आसाराम लोमटे यांचा 'वाळसरा' : सामाजिक पतनाचा लख्ख आरसा डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

आसाराम लोमटे हे मराठीतील एक महत्त्वाचे कथाकार आणि कादंबरीकार आहेत. ते सध्या परभणी येथे 'लोकसत्ता' दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची 'होरपळ' ही पहिली कथा १९९५मध्ये 'सत्याग्रही'मध्ये प्रकाशित झाली. लोमटे यांनी लघुकथेचा पारंपरिक राजमार्ग सोडून दीर्घकथेचा महामार्ग अवलंबला. लोमटे यांचे 'आलोक', 'इडा पिडा टळो' आणि 'वाळसरा' हे तीन कथासंग्रह, 'तसनस' ही कादंबरी आणि 'धूरपेर' हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या काही कथांचे हिंदी आणि कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत. त्यांच्या 'बेइमान' ह्या कथेवर 'सरपंच भगीरथ' हा चित्रपट तयार झाला आहे. दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून या विषयावर लिहिलेल्या लेखांचा 'साधना' साप्ताहिकाने एक विशेषांक प्रकाशित केला आहे. 

लोमटे यांच्या 'आलोक' ह्या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार, भैरू रतन दमाणी पुरस्कार, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार, सह्याद्री नवरत्न पुरस्कार, भि. ग. रोहमारे पुरस्कार, नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा अ. वा. वर्टी पुरस्कार इ. पुरस्कारांनी लोमटे यांचे साहित्य सन्मानित झाले आहे.

आसाराम लोमटे यांचा 'वाळसरा' हा कथासंग्रह शब्द पब्लिकेशनने २०२३मध्ये प्रकाशित केला आहे. ह्या संग्रहात पाच दीर्घकथा आहेत.

'वाळसरा' ही ह्या संग्रहातली पहिलीच कथा ग्रामीण भागातील, एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांतील आणि दोन भिन्न प्रवृत्तींमधील सुप्त मानसिक संघर्ष अधोरेखित करते.

भुजा महादा खरात हा एकेकाळचा भूमिहीन शेतमजूर हा ह्या कथेचा नायक आहे. हा भुजादा पूर्वी गावात सालदार म्हणून काम करायचा आणि कसंबसं पोट भरायचा. त्यांच्या गावचा एक माणूस पशुधन विकास अधिकारी होता. त्याच्या शेतावर भुजादा सालदार म्हणून काम करायचा. तो पशुधन विकास अधिकारी गावातील गरिबांना अनुदानावर दहा शेळ्या आणि एक बोकड मिळवून द्यायचा. आपल्याला ह्या योजनेचा लाभ मिळावा, म्हणून काही लोक त्याला आधीपासून पैसे देऊन ठेवायचे. आधीपासून जवळीक राहावी, यासाठी काही लोक त्यांच्याकडे सालदार म्हणून राहायचे. भुजादा हा त्यापैकीच एक इमानदार सालदार होता. पण त्याला ह्या योजनेचा लाभ कधीच मिळाला नाही. अखेर कंटाळून तो दुसरीकडेच सालदार म्हणून राहिला.

दोन वर्षानंतर भुजादाच्या घरी पोस्टाने एक कागद आला. त्यात लिहिलं होतं : तुम्ही पशुधन विकास योजनेंतर्गत जो लाभ उचलला होता, त्यातली कर्जाची रक्कम सरकारने माफ केली आहे. सबब, आता कर्जाची परतफेड करण्याची गरज नाही. आपले अनुदान कर्जाच्या रकमेसह माफ करण्यात आले आहे.

भुजादाने जे ओळखायचे ते मनोमन ओळखले होते. असा हा भुजा महादा खरात म्हणजे एकदमच गोगलगाय. जरा धक्का लागला की सगळं अंगच आकसून शंखात.'

पण आता भुजा महादा खरातचे दिवस पालटले आहेत. आता भुजा महादा खरातच्या जिंदगीचा जीर्णोद्धार झाला आहे. हा जीर्णोद्धार झाला आहे त्याच्या एकुलत्या एक मुलामुळे, सुरेशमुळे.

आता 'भुजा महादा खरात'चा 'भुजंगराव माधवराव खरात' झाला आहे. आता गावात आषाढी एकादशीच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजे द्वादशीला भजनी मंडळीला खरातांची पंगत असते. गावच्या शाळेतून दहावीत पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला भुजंगराव माधवराव खरात यांच्या नावाने पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं जातं. आता भुजंगराव माधवराव खरात यांचा पेहरावही बदलला आहे. जुनं झोपडं पाडून तिथं आता नवीन घर बांधलं आहे. याचं सगळं श्रेय आहे त्यांचा एकुलता एक मुलगा सुरेश याला. अर्थात एवढा सगळा बदल काही एका रात्रीत झालेला नाही. मधे बरीच वर्षे गेली आहेत.

ह्या सुरेशचं शिक्षण जेमतेमच झालं आहे, पण तो आहेच मुळात व्यापारी वृत्तीचा. छोटी छोटी गुत्तेदारी करत तो आता वाळूच्या धंद्यात स्थिरावला आहे. गावच्या नदीतून अनियंत्रित वाळू-उपसा करून नदीकाठी घेतलेल्या शेतीत साठा करून ठेवतो. आता तो गावी राहात नाही. गावी राहतात भुजंगराव खरात आणि त्यांची पत्नी. सुरेश मात्र बायको आणि मुलीसह तालुक्यावर छान घर बांधून राहतो. त्यानं तालुक्याला छान ऑफिस थाटलय. पावसाळ्यात चढ्या भावाने विकण्यासाठी घरासमोरही वाळूचा मोठा ढीग साठवून ठेवला आहे. सामदामदंडभेद ह्या नीतीने काम करणारी, सुरेशची आपल्या धंद्याची स्वतंत्र यंत्रणा सज्ज आहे. 

भुजंगराव खरात काही दिवसांसाठी मुलाकडे तालुक्याच्या गावी राहायला आले आहेत. इथे त्यांना रोज रात्री झोपेत एकच स्वप्न पडते. त्यांच्या स्वप्नात सगळी रेताड जमीनच येत होती. 'वाळसरा' म्हणतात अशा जमिनीला. ही जमीन पाणी धरून ठेवते, पण जास्त पिकत नाही. मैलोनमैल या 'वाळसरा' जमिनीतून चालत आहोत अन् पुढं वाळवंट लागलं चालता चालता. नजर जाईल तिथवर वाळूच वाळू. कुठं आडोसा नाही, सावली नाही का पाण्याचा पत्ता नाही. चालता चालता घशाला कोरड पडली. कुठं जायचं याचा पत्ता नाही.

ह्या स्वप्नामुळे भुजंगराव खरात अस्वस्थ झाले आहेत. त्यांना रोज पडत असलेले हे स्वप्न मोठे सूचक आहे. 

जुलै महिना संपत आला, तरी पावसाचा पत्ता नाही. पेरण्या लांबल्या आहेत, म्हणून गावकरी परेशान आहेत. आता पावसाळी आभाळ भरून येत असल्यामुळे गावकरी थोडे सुखावले आहेत, तर दुसरीकडे सुरेश अतिशय अस्वस्थ झाला आहे. कारण पाऊस पडला, तर नदीला पूर येईल. नदीला पूर आला, तर वाळूचा उपसा करता येणार नाही. रस्त्यावर चिखल झाला, तर वाळूची वाहतूक करता येणार नाही. आपला धंदा बंद होईल, या भीतीने सुरेश अस्वस्थ झाला आहे. सुरेशने वाळूच्या धंद्यातून मरणाचा पैसा ओढलाय, पण त्याचे समाधानच होत नाही. 

रात्रंदिवस होत असलेल्या वाळूच्या वाहतुकीमुळे गावाकडच्या सगळ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. जे लोक याची तक्रार करतात, त्यांना तो 'फुटके रेडू' म्हणतो. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' हे सुवचन चांगल्या अर्थाने वापरले जाते. पण सुरेशने ह्या सुवचनाचा गैरवापर सुरू केला आहे. नदीकाठच्या आठ एकर जमिनीपैकी दोन एकर जमिनीवर त्याने वाळूचे मोठेमोठे ढीग जमा करून ठेवले आहेत. उरलेल्या सहा एकरात जे पिकतं, त्याच्या कैक पटीनं ह्या दोन एकरात कमाई पिकते. शेती पिकली काय आणि नाही पिकली काय, काहीच फरक पडत नाही. 

बारीकसारीक कामं करणाऱ्या सुरेशचा आता 'सुरेशसेठ' झाला आहे. सुरेशसेठचा सगळा उत्कर्ष झालाय तो वाळूवर. कमाईच तशी छप्परफाड अन् आडमाप. या धंद्यात पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकारी सांभाळावे लागतात. तलाठी, ग्रामसेवकापासून तहसीलदारापर्यंत सगळ्यांचं दरमहा पाकीट ठरलेलं. 'जो येईल त्याला खिशात टाकायचं अन् खिशात बसत नसंल, नेहमी नेहमी आडवा येत असंल, तर त्याला तुडवायचं' असं शेठनं त्यांच्या सगळ्याच माणसांना सांगून ठेवलंय. जिथल्या तिथंच दाबायचं अन् वास सुटायच्या आत आधी माती ढकलून मोकळं व्हायचं, असं सुरेशसेठचं सरधोपट धोरण आहे. त्यामुळं कोणाला भिऊन काम करायचं नाही, असं इथल्या प्रत्येक माणसाला वाटतं. 

वाळूचा उपसा करत असताना एक माणूस गंभीर जखमी झाला आहे. त्याने त्याचे दोन्ही पाय गमावले आहेत. त्याच्या उपचाराचा खर्च सुरेशसेठ करतात. 

भुजाआबा कधी पाण्या-पावसाबद्दल हवालदिल झाले, तर सुरेशसेठ म्हणतात, 'आपलं काय दाणापाणी थोडंच त्या शेतीवर अवलंबूनय. उगवलं ठीक, नाही उगवलं ठीक. अन् नि-हा शेतीवर पोट भरायचे दिवस राह्यलेत का आता?'

पाऊस पडत नसल्यामुळे गावाकडच्या सगळ्या लोकांचे चेहरे सूतक पडल्यासारखे झाले होते. आभाळ भरून आल्यानं भुजाआबाच्या मनाला उभारी आली होती. पोराला मात्र पावसाचं काहीच वाटत नाही, या गोष्टीनं भुजाआबाच्या मनात सारखी पडझड सुरू झाली होती. पोरगा इतका कसा कोरडाठाक, की त्याला काहीच वाटत नाही पावसाचं? याचा विचार करून कधीकधी झोप उडतेय भुजाआबाची. ह्या दोन चार दिवसात जी निरनिराळी स्वप्नं पडू लागलीत त्यांना, त्याचं कारणही हेच आहे. 

सुरेशसेठच्या ऑफिसमधला मुलगा जवळ येऊन उभा राहिला. काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलले, 'काय रं बाबा, पाऊस येणार का नाही यंदा?'

'येईल की, पण अजून चार-आठ रोज लांबला तर बरं होईल. तेवढेच दिवस सापडतील आपल्याला'. पोरगा बोलला. 

'आपल्याला' म्हणजे नेमकं कोणाला? असा कसा हा धंदा? लोक पावसासाठी झुरणी लागलेत अन् आपल्या पोराला पाऊस जितका लांबला तेवढं बरं म्हणतोय तो. 

ऑफिसमधल्या पोराशी बोलल्यावर भुजाआबाला समजलं, की याच लोकांनी नदीच्या काठावर बिबट्या वावरत असल्याची अफवा सोडली आहे. बिबट्याच्या धास्तीने लोक शेताशिवारात फिरकत नव्हते. त्यामुळे वाळूमाफियांना सगळे रान मोकळे झाले होते. वाळूच्या काळ्या धंद्यासाठी असा एखादा बनाव रचला जातो, हे समजल्यावर भुजाआबा उडालेच. 

भुजाआबाला पडल्या पडल्या 'सुरवेस'ची निरनिराळी रूपं आठवू लागली. आत्ताचा आडदांडपणा कुठून आला याच्यात? सगळं पचविण्याची, सतत कोणाशी तरी खेटायच्या तयारीत असल्याची ताकद आली कुठून? कशाचीच भीती नाही, कोणाला जुमानायचं नाही, हे धाडस तरी कुठून मिळवलं त्यानं? अशा कितीतरी गोष्टी कण्हारलेल्या दुखण्यासारख्या ठसठसू लागल्या त्यांच्या मनात. भुजाआबाला कधीकधी आपला मुलगा एकदम चिरलेल्या लालभडक टरबुजासारखा वाटतो. आपल्यासारख्या कधी काळी खायचेही वांधे असलेल्या घरात हे असं माणूस पुढच्या पिढीत येतं, ही गोष्ट भुजाआबाला या वाळूपात्रात आलेल्या भल्यामोठ्या टरबुजासारखी वाटते. अशा विचारांमुळे भुजाआबाची झोपच उडाली आहे. 

एके दिवशी सकाळी वातावरण बदललं. पाऊस महामूर कोसळत असल्यामुळे भुजाआबाचं काळीज सुपाएवढं झालं. पावसानं ताशा बडवण्याच्या आवाजानं आबा हरखून गेले. पावसाच्या आगमनाने इकडे आपल्या खोलीत आबा सुखावले आहेत. याउलट पावसाला सुरुवात झाल्यामुळे सुरेशसेठ भयंकर चिडले होते. तिकडे बाजूच्या हॉलमधून सुरेशसेठच्या मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता. तो फोनवरून आपल्या माणसांना इरसाल भाषेत शिव्या देत होता. त्याचं कारण असं होतं, की सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे वाळूचे टिप्पर अडवले होते. टिप्परच्या टायरमधली हवाच काढून टाकली होती. त्यामुळे सुरेशसेठ खवळले होते. सुरेशसेठचा राग उफाळून आला होता. भडाभडा बोलून झाल्यावर त्यांनी हातातला मोबाईल सोफ्यावर फेकून दिला. 

आबांनी जवळ जाऊन त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुरेश म्हणाला, 'यानं (पावसानं) सगळी राख लावून टाकली आबा. अजून आठ दहा दिवस आला नसता, तर काय बिघडलं असतं? आठ दिवसात सुफडा साफ करून टाकला असता. झालं आता, गेला सगळा हंगाम निघून'. 

त्यावर आबा मनातल्या मनात म्हणाले, 'गड्या, हंगाम तर आता सुरू झालाय. न्हायतर माणूस माणसात ठुलं नव्हतं या पावसानं'. 

आबाची नजर घरासमोरच्या वाळूच्या डोंगरावर खिळलेली होती. सुरेशसेठ जणू या मोठ्या ढिगाच्या पलीकडे बसलेत, दोघा बाप-लेकात हा डोंगर आडवा आलाय. त्यामुळं आपला पोरगा दिसत नाही, असंही क्षणभर वाटलं त्यांना. 

पाऊस पडला अन् अडलेला बांध फुटल्यासारखं झालं सगळं. उपरणं झटकून खांद्यावर टाकलं अन् कुणीतरी झोकून दिल्यासारखं भुजाआबा मुलाच्या घरातून बाहेर पडले. 

रेताड अन् वाळसरा जमिनीवर चालून चालून स्वप्नातच भुजाआबाच्या हाता-पायाला गोळे यायचे. दोन चार दिवसात झोपच खराब करून टाकली होती अशा स्वप्नांनी. आता वाळूत पाय रुतत नव्हते. पाऊस पडल्यानंतरची ओलसर हवा जास्तच मोकळी मोकळी, कोंडवाड्यातून सुटून खुल्या रानात आल्यासारखं वाटायला लावणारी होती. नदीपात्रात जो भेसूर आवाज यायचा वाहनांचा, तसा आवाज नाही की आजूबाजूला बिबट्या वावरत असल्याची भीती नाही. 

लेखकाने 'वाळसरा' ह्या कथेत चितारलेला संघर्ष हा केवळ दोन व्यक्तींमधला संघर्ष नाही, तर दोन परस्परविरोधी प्रवृत्तींमधला अदृश्य संघर्ष आहे. हा केवळ बाप आणि मुलगा यांच्यातील संघर्ष नसून परस्परविरोधी दोन पिढ्यांमधला अदृश्य संघर्ष आहे. कृषिसंस्कृतीत रमलेला अभावग्रस्त बाप आणि भांडवलशाही बाजारव्यवस्थेत रमलेला चंगळवादी मुलगा यांच्यातील हा सुप्त संघर्ष आहे. शोषक आणि शोषित वर्गांमधला हा संघर्ष आहे. निसर्गाचे अपरिमित शोषण करून गब्बर होत चाललेले अल्पसंख्य धनदांडगे आणि निसर्गाच्या शोषणाचे परिणाम भोगणाऱ्या बहुसंख्य वर्गातील ही वाढती दरी लेखकाने फारच सूक्ष्मपणे टिपली आहे. वाळूमाफियांचा वाढता मस्तवालपणा ही सामाजिकदृष्ट्या चिंतेची बाब ठरली आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा वाळूमाफियांची कशी मिंधी बनली आहे, हे कडवट सत्य लेखकाने अतिशय जोरकसपणे मांडले आहे. शासकीय अधिकारी कल्याणकारी योजनांची कशी विल्हेवाट लावतात, हे लेखकाने उजागर केले आहे. 

आर्थिकदृष्ट्या 'भुजा महादा खरात'चा 'भुजंगराव माधवराव खरात' झाला, तरी ते मानसिकदृष्ट्या सुखी समाधानी झालेच नाहीत. भौतिक समृद्धी ही आधुनिक सुविधा पुरवत असली, तरी ती सुख-समाधान देऊ शकत नाही, हेच खरे! भुजाआबाला पडत असलेल्या स्वप्नाचा लेखकाने कथेत छान उपयोग करून घेतला आहे. किंबहुना ही संपूर्ण कथाच त्या स्वप्नाच्या पायावर उभी आहे. 

लेखक मुळात पत्रकार असल्यामुळे त्यांनी 'रेतीच्या शेती'चा आणि त्यामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या -हासाचा अतिशय बारकाईने अभ्यास केला आहे. कथेची भाषा पूर्णतः ग्रामीण आहे. वाळसरा, पेंडवलता पाऊस, कळवंड, दुखणकरू, बगलखिसा, टक्कुरं, डागवन इ. ग्रामीण शब्दांवरून परभणी परिसरातील ग्रामीण भाषेचा लहेजा लक्षात येतो. सुरेशसेठच्या तोंडी काही शिवराळ शिव्या आल्या आहेत. त्यावरून त्याच्या स्वभावातला बेदरकारपणा आणि रासवटपणा दिसून येतो. 

'लोकं रडून ऐकतात अन् हसून सांगतात'. 

'आपलंच खावा पण मांडीआड करून खावा', 

यांसारख्या लोकोक्तींचा लेखकाने चपखलपणे वापर केला आहे. 'वाळसरा' हे कथेचे शीर्षक अतिशय अर्थपूर्ण आणि अर्थवाही आहे. 

'डंख' ही कथा आहे एका कोवळ्या कॉम्रेडची. हा एक बागायतदार शेतकऱ्याचा मुलगा आहे, चांगला शिकला-सवरलेला. पण तो ध्येयवादी आहे. त्याला इतरांसारखी नोकरी करायची नाहीये. कॉम्रेड सरमळकर यांच्या सूचनेवरून तो दुसर्‍या एका कोरडवाहू शेती असलेल्या भागात काम करण्यासाठी गेला आहे. तिथे त्याला लग्न न करता, शेतमजूर आणि सालगड्यांच्या प्रश्नावर काम करायचे आहे. तसे त्याने एकदोन प्रश्न हाताळले आहेत. एकदोन प्रश्न त्याच्या हातावर आहेत. हा कोवळा कॉम्रेड इतका संवेदनशील आहे, की देवईबाईच्या प्रश्नामुळे तो अस्वस्थ झाला आहे. तो ह्या दूरच्या मुलखात अशा लोकांसाठी काम करतो आहे, की राबणं- सोसणं त्यांच्या इतकं अंगवळणी पडलेलं, की जगणं म्हणजेच राबणं अन् राबणं म्हणजेच जगणं, असं त्यांना वाटतं. 

ह्या कोवळ्या कॉम्रेडचे मार्गदर्शक कॉम्रेड सरमळकर एकदा त्याला म्हणाले होते, कार्यकर्त्यांनी संवेदनशील असावं, पण भावनाविवश होऊ नये. हा कोवळा कॉम्रेड इतका संवेदनशील आहे, की तो हाती घेतलेल्या प्रश्नाशी भावनिकदृष्ट्या बांधला जातो. इतका, की त्यामुळे त्याला अन्नपाणी गोड लागत नाही. एकदा तो असाच भावनाशील होऊन आजारी पडला. फारच एकाकी वाटू लागल्यावर तो आपल्या गावी गेला. तिथे त्याला नवीनच शोध लागला. 

बागायतदार गाव असल्यामुळे त्याच्या गावात काम करायला माणसेच मिळत नाहीत. त्याच्या टाकळीच्या मावसबहिणीची मुलगी संजीवनी आणि तिची मैत्रीण वंदना, ह्या पंधरा सोळा वर्षांच्या मुली, काम करण्यासाठी कॉम्रेडच्या घरी येऊन राहिल्या आहेत, कारण त्यांच्या गावी त्यांना मजुरी मिळत नाही आणि शिक्षणाचीही सोय नाही. कोवळ्या कॉम्रेडची आई त्याला सांगते, की ह्या मुली सध्या आपल्या घरी फुकटच काम करत आहेत. त्यांना आता काहीच द्यायची गरज नाही. त्यांचे लग्न ठरेल, तेव्हा मदत करायची. हे ऐकून हा कोवळा कॉम्रेड हादरलाच. 

तो एकीकडे देवईबाईला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत होता आणि दुसरीकडे त्याच्या घरातच संजीवनी आणि वंदनाच्या रूपात दोन देवईबाई तयार होत होत्या. आपल्या घरातच देवईबाईची नवीन गोष्ट सुरू झाली आहे, असे त्याला वाटले. लगेच त्याच्या लक्षात आले, की देवईबाईच्या पहिल्या भेटीनंतर जो डंख बसला, त्याचं विष आता उतरत चाललय... ठणक ओसरत चाललीय. कोणत्याही सामाजिक सुधारणेची सुरुवात आधी आपल्या घरापासूनच करायला हवी, हा विचार लेखकाने ह्या कथेत अधोरेखित केला आहे. बाहेरचे डंख जाणवतात, पण घरातले डंख जाणवत नाहीत. परदु:ख शीतळ म्हणतात, ते हेच! त्या अर्थाने कथेचे 'डंख' हे शीर्षक अतिशय अर्थपूर्ण आहे. 

'ढासळ' ही एका गरीब, अश्राप ब्राह्मणाची गोष्ट आहे. त्याचं नाव खंडूगुरू. त्याचे वडील बाप्पा हे गावोगाव जाऊन भागवत सांगायचे. मोठी प्रतिष्ठा होती त्यांना समाजात. गावात चांगला मान होता ह्या कुटुंबाला. आईवडील गेल्यावर खंडूगुरूचं गावात मन लागेना. त्याची बायको शहरातली. बायको आणि एकुलत्या एका मुलाला घेऊन त्यांनी गाव सोडलं. शहरात येऊन राहू लागले. शेती एकाला चौथाईनं देऊन टाकली. घराला कुलूप लावलं. दहा वर्षे असंच चाललं. मुलाला वेदशास्त्र शिकायला एका आश्रमात ठेवून दिले. शेवटी गावात बंद घर ठेवून तरी काय करणार! विकून टाकलं अंबादासला सत्तर हजार रुपयांत. पण हा आनंद फार दिवस टिकला नाही. रोज रात्री स्वप्नात आई येऊ लागली. म्हणू लागली, 'वडिलोपार्जित वाडा विकलास. हे चांगलं केलं नाहीस'. 

तेव्हापासून गुरूची झोपच उडाली. 

एके दिवशी गुरू गावी गेले. कारभारी जिजाच्या मध्यस्थीने अंबादासला वाडा परत करण्याची विनंती केली. पण अंबादास नवश्रीमंत. भलताच अडेलतट्टू. म्हणाला, 'सव्वालाख द्या आणि वाडा परत घ्या'. आठच दिवसात सत्तर हजाराचे सव्वालाख केले. इतके पैसे कुठून आणणार? गुरूने हरप्रकारे प्रयत्न केले, पण अंबादास दाद देईना. गुरूला जेवण जाईना आणि झोपही लागेना. एका रात्री गुरू मनोविकल अवस्थेत विकलेल्या बंद वाड्यासमोर जाऊन बसले. त्यांना बालपणी आईने सांगितलेली मूल हरवलेल्या आईची गोष्ट आठवली. आपलीही अवस्था त्या मूल हरवलेल्या आईसारखी झाली आहे, असे गुरूला वाटायला लागले. दहा वर्षे वापरात नसल्यामुळे जसा गुरूचा वाडा ढासळत होता, तसे गुरू वाडा विकून मनाने ढासळले होते. ह्या कथेत लेखकाने नायकाच्या मनोविश्लेषणावर भर दिला आहे. 

'पल्टी' ही एका अफलातून उचापतखोर आणि बिलंदर माणसाची कथा आहे. 'नो मनी तर पुसना कोणी' ह्या तत्त्वानं निरंतर नोटा छापण्याचे उद्योग करणाऱ्या ह्या माणसाचं नाव आहे श्रीरंग पायगिरे. पण हे त्याचं खरं नाव नाहीये. त्याचं खरं नाव होतं अंकुश. ह्या अंकुशनं आपल्या धाकट्या भावजयीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तो फसला, पण अंकुशच्या त्रासाला कंटाळलेल्या भावजयीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याच वेळी हा अंकुश परागंदा झाला. अंकुशच्या भावजयीच्या माहेरच्या लोकांनी त्याच्या हिश्श्याची सहा एकर जमीन विकून पाच लाख रुपये वसूल केले. अशा प्रकारे अंकुशने आपलाही संसार उधळला आणि भावाचाही संसार उधळला. परागंदा झाल्यावर अंकुशने नाव बदलून, दुसर्‍या जिल्ह्यात जाऊन निरनिराळे उद्योग केले. तहसीलदारबाईला बहीण मानले आणि तिच्या परवानगीने एका फाट्यावर कलाकेंद्र सुरू केले. 

कलाकेंद्राच्या माध्यमातून त्यानं खूप माया जमवली. कोणालाच जुमानायचं नाही, असा त्याचा रुबाब होता. कलाकेंद्रामुळे परिसरात अशांतता पसरली होती. तहसीलदारबाईंची बदली झाली आणि नव्याने बदलून आलेल्या तहसीलदाराने श्रीरंगचे कलाकेंद्र बंद करण्याचे आदेश काढले. 'बत्ती इझली अन् वळख बुडाली' हे श्रीरंगचे धोरण. कलाकेंद्राला पर्याय म्हणून श्रीरंगने ह. भ. प. शांतीस्वरूप महाराज रोहिणेकर यांच्याशी ओळख वाढवली. त्यांचा गुरुमंत्र घेण्याची इच्छा व्यक्त केली. गोड गोड बोलून महाराजांचा विश्वास संपादन केला. चौफुलीवर महाराजांच्या मुलाच्या वाढदिवसाचा भव्य फलक झळकवला. श्रीरंगने महाराजांना त्यांच्या धंद्याच्या विस्ताराची नवीन योजना समजावून सांगितली. श्रीरंग सांगत होता अन् महाराज एकटक नजर लावून ऐकत होते. इतकी श्रीरंगने महाराजांवर मोहिनी घातली होती. 

महाराजांच्या बोलेरो गाडीतून गुटख्याची वाहतूक केली जाते. मळ्यातल्या गोदामात गुटख्याचा साठा केला जातो. महाराजांवर शंका घ्यायची कोणाची बिशाद आहे! श्रीरंगने बंद पडलेल्या कलाकेंद्राच्या रिकाम्या जागेत आध्यात्मिक शिक्षणसंस्था काढायची योजना आखली. त्याच्या मते या नव्या खेळात कलाकेंद्रापेक्षा जास्त फायदा आहे. शिवाय यात आधीच्या धंद्यासारखी रिस्क नाही. श्रीरंग तोट्याचा धंदा करतच नाही. उद्या जेव्हा कलाकेंद्राचा फलक हटवून त्या जागी आध्यात्मिक संस्थेचा फलक लागेल, तेव्हा लोकांच्या नजरा आदळतील. अशी ही श्रीरंगची दूरदृष्टी! भाविक भक्तांना गुंगवणा-या महाराजांनाही गुंगवणारा श्रीरंग भारीच म्हटला पाहिजे. 

'पल्टी' ही जशी पाताळयंत्री श्रीरंग पायगिरे ह्या माणसाची गोष्ट आहे, तशीच ह्या कथेत श्रीरंगची बायको, भाऊ लहू, लहूची बायको, म्हातारी आई, तहसीलदारबाई, कलाकेंद्रातली गायिका वैशाली, तिचा अपंग नवरा, ढोलकी वाजवणारा सुदाम, नाचणारी शालन, ह. भ. प. शांतीस्वरूप महाराज रोहिणेकर इ. ठसठशीत पात्रे त्यांच्या गुणावगुणांसह अवतरली आहेत. ही सगळी पात्रं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ह्या कथेत 'गाय खाटकाला धार्जिन' यांसारख्या लोकोक्तींची अक्षरशः रेलचेल आहे. हल्ली अध्यात्माच्या नावाखाली कसे गैरप्रकार चालू आहेत, हे लेखकाने अधोरेखित केले आहे. श्रीरंगने स्वतःचा संसार उधळून कलाकेंद्र सुरू केले, इथे एकदा 'पल्टी' मारली. तहसीलदारबाईंच्या ओळखीचा पुरेपूर फायदा घेतला आणि तिची बदली झाल्यावर लगेच 'पल्टी' मारली. बाया नाचवणारा श्रीरंग पुन्हा 'पल्टी' मारून महाराजांच्या सहवासात रमतो. कलाकेंद्राच्या इमारतीत आध्यात्मिक शिक्षणसंस्था सुरू करून श्रीरंग आणखी एक 'पल्टी' मारतो. म्हणून 'पल्टी' हे कथेचे शीर्षक अतिशय अर्थपूर्ण आहे. 

'ही गोष्ट नाहीय' ही ह्या संग्रहातली पाचवी आणि शेवटची कथा आहे. लेखकाने कथेच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे खरोखरच 'ही गोष्ट नाहीय'. आपल्या सभोवताल घडत असलेले हे चार किस्से आहेत. ह्या गोष्टी नसल्या, तरी अस्वस्थ करणा-या गोष्टींच्या ह्या चार बिया आहेत. गोष्टीत एक गाव आहे, पण त्या गावाला नाव नाही आणि चेहराही नाही. भारतातल्या कोणत्याही खेड्याची ही गोष्ट असू शकते. ह्या गावात जायला नदीवर पूल नसल्यामुळे लोकांचे खूप हाल होतात. अडलेल्या बाळंतिणीला दवाखान्यात न्यायचे तर जीव धोक्यात घालून तराफ्यातून न्यावे लागते. पण आता हे सगळ्यांच्या अंगवळणी पडले आहे. बातम्यांना खमंग फोडणी देण्यासाठी वाहिन्यांच्या वार्ताहरांना तेवढी घाई झाली आहे. हल्ली रील्सचा जमाना आहे. वेगवेगळे खाद्यपदार्थ करून दाखवणारी ह्या गावातली एक आजी 'आजीच्या हातची चव' ह्या यू ट्यूब चॅनलवर लोकप्रिय झाली आहे. 

त्र्यंबक सावंत हा ह्या गावातला मुलगा आपल्या मोबाईलवर लघुपट तयार करू इच्छितो. त्याच्यासमोर त्याच्या परिसरातले दोन ज्वलंत विषय आहेत. पहिला विषय आहे 'वेदनेची पिशवी' आणि दुसरा विषय आहे 'मासोळी'. ह्या दोन्ही विषयांनी त्याला अक्षरशः झपाटले आहे. गावातील बहुसंख्य लोक हे ऊसतोड कामगार आहेत. इथे पंधरा-सोळा वर्षे वयाच्या मुलींचे बालविवाह होतात. विशी-पंचविशीत ह्या मुली एक-दोन लेकरांच्या आया होतात. ऊसतोडीला गेलेल्या ह्या महिलांना पाळीच्या दिवसात फारच त्रास होतो. तो त्रास टाळण्यासाठी त्या वयाच्या तिशीतच आपली गर्भाशयाची पिशवीच काढून टाकतात. परिणामी त्यांना पुन्हा अनारोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. ह्या विषयावर त्र्यंबक 'वेदनेची पिशवी' हा लघुपट तयार करू पाहतोय. 

त्र्यंबकच्या डोक्यात दुसरा विषय आहे 'मासोळी'. जवळच्या साखर कारखान्याने सगळे रसायनयुक्त घाण पाणी एका तळ्यात सोडले आहे. परिणामी तळ्यातील सगळ्या मासोळ्या मरत आहेत. मासेमारीवर अवलंबून असलेल्या भोयांची उपासमार होत आहे. सरकारदरबारी तक्रार केली, तर कारखान्याचे गुंड त्यांनाच मारहाण करतात. शारदा बिजुले नावाची एक पदवीधर मुलगी आहे. तिने राष्ट्रीय हरित लवादासमोर हा विषय मांडून दाद मागितली. लवादाने कारखान्याला दणका दिला आहे. आता तो तलाव पहिल्यासारखा नितळ, निर्मळ झाला आहे. शारदा बिजुले हिचा हा फार मोठा विजय आहे. तिच्यावर त्र्यंबक 'मासोळी' हा लघुपट तयार करू पाहतोय. मोबाईलसारखे तंत्रज्ञान हाती आल्यामुळे आता खेड्यापाड्यांतील माणसे तंत्रस्नेही बनली आहेत. एकीकडे मोबाईल हातात आहे, पण नदीवर पूल नाही, अशा अडकित्त्यात ही माणसे सापडली आहेत. अशा माणसांच्या ह्या गोष्टी आहेत. ह्या कथा म्हणजे वर्तमानकाळाचे तुकडे आहेत. आसाराम लोमटे आपल्या सुरेख शब्दगुंफणीतून वाचकाला खिळवून ठेवतात. 

'वाळसरा' कथेचा नायक स्वार्थांध सुरेशसेठ आणि 'पल्टी' कथेचा नायक धोरणी श्रीरंग हे दोन्ही खलपुरुष आहेत. स्वार्थासाठी माणसांना वापरून घेणे, ही त्यांची नीती आहे. पैशांसाठी आत्मा विकतानाही ते मागचापुढचा विचार करत नाहीत. समकालीन समाजव्यवस्थेत हल्ली असे अनेक सुरेशसेठ आणि श्रीरंग उगवले आहेत. कमी श्रमात आलेल्या नवश्रीमंतीमुळे त्यांच्यात एक प्रकारचे निर्ढावलेपण आले आहे. पैशांपुढे त्यांना कोणत्याही गोष्टीचा विधिनिषेध वाटत नाही. 'डंख' ह्या कथेचा नायक असलेला कोवळा कॉम्रेड आणि 'ढासळ' ह्या कथेचा नायक पापभीरू खंडूगुरू हे दोघेही अतिशय संवेदनशील आहेत.  ह्या कथांतून लेखकाने ग्रामीण भागाचे बदलते समाजकारण आणि अर्थकारण टिपले आहे. आसाराम लोमटे यांनी गावगाड्याच्या बदलत्या रंगरूपाचा भव्य पट छान रंगवला आहे. ह्या लेखनात कमालीचा कसदारपणा आहे. लेखकाने आपल्या भोवतालाचे खोदकाम करून मांडलेल्या ह्या कथा समाजाचे नैतिक अध:पतन अधोरेखित करतात. समाजाचे हे 'ढासळ'लेपण संवेदनशील वाचकाला अस्वस्थ करून जाते. 

  • 'वाळसरा' (दीर्घ कथांचा संग्रह) 
  • लेखक : आसाराम लोमटे 
  • प्रकाशन : शब्द पब्लिकेशन, मुंबई 
  • मुखपृष्ठ : सरदार जाधव 
  • पृष्ठे : १६९     किंमत रु. ३०० 

डॉ. सुरेश सावंत, 

मथुरेश बंगला, क्र. १. १९. २२०, 

राज मॉलच्या पाठीमागे, 

आनंदनगरजवळ, 

शाहूनगर, नांदेड ४३१ ६०२. 

भ्र. ९४२२१७०६८९, ८८०६३८८५३५. 

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या