तुळजापूर दि. १०
तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयात साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार हे होते. या वेळी विचारपीठावर सुप्रसिद्ध लेखिका डॉ. मथु सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बापूराव पवार यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या लेखन व कार्याचा परिचय करून दिला.
'ग्रामीण विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने' ह्या विषयावर बोलताना डॉ. सुरेश सावंत म्हणाले, की हल्ली शिक्षणात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कष्टपूर्वक गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन आपले जीवन यशस्वी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मन आणि मेंदू यांच्या समन्वयातून विद्याध्ययन करून हिमतीने स्पर्धेत उतरले पाहिजे. अवांतर वाचनाचे महत्त्व विशद करताना डॉ. सावंत म्हणाले, की पुस्तके ही माणसाचे मन-मस्तक घडवतात आणि माणसाला कोणासमोरही लाचारीने नतमस्तक होऊ देत नाहीत. वाचनातून माणसाचा स्वाभिमान जागा होतो. माणसाला चौफेर ज्ञान अवगत होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच अवांतर वाचन - लेखन केले पाहिजे. आपले ध्येय निश्चित असेल, तर कोणतीही परिस्थिती आपल्याला अडवू शकत नाही, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
डॉ. सावंत यांनी आपला कष्टमय जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून विद्यार्थ्यांना अंतर्मुख आणि विचारप्रवृत्त केले. ते म्हणाले की शेतीतील सर्व प्रकारची कष्टाची कामे करूनसुद्धा आपण शिक्षणात यशस्वी होऊ शकतो. किंबहुना ते आवश्यकच आहे. त्यासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये जिद्द, चिकाटी व सातत्य असणे आवश्यक आहे. वाचन आणि लेखन ह्या माणसाच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. बापूजी साळुंखे ह्या महामानवांच्या विचारांचे आणि कार्याचे अनुसरण करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. आजचे आपले शिक्षण आत्मा हरवून बसल्याबद्दल डॉ. सावंत यांनी या वेळी खंत व्यक्त केली.
डॉ. सावंत सरांनी आपल्या भाषणातून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणेची ठिणगी पेटवली, अशा शब्दांत प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी गौरव केला. ह्या व्याख्यानात उपस्थित विद्यार्थी अक्षर मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. बापूराव पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. एम. आर. आडे, कनिष्ठ विभाग स्टाफ सेक्रेटरी प्रा. एस. पी. वागतकर, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील स्टाफ, संशोधक विद्यार्थिनी कु. बालिका भागवत तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. प्रा. डॉ. शिवहार विभुते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा