ण करून परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या खासगी ट्रॅव्हल्सचा आज दुपारी 2.10 वाजता उनकेश्वर–माहूर मार्गावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 48 होमगार्डांसह एकूण 50 जण जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 192 होमगार्ड पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गेले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार खासगी ट्रॅव्हल्समधून ते चंद्रपूरकडे परतत होते. यापैकी ट्रॅव्हल्स क्रमांक MH-03 CP 3279 ही माहूर–उनकेश्वर मार्गावर असताना, त्यांच्या पुढे जाणाऱ्या कारने पुलावरील खड्डे टाळण्यासाठी अचानक ब्रेक मारला.
मागून वेगात येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाने कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र समोरील वाहनाचा वेग अचानक कमी झाल्याने जोरात ब्रेक दाबण्यात आला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून सुमारे 15 फूट खोल खड्ड्यात ट्रॅव्हल्स कोसळली आणि भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड, पोलीस कर्मचारी मनीष ठाकरे यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना उमरी बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देण्यात आले.
या अपघातात सुरज गेडाम (वय 32, रा. परोटी, जि. चंद्रपूर) हा ट्रॅव्हल्सखाली अडकला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फौजदार गायकवाड यांनी तात्काळ जेसीबी मागवून त्याला बाहेर काढले. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या दुर्घटनेनंतर ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे उनकेश्वर–माहूर मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प होती.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी माहूरचे किरण भोंडवे, किनवट उपविभागाचे अधिकारी मळघणे, तसेच मांडवी व सिंदखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी बचावकार्यात मोलाची मदत केली.
टिप्पण्या