पहिले अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न


जळगाव : 

पहिले अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन  दि. 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.  संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. 

तीन दिवस नियोजनबद्ध पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या साहित्य संमेलनात पुणे, मुंबई, नागपूर, नांदेड, सांगली, सातारा, अमरावती, वाशिम, वर्धा, परभणी,  अहिल्यानगर, लातूर, कोल्हापूर इ. जिल्ह्यांतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ साहित्यिकही  सहभागी झाले होते.

जळगाव येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठानने या संमेलनाचे आयोजन केले होते. समाज चिंतामणी प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांपासून  वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी नवोपक्रम राबवत आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांनी साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन जळगाव येथील आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका वैदेही नाखरे यांनी केले.


मान्यवर काय म्हणाले...


उद्घाटक डॉ. सुरेश सावंत, (नांदेड) 

संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत म्हणाले,  की बालसाहित्य आणि बालशिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही. शिक्षणक्षेत्रातील कोरडेपणामुळे आजची मुले एकाकी आणि एकलकोंडी बनत चालली आहेत. त्यांच्यातील संवाद हरवत चालला आहे. संस्कारसंपन्न आणि ज्ञानसंपन्न पिढी घडविण्यासाठी प्रत्येक घर हे वाचन केंद्र बनले पाहिजे.

बालसाहित्याचे महत्त्व सांगताना डॉ. सावंत पुढे म्हणाले, की बालसाहित्य हे बालकुमार वाचकांना जीवनरस पुरवत असते. बालसाहित्य ही चांगला माणूस घडवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची पहिली पायरी आहे. ही पायरी मजबूत असली पाहिजे. ज्ञान आणि मनोरंजन यांचा ताल आणि तोल सांभाळत बालसाहित्य निर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, (पुणे) 

ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले  की, बालसाहित्यामध्ये बदलत्या काळाचे भान पेरले पाहिजे. परंपरा आणि विज्ञानाची डोळस दृष्टी नव्या पिढीला आली पाहिजे.  जातिधर्मापलीकडे त्यांचे भावविश्व निर्माण व्हावे. समाज आणि सरकारने बालसाहित्याकडे विशेष लक्ष द्यावे. तरच प्रत्येक भाषेतील बालवाङ्मयाचे समृद्ध संस्कार पचवून  उद्याचा भारत सक्षम व समर्थ होईल.

बालसाहित्यिक आहेत, पण त्यांच्या साहित्याची समीक्षा होत नाही. समीक्षकांनी बालमनास लक्षात घ्यावे. विश्वसंस्कृती, विश्वकल्याण व विश्वशांतीचे संस्कार बालसाहित्यातून व्हायला हवे आहेत, असे आग्रही प्रतिपादन डॉ. सबनीस यांनी केले. 


स्वागताध्यक्षा विजयाताई मारोतकर (नागपूर)  साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्रसिद्ध लेखिका प्रा. विजयाताई मारोतकर  म्हणाल्या की, अवांतर वाचनाची आवड निर्माण होऊन बालकांची पावले वाचनालयाकडे वळणे खूप आवश्यक आहे. वाचनसंस्कृतीचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने अशी बालकुमार साहित्य संमेलने ही आज काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या संस्थेने आयोजित केलेले ऑनलाईन साहित्य संमेलन अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. प्रमुख आयोजक श्री. आर.डी. कोळी यांची तळमळ आणि जाणीव यातून हे संमेलन उभे झाले आणि यशस्वी झाले.

 संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बालगोपाल उपस्थित राहिलेत, सहभाग घेतला आणि त्यांना मान्यवरांच्या कथा, कविता, गायन याबाबत मार्गदर्शन लाभले. बालकुमारांमध्ये साहित्याची आवड निर्माण होईल, अशा प्रकारे सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. 


समारोपाच्या अध्यक्षा माया दिलीप धुप्पड म्हणाल्या, की समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी. कोळी आणि त्यांचे सहकारी यांनी पहिले ऑनलाईन आंतरभरती बालकुमार साहित्य संमेलन घेतले. बालकवींच्या जन्मदिवशी सुरू झालेल्या तीन दिवसांच्या या संमेलनात उपस्थित रसिक, साहित्यिक, बालकुमार यांनी साहित्याचा जागर केला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रतिभेकडे, भाषेकडे, संवेदनशीलतेकडे, संस्कारांकडे मनस्वीपणे पाहत या संमेलनात अभिवाचन, बालकुमार कविसंमेलन, कथाकथन इत्यादी सत्रे दिमाखात पार पडली. वाचनसंस्कार  आणि साहित्य चळवळ ही दोन महत्त्वाची उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या डिजिटल युगात, डिजिटल साधनांचा चांगला उपयोग होऊ शकतो, हे या संमेलनातून सिद्ध झाले.


------------**------------

टिप्पण्या