मनी वसे, ते स्वप्नी दिसे' : टवटवीत बालकथा डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

एकनाथ आव्हाड हे समकालीन बालसाहित्यातील एक महत्त्वाचे नाव आहे. कथा, कविता, नाट्यछटा, चरित्रे, काव्यकोडी इ. विविध वाङ्मयप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. आव्हाड यांच्या बालसाहित्याची जवळजवळ ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या 'छंद देई आनंद' ह्या पुस्तकाला २०२३चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' हा त्यांचा नवीन बालकथासंग्रह सकाळ प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. यात टवटवीत अशा १० बालकथा आहेत.

या गोष्टींमध्ये विषयांची विविधता आहे. वाचनसंस्कृतीचा विकास, कलाप्रेम, एकोपा, सजगता, पर्यावरण संवर्धन, परिसर स्वच्छता, संवेदनशीलता, शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणासाठी जिद्द, गुरुशिष्य संबंध आणि शाळेविषयीची कृतज्ञता इ. मूल्यसंस्कारांची शिदोरी बांधून देणा-या ह्या ज्ञानवर्धक गोष्टी आहेत.


हल्ली मुले वाचतच नाहीत, अशी तक्रार घरोघरी आणि शाळेतही ऐकायला मिळते. यावर उपाय असा आहे, की घरात पालक आणि शाळेत शिक्षक पुस्तक वाचताना दिसले, तर मुले आपोआपच वाचायला लागतात. त्यांना 'वाचा' म्हणून सांगण्याची गरजच पडत नाही. आपल्याकडे शिक्षक आणि पालक वाचताना दिसत नाहीत, हीच खरी अडचण आहे. मग विद्यार्थ्यांना आपण 'वाचा' म्हणून कोणत्या तोंडाने म्हणणार? 'आमचाही वाचनकट्टा' ही गोष्ट ह्याच विषयावर आधारित आहे. बाळू आणि शमी हे बहीण-भाऊ पुस्तकप्रेमी आहेत. कारण त्यांचे आईवडील चांगले वाचक आहेत. म्हणून बाळू आणि शमी यांनी आपल्या घरात आपला स्वतंत्र वाचनकट्टा सुरू केला आहे. या गोष्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम आणि त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह यांचा संदर्भ आला आहे.


'शाळेचा पहिला दिवस' ह्या गोष्टीतील नायक माधव हा एक उत्तम चित्रकार आहे. त्याने सुट्टीतील छंद म्हणून आपले चित्रकवितेचे पुस्तक तयार केले आहे. त्याच्या चित्रांची आणि कवितेची छान गट्टी जमली आहे. त्याने एका चोरट्याचे स्केच तयार करून पोलिसांना पकडून द्यायला मदत केली आहे. असा हा कलाप्रेमी आणि शूरवीर माधव सगळ्यांचा आवडता झाला नाही, तरच नवल! 


पाऊस वेळेवर पडत नाही, याला आपणच जबाबदार आहोत. माणसाने सतत जंगलतोड केल्यामुळे पावसावर त्याचा थेट परिणाम होतो. म्हणून आपल्या वाढदिवसाला प्रत्येकाने किमान पाच झाडे लावलीच पाहिजेत, असा विचार देणारी 'पहिला पाऊस' ही एक वाचनीय कथा आहे. ह्या कथेतील बाळू आणि शमी हे बहीण भाऊ आपल्या वाढदिवसाला पाच झाडे लावण्याचा निर्धार करतात. नेमका याच वेळी त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी पाऊस पाहुणा हजर होतो. अशी ही आनंदपर्यवसायी गोष्ट बालमनावर आनंदाचा शिडकावा करून जाते. 


'मनी वसे ते स्वप्नी दिसे' ही बालकुमार वाचकांना अद्भुतरम्य व कल्पनारम्य विश्वात घेऊन जाणारी गोष्ट आहे. या गोष्टीतील आबा हे एक परोपकारी पात्र आहे. गावाकडे पाऊसपाणी नाही, ही त्यांची खंत आहे. त्यांची खंत ऐकून बाळू आणि शमी ही भावंडे अस्वस्थ होतात. रात्री झोपल्यावर स्वप्नात बाळू पावसाळी ढग बनतो आणि आपल्या नांदूरशिंगोटे ह्या गावावर पाऊस पाडून येतो. बाळू संवेदनशीलतेने गावाच्या दु:खाशी एकरूप झाला होता. म्हणून त्याला तसे स्वप्न पडले. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' हे कथेचे शीर्षक अतिशय अर्थपूर्ण आहे. 


'आनंदाला भरतं आलं' ह्या कथेत आईवडील आणि बाळू-शमी यांच्यात पाऊसगाण्यांची छान मैफल रंगली आहे. जोडीला कांदाभजी आणि बटाटाभजीही आहेत. शीघ्रकवी बाळू म्हणतो :

'पाहतो वरून, आभाळ भरून, पाऊस फार खट्याळ 

खाली येऊन मस्ती करतो, जसा खोडकर बाळ'. 

पावसाचा खोडकरपणा बाळूने छान पकडला आहे. त्यावर बाबा कवितेतून उत्तर देतात :

'ऋतू हिरवा, ऋतू बरवा, धरती गेली नटून

चैतन्याचे दान देऊन, पाऊस जाई भेटून'. 

असे ह्या गोष्टीत सगळे चैतन्यदायी वातावरण आहे. पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ही कथा मस्त फुलत जाते. 

एकनाथ आव्हाड यांच्या कथेला कविता कशी बिलगली आहे, हे वाचकांच्या लक्षातच येत नाही. 


क्रिकेट हा बालकुमारांचा आवडता खेळ, पण लोक कचरा टाकून मैदाने घाण करतात. मग मैदानावर खेळणार कसे? बाळू आणि त्याचे मित्र साफसफाईसाठी कंबर कसतात. सगळे मिळून मैदानाची स्वच्छता करतात. रोगराई टाळायची असेल, तर स्वच्छता राखलीच पाहिजे. कारण बाबांनी त्यांना कानमंत्र दिला आहे : 'स्वच्छता जिथे आरोग्य तिथे'. 

कथेच्या शेवटी शीघ्रकवी बाळू म्हणतो :

'मित्र असतील सोबतीला तर नाही कसली खंत 

एकमेकां साह्य करू अवघे धरु सुपंथ'. 

बाळू आणि त्याच्या मित्रांनी एका कथेत स्वच्छता अभियान राबविणाऱ्या 'चिमुकल्या हातांची ताकद' दाखवून दिली आहे. 


एकनाथ आव्हाड यांनी घडविलेला बाळू हा नायक फारच गुणी मुलगा आहे. इतरांच्या दु:खाने तो दु:खी होतो. आपल्या परीने ते दु:ख दूर करण्यासाठी तो धडपडतो. 'ज्ञानाचा प्रकाश' ह्या कथेतील भाजी विकणार्‍या रखमाला तो लिहायला आणि वाचायला शिकवतो. तिचे शोषण थांबवतो. 'शिकण्याला वय नसतं. माणूस केव्हाही शिकू शकतो. शिकणं हे पवित्र काम आहे. ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं. शिक्षण माणसाला पदोपदी उपयोगी पडतं. संकटातून वाचवतं' असा संदेश देणारी ही कथा एखाद्या पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करण्यासारखी आहे. 

एके दिवशी बाळू शंभर मिटर धावण्याच्या स्पर्धेत पहिला आला. त्याला बक्षीस म्हणून एक नवेकोरे पुस्तक मिळाले. खरे तर त्याला ट्रॉफी हवी होती. ती इतरांना दाखवता आली असती. पुस्तक मिळाले म्हणून तो सुरुवातीला नाराजच झाला होता. त्याची बहीण सुमा त्याला म्हणते, 'पुस्तक हे असं गिफ्ट आहे, जे तुम्ही नेहमी नेहमी उघडू शकता'. ते पुस्तक वाचल्यावर बाळूची वाचनाची सवय वाढत जाते. पुस्तकं चांगल्या मित्राप्रमाणे आपल्या अपयशांवर मात करण्यास, आपल्या मनाला आकार देण्यास मदत करतात, हे बाळूला आता पुरेपूर पटले आहे. म्हणून तो कथेच्या शेवटी म्हणतो :

'पुस्तकं करतात डोक्याला सुपीक 

आनंदाचंही येतं उगवून पीक'. 

एकनाथ आव्हाड यांच्या कथेत कवितेच्या ओळी अशा सहजतेनं उगवून येतात. 

'प्रवास सुखकर होवो' ह्या कथेतला नायक ह्रषीकेश हा एक गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहे. त्याचे कुटुंब बेघर झाले आहे. तो बसचा प्रवास करून शाळेत येऊ शकत नाही. त्याचे गुरुजी त्याला आपल्या मुलाची जुनी सायकल देतात आणि देवाला प्रार्थना करतात, 'देवा, काहीही झालं तरी ह्रषीकेशच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर होऊ दे'. 

प्रत्येक शिक्षकाने इतकी संवेदनशीलता बाळगली, तर कदाचित एकही मूल शाळाबाह्य होणार नाही. 

'मुलांची कमाल.... गॅदरिंगची धमाल' ह्या कथेतील नाट्यप्रेमी मुले एक नाटक बसवतात आणि त्यातून आलेला पैसा शाळेच्या विकासासाठी उपयोगात आणतात. शाळेविषयीची ही कृतज्ञता मौलिक म्हणायला हवी. 

कथारूपी दहा पाकळ्यांच्या सुगंधी फुलासारखी ह्या पुस्तकाची रचना केली आहे. प्रत्येक कथेचा रंग वेगळा आणि गंध वेगळा आहे. बालकुमार वाचकांचे मनोरंजन करत संस्कार - मूल्यांची शिकवण देणा-या ह्या सदाबहार कथा आहेत. संतोष घोंगडे यांनी रेखाटलेली मुखपृष्ठासह सर्व कथांची चित्रे अतिशय बोलकी आहेत. सकाळ प्रकाशनाने पुस्तकाची निर्मिती उत्तमच केली आहे. ह्या पुस्तकाच्या सहवासात बाळगोपाळांची उन्हाळ्याची सुट्टी आनंदात जाईल, असा विश्वास वाटतो. 

'मनी वसे ते स्वप्नी दिसे' (बालकथासंग्रह) 

लेखक : एकनाथ आव्हाड 

मुखपृष्ठ : संतोष घोंगडे 

प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे. 

पृष्ठे : ७२        किंमत रु. १४०

पुस्तक परिचय :

डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या