मुंबई : भारतातील कामगारांनी संघर्षातून मिळविलेल्या २९ कामगार कायद्याचे ४ लेबर कोड मध्ये रूपांतर करून कामगार वर्गाला देशोधडीला लावणाऱ्या केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या व कामगार धोरणाविरुद्ध मुंबईमध्ये बॅलार्ड पिअर येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कार्यालयाजवळ मुंबई बंदरातील सर्व गोदी कामगार संघटनांनी संयुक्पणे तीव्र निदर्शने करून आपला निषेध नोंदविला.
मुंबई पोर्टमधील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, शोअर फ्लोटीला वर्कर्स असोसिएशन, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समिती, मुंबई पोट ट्रस्ट एस. सी. एस.टी.अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी जेवणाच्या सुट्टीत मालकथर्जिण्या चार लेबर कोडविरुद्ध बंदर व गोदी कामगारांनी तीव्र निदर्शने केली.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, चार लेबर कोडमुळे संपासारखे कामगारांचे शेवटचे हत्यार नष्ट केले आहे. कामगार संघटनांचे अस्तित्वच संपले असून, यापुढे हायर आणि फायर पॉलिसी येईल. कायम स्वरूपाच्या नोकऱ्या संपुष्टात येऊन, ठराविक कालावधीच्या नोकऱ्या येतील. यापुढे कामगारांना पगारवाढ, पेन्शन, वैद्यकीय सुविधा टिकवून ठेवणे फार कठीण जाणार आहे. ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरसी पारेख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, चार लेबर कोड हे मालकांना खुश करून कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे कायदे आहेत. भविष्यात पगार व पेन्शनवाढीचे करार होणार की नाही, याची शास्वती नाही. या कायद्यामुळे कामगारांचा संपाचा अधिकारच काढून घेतलेला आहे. चार लेबार कोड विरुद्ध भारतील दहा केंद्रीय कामगार संघटना एकत्रित येऊंन लढा देत आहेत. या लढ्यामध्ये सर्व गोदी कामगारांनी सहभागी झाले पाहिजे. भावी पिढीला वाचवायचे असेल तर, या संघर्षामध्ये सर्व कामगारांनी सहभागी होणे ही काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यातील पिढी ही आपल्याला माफ करणार नाही. कामगारांनी संघर्षातून मिळविलेले कामगार कायदे टिकविण्यासाठी सर्व उद्योगधंद्यातील कामगारानी एकजुटीने लढा दिला पाहिजे.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्र हिंदू मजदूर सभेचे अध्यक्ष निवृत्ती धुमाळ, मुंबई पोर्ट ट्रस्ट एम्प्लॉईज पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मीनाल मेंडोसा, फ्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे उदय चौधरी मुंबई पोर्ट प्राधिकरण लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी.एसटी अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी गिरीश कांबळे, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियनचे पदाधिकारी बी. बी. आहेर आदी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे सेक्रेटरी मनीष पाटील यांनी केले, तर आभार युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे यांनी मानले. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, युनियन पदाधिकारी अहमद काझी, आप्पा भोसले, मीर निसार युनूस, संतोष कदम, सी.एस.मुर्ती, बबन मेटे आदी मान्यवर, कामगार आणि कंत्राटी महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा