धम्मचळवळीचे नवे दायाद - भदंत पंय्याबोधी थेरो

     आंबेडकरी चळवळीने जातिधर्म, विषमता, वर्गवर्ण, कोणताही भेदभाव नसणारी माणसा माणसांत माणुसकी, बंधुत्वाची, मानवी स्वातंत्र्याची, न्यायप्रियतेची, समतेची कारुण्यदृष्टी पेरणारी, सर्वमानवसमभावी समाजरचना निर्माण व्हावी यासाठी अविरत संघर्ष केला आहे. हा संघर्ष संपलेला नाही, तो सुरुच आहे. हा संघर्ष खऱ्या अर्थाने आजच्या काळात भारतीय धम्मचळवळीने शिरी स्विकारला आहे. समाजाची धम्मधिष्ठीत पुनर्रचना व्हावी यासाठी ही चळवळ जनमानसात रुजत आहे. हीच क्रांतिकारी पुनर्रचनेचीच चळवळ आहे. नांदेड जिल्ह्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अखिल भारतीय भिख्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धर्मगुरु संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी धम्मचळवळीने दिलेला आणि आंबेडकरी चळवळीने स्वीकारलेला हा संघर्ष आपल्या हाती घेतला आहे. भदंत पंय्याबोधी थेरो हे या चळवळीचे दायाद बनले आहेत. हीच खरी संपदा आहे. श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे कार्य या भूमिकेतूनच पुढे जात आहे. हे कार्य आता नांदेड जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहिले नसून जगातील ज्या बौद्ध राष्ट्रांशी भदंत पंय्याबोधी थेरो यांचे धम्मबंध निर्माण झालेले आहेत त्या संबंधाने धम्मचळवळीशी सुसंगत ठरले आहे. या चळवळीच्याच संबधाने इथले उपासक उपासिकासुद्वा बालक बालिकांसह जनसामान्यांत रुजत चाललेल्या बौद्ध धम्माचे तत्त्वज्ञानाचे महत्त्व जाणू लागलेले आहेत. लोकांची धम्मज्ञान घेण्याची आणि दान देण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. याचाच परिणाम म्हणून श्रामणेर प्रशिक्षण केंद्र परिसरात ३६५ दिवस श्रामणेर दीक्षेसाठी उपलब्ध असणारी आणि भारतातील एकमेव असणारी श्रामणेरांची दीक्षाभूमी उदयाला येत आहे. यामुळे धम्मचळवळीला अधिक गती मिळत असून गतवैभव मिळण्यासही प्रारंभ झाला आहे, असे म्हणावयास हरकत नसावी. 

    महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यात नांदेड शहरापासून अवघ्या काही किमी अंतरावर असलेल्या खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात अनेक श्रामणेर भिक्षू वास्तव्यास असतात. धम्म चळवळीचे विविध उपक्रम या ठिकाणी घेतले जातात. या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष भदंत पंयाबोधी थेरो हे थायलंड दौऱ्यावर असतांना तेथील काही बौद्ध उपासक उपासिकांनी प्रशिक्षण केंद्रातील संघाकरिता पंयाबोधी यांना १०० चिवर दान केले. यावेळी रत्ना विप्सुमपुमफिचित, नार्वपोर्न कन्याबोव्ह्न, स्वपा पीबी, ससीपत्त किलशेव्हरेक, ससिकरन, जिथ चोकोलेट, पिव्ह शोव्ह, बोध्व, के. कमशी, के. पी इव्ह, हिया टिक, के. सॅम के साॅ, थोंग्सा, ॲन जाॅन, पँग बँन्थाई मेसेज, पव्हॅड, के. गित्व, के. गिटार, के. माया, के. सिफा, के. सुरेचाॅय, टोनी रत्ना या बौद्ध उपासक उपासिकांची उपस्थिती होती. थायलंड हे जगातील प्रसिद्ध बौद्ध राष्ट्र आहे. या देशांमध्ये विनय पीटकाचे जतन करण्यात आले आहे. या देशात पन्नास हजाराच्यावर बुद्ध विहार आहेत. थायलंड राष्ट्र हे दानाच्या बाबतीमध्ये अग्रेसर असून देश विदेशामध्ये त्यांनी सुंदर अशा असंख्य बुद्धाच्या मुर्त्या दान केलेल्या आहेत. भारताला सुद्धा बुद्धांच्या अनेक मुर्त्या त्यांनी दान स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. थायलंडमध्ये शुद्ध सोन्याची साडेपाच हजार किलो वजनाची भगवान बुद्धाची मूर्ती आहे. ती २८२ फूट उंच असून बसलेली पाकनाम टेम्पल मध्ये भगवान बुद्धाची सुंदर मूर्ती आहे. रिकलाईंग बुद्धा टेम्पल मध्ये १५५ फूट लांबीची भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रा आहे. त्या ठिकाणावर शेकडो मुर्त्या भगवान बुद्धाच्या पाच फूट सहा फूट सात फुटाच्या बघायला मिळतात. थायलंड हे राष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अतिशय काळजी घेत असते. चायनाशी असे तेथील समुद्राचे नाव असून त्या मधील पाणी अतिशय स्वच्छ आणि निर्मळ आहे जगातले पर्यटक त्या ठिकाणावर येऊन आनंद घेत असतात. त्या ठिकाणाला कोरल आयलँड असे म्हणतात. थायलंडच्या उपासक उपासिकांनी अतिशय श्रद्धायुक्त चित्ताने श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव तालुका जिल्हा नांदेड साठी १०० चीवर दान दिले. 

        थायलंडसोबतच भंतेजींनी तैवान, श्रीलंका तसेच भूतानचाही दौरा केला आहे. बौद्ध धम्मात धम्म पर्यटनाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जगातील विविध बौद्ध राष्ट्रांना भेटी देऊन तेथील धम्मसंस्कृती व लोकजीवनाचा  तुलनात्मक अभ्यास केला जातो. तसेच प्रेक्षणीय स्थळे व ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या जातात. श्रीलंकेतील दंबुला, अनुराधापुरा, कँडी, नुवाला एलिया, कोलंबो आदी ठिकाणी भेट दिली गेली. भदंत पंयाबोधी थेरो आणि शहर व परिसरातील अनेक बौद्ध उपासक उपासिका हे भूतान आणि दार्जिलिंग धम्माभ्यास दौऱ्याकरिता गेले होते. या निमित्ताने भूतान व दार्जिलिंग येथील ऐतिहासिक तथा धार्मिक स्थळांचा अभ्यास करण्यात आला. भूतान देशातील  अनेक ठिकाणांचा व दार्जिलिंग येथील प्रेक्षणीय स्थळे यांचा धम्माभ्यास करण्यासाठी यात भूतान व दार्जिलिंग येथील सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक इतिहासही अभ्यासला गेला. पर्यटनाबरोबरच वर्षाकाळात ते वर्षावास करतात. पुस्तके वाचण्याचेही वेड त्यांना आहे. तैवान येथून त्यांना एक हजार बुद्ध आणि त्यांचा धम्म भेट देण्यात आले होते. याशिवाय अनेक बौद्ध राष्ट्रांना भेटी देण्याचा त्यांचा मानस आहे. ते सातत्याने धम्म पर्यटनाचे कार्यक्रम आयोजित करीत असतात. 

        नांदेडमध्ये जेव्हा महाबोधी महाविहारमुक्ती आंदोलन झाले तेव्हा भदंत पंयाबोधी थेरो यांनी या भव्य मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यांनी थायलंड येथील जागतिक संघदानम कार्यक्रमातही बिहार राज्यातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा आगाज केला. भिक्खू संघाचे भारतातील देशव्यापी सुरू असलेले आंदोलन आणि जगातील तमाम बौद्ध राष्ट्र तथा भिक्खू संघाने घ्यावयाचा पुढाकार याबाबत जागतिक परिषदेत भदंत पंयाबोधी थेरो यांनी थायलंड येथे जमलेल्या हजारो भिक्खू संघास या मुक्ती आंदोलनाची माहिती दिली. बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्या अशी मागणी पुढे येत आहे. बिहार राज्यातील पाटना बोधगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्ष झाले ब्राह्मणांचे व्यवस्थापन आहे. ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्या, यासाठी देशभर भन्तेजींच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलने सुरु आहेत. पन्नास हजार बौद्ध भिकूंच्या उपस्थितीमध्ये थायलंड येथील हा कार्यक्रम संपन्न झाला. श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, भूतान, तैवान, कंबोडिया, चायना, कोरिया, हाॅलंड, अमेरिका अशा देश विदेशामधून आलेल्या मेडिटेशन सेंटर येथे भव्य महासंघदान कार्यक्रम भदंत धम्मजयो महाथेरो यांच्या ८१  व्या वाढदिवसानिमित्ताने संपन्न झाला.  भदंत पंयाबोधी थेरो यांनी विविध देशातून आलेल्या बौद्ध भिकूंशी महाबोधी महाविहाराच्या संबंधिताने संवाद साधून त्यांच्याशी भारतातील महाबोधी महाविहार मुक्तीविषयी आणि बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात महाविहार देण्याबाबतच्या आंदोलनाची माहिती दिली. जगातील बौध्दराष्ट्रांनी भारताकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सुद्धा त्यांनी  सांगितले. पंयाबोधी यांच्या विनंतीवरून डॉ. पोरंचाई महास्थवीर थायलंड यांनी सुद्धा महाबोधी महाविहाराचा विषय यावेळी मांडला. जगभरातील भिक्खू संघांनी बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देऊन पुढाकार घ्यावा. भारतीय बौद्धांना सर्वोतोपरी मदत करुन पुढील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी पंयाबोधी थेरो यांनी केले होते. 

     महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मुक्कामी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी या देशातील तमाम अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या आणि हक्क वंचितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. भारतात या घटनेमुळे बौद्ध धम्माला पुनर्जीवन मिळाले. त्यानंतरच्या काळात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. आजही तो सुरू आहे. खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाल्यानंतर भदंत पंयाबोधी थेरो यांच्या नेतृत्वाखाली धम्मचळवळीने वेग घेतला आहे. या प्रशिक्षण केंद्रातून शेकडो उपासक उपासिका आणि बालक आणि स्त्रियांनी श्रामणेर दीक्षा घेतली आहे. अल्पावधीतच हे प्रशिक्षण केंद्र श्रामणेरांची दीक्षाभूमी म्हणून नावारुपाला आले आहे. भदंत पंय्याबोधी थेरो यांचे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र दीक्षा विधी साठी वर्षभर सुरू असते. या ठिकाणी दरमहा दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. येथे नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील हजारो श्रद्धावान उपासक उपासिका भेट देतात. यांच्या दानातूनच प्रशिक्षण भवन व भिक्खू निवासाची बांधणी करण्यात आली आहे. दशलक्ष रुपयांची अखंड पाषाणातील आशिर्वाद मुद्रेतील संगमरवरी मूर्ती याच परिसरात कोरण्यात आली आहे. अत्यंत रमणीय बनलेल्या या परिसरास विविध क्षेत्रातील अनेक उच्चपदस्थ  अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण केंद्रास भेट दिली आहे. मोठ्या प्रमाणावर येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. महारक्तदान व आरोग्य शिबीराचेही या ठिकाणावर आयोजन केले जाते. भोजनदान आणि प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दरमहा पौर्णिमेचे औचित्य साधून पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. याच परिसरात जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्चाचे बांधकाम सुरू आहे. यात भव्य विपश्यना व ध्यानसाधना केंद्र, भोजनगृह, प्रार्थनाकेंद्र, भव्य वाचनालय व ग्रंथालय भिक्खू संघाच्या निवासाची सोय आदींचे संकल्पित बांधकाम होत आहे. यामुळे धम्मचळवळीला अधिक गती मिळेल असा विश्वास धम्मगुरु भदंत पंयाबोधी थेरो यांना वाटतो. या कामासाठी राजकीय, संस्थात्मक वा धार्मिक संघटनांकडून किंवा इतर कोणत्याही स्रोतांकडून मदत न स्वीकारता उपासकांच्या निढळाच्या घामातून मिळालेल्या आर्थिक दानावरच या दीक्षाभूमीची उभारणी झाली पाहिजे असा त्यांचा मानस आहे. 
         ८ जानेवारी हा ‘विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौद्धांचे एकच प्रतिक असावे यासाठी सन १८८०मध्ये श्रीलंकेचे अनागरिक देवमित्त धम्मपाल, महास्थवीर गुणानंद सुमंगल,‌ बौद्ध विद्वान जी. आर. डिसिल्वा इत्यादींनी मिळून निळा, पिवळा, लाल, पांढरा व केशरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ‘विश्व बौद्ध धम्म ध्वजाची’ निर्मिती केली. हा ध्वज जगातील सर्व देशांतील विद्वान विचारवंत आणि महान भिख्खू संघाने स्वीकार केला. विश्व बुद्ध धम्म ध्वज दिन समस्त भारतीय बौद्धांचा सण, उत्सव, सोहळा व्हावा तसेच या दिवशी बौद्धांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र यावे यासाठी शहरात आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिनानिमित्त गत तीन वर्षांपासून महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने खुरगाव येथून शहरातील रेल्वे स्टेशननजिकच्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत २०२३ साली पहिल्यांदाच १४३ फुटांच्या महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेचा समारोप नांदेडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ केला जातो.  पदयात्रेच्या नियोजनात  सर्व भिख्खू संघ,  आंबेडकरी चळवळीतील संघटना, धम्म संघटना, बौद्ध उपासक उपासिका, नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतात. जागतिक धम्मध्वज  दिनानिमित्त भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने काढण्यात आलेली महाधम्मध्वज महापदयात्रा धम्म चळवळीला बळकटी देणारी आहे असे मत यात सहभागी झालेल्या मान्यवरांनी व्यक्त केले. महाधम्मध्वज महापदयात्रा नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जावी अशी ऐतिहासिक झाली आहे. एवढेच नव्हे तर जगातील बौद्ध राष्ट्रांनी दखल घ्यावी अशी ही भव्य झाली आहे. यामुळे पुढील काळात धम्म चळवळीला गती मिळण्याची भरीव पार्श्वभूमी तयार झाली आहे. यात सातत्य ठेवण्यासाठी आपण सर्वांनी भिक्खू संघाला सर्वोतोपरी सहकार्य केले पाहिजे असाही सूर यावेळी मान्यवरांचा होता. 
      श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास भेट देणाऱ्या मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया फार महत्वाच्या आहेत. श्रामणेर प्रशिक्षण केंद्र परिसरात विहाराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. भदंत पंयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर धम्म प्रसाराचे कार्य होत आहे. श्रामणेर दीक्षा घेऊन धम्मचळवळीला योग्य दिशेने घेऊन जात आहेत. हे केंद्र मैलाचा दगड ठरले असून या परिसरात उपासक उपासिकांसाठी बौद्ध संस्कारांचे केंद्रबिंदू बनले आहे असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी केले. थायलंड हे बौद्ध राष्ट्र आहे. थायलंडचे लोक स्वच्छतेला अतिशय महत्त्व देत असतात. त्या ठिकाणावर कोणीही रस्त्यावर किंवा कुठल्याही पाण्यामध्ये काडी कचरा टाकत नाहीत. तेथील जे छोटे मोठे नाले असतील त्या नाल्याचे पाणी सुद्धा आपल्याला एकदम स्वच्छ दिसेल.  चायना बीचमध्ये एक रुपयाचा कॉईन टाकला तर तोही आपल्याला ठळकपणे दिसू लागतो. भारतामध्येही स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. थायलंडमध्ये पुरुषांसह महिलाही सक्रिय आहेत. अनेक ठिकाणी भगवान बुद्धांच्या असंख्य मुर्त्या बघायला मिळतात. शुद्ध धम्माचं जतन थायलंड येथील बौद्धांनी केलेला आहे. दान पारमिता करुन, शिल पालन करुन आणि व्यसनांना दूर करुन धम्माला गतिमान करायला हवे असे प्रतिपादन इंजि. गंगाधर धुतराज यांनी केले. श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित झालेले श्रामणेर भिक्षू हे समाजासाठी अढळ स्थान प्राप्त करणारे आहेत. या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत आहे. भविष्यात हे केंद्र फार मोठे होणार असून समाजातील अनेक युवक चांगल्या मार्गावर येतील, असा आशावाद नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमप यांनी व्यक्त केला. श्रामणेर प्रशिक्षण केंद्र परिसरात श्रामणेरांच्या दीक्षाभूमीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. भदंत पंयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर कार्य होत आहे. धम्मचळवळीत हे केंद्र मैलाचा दगड ठरले असून या परिसरात उपासक उपासिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले. 
        श्रामणेर प्रशिक्षण केंद्र येथे व्यसनमुक्ती प्रकल्प, श्रामणेर दीक्षा, प्रशिक्षण शिबीर, रक्तदान शिबिर, भोजनदान, दान पारमिता, प्रबोधन व जनजागृती  विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच महापुरुषांची जयंतीही साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणारे हे एकमेव श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आहे. वृक्षारोपण, वनसंवर्धन असे पर्यावरण संरक्षणाचे अभियान भिक्खू संघाच्या वतीने राबवले जातात. भंतेजी स्वतः नांदेड जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य आहेत. त्यामुळे सामाजिक सलोखा राखण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्या हातून होते. दरवर्षी ६ जुलै रोजी वाढदिवसानिमित्त २०००झाडांचे वृक्षारोपण केले जाते. यावर्षी वृक्षारोपणासह दंत आरोग्य शिबीर, महारक्तदान शिबीर, आनापान ध्यानसाधना, भव्य भोजनदान, बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. श्रामणेर शिबिराबरोबरच त्यांनी श्रामणेरी शिबीरही आयोजित केले होते. 'एक पेड माँ के नाम' हा उपक्रम गतवर्षीच राबविण्यात आला होता. या अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून दररोज शेकडो उपासक उपासिका भेट देतात. या ठिकाणावर वर्षभरात कोणत्याही दिवशी दीक्षा घेता येते. या ठिकाणी अखंड पाषाणात कोरलेली बुद्धाची मूर्ती आहे. तसेच याच परिसरात श्रामणेर दीक्षा संकल्प भूमीचे भव्य बांधकाम सुरू आहे. दरमहा पौर्णिमेचे औचित्य साधून पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे हजारो श्रद्धावान उपासक उपासिकांचा ओघ वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या परिसराच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त होण्याची गरज आहे. यासाठी भदंत पंय्याबोधी थेरो हे प्रयत्नशील आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभावे ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय!!! 

▪️प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.  मो. ९८९०२४७९५३.

▪️ग्लोबल मराठवाडा च्या वतीने हार्दिक शुभेच्छा 

▪️संपादक धनराज भारती 

▪️9403064242

टिप्पण्या