कु. संस्कृती संगीता राहुल गाडेकर ही चौथीत शिकत असलेली विद्यार्थिनी आहे. ती परभणी जिल्ह्यातील, सेलू तालुक्यातील रायपूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकते. तिला तिच्या सुदैवानं माधव गव्हाणे नावाचे उपक्रमशील शिक्षक लाभले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असे जीव लावणारे शिक्षक अभावानेच लाभतात. माधव गव्हाणे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लावली आहे. प्राथमिक शाळेतली ही मुलं-मुली पुस्तकं वाचतात, त्यावर विचार करतात आणि न समजलेल्या गोष्टी पत्रं लिहून थेट त्या लेखक-कवींनाच विचारतात. अशा अनेक पत्रांचा खजिना माझ्याकडे आहे.
कु. संस्कृतीने माझे 'एलियन आला स्वप्नात' हे पुस्तक वाचले आणि आपल्या शिक्षकाच्या मदतीने मला हे पत्र लिहिले आहे. तिने मला विचारलेले प्रश्न तर पाहा!
कुतूहल किंवा जिज्ञासा हेच तर ज्ञानाच्या जन्माचे मूळ असते. 'वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे', अशी ओरड आपण सगळेच करतो. पण कु. संस्कृतीच्या रायपूर ह्या खेडेगावात संस्कृतीच्या मित्रमैत्रिणींच्या आणि गुरुजींच्या प्रयत्नातून वाचनसंस्कृती अजून टिकून आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे!
वाचनातून संस्कृतीचा शब्दसंग्रह वाढतो आहे.
कु. संस्कृती हिच्या ह्या पत्रातून तिची जिज्ञासा आणि तिचा प्रांजळपणा दिसून येतो.
ह्या उत्साहवर्धक पत्रासाठी कु. संस्कृतीचे आणि तिचे मार्गदर्शक गव्हाणे गुरुजींचे मनापासून आभार!
कु. संस्कृती लिहिते :
तीर्थस्वरूप डॉ. सुरेश सावंत सर,
सप्रेम नमस्कार.
सर, मी तुमचा ‘एलियन आला स्वप्नात’ हा कवितासंग्रह वाचला. तुमच्या कविता फार गमतीशीर आहेत.
सर, मी तुम्हाला सांगते की, आमच्या सरांनी आम्हाला या संग्रहातील कविता वाचून दाखवल्या.
सर, या पुस्तकाची पाने खूप गुळगुळीत व सुंदर आहेत. प्रत्येक पानावर चित्र आहेत आणि ती चित्रंही सुंदर आहेत. मला सगळ्या कवितांपैकी दोन कविता खूपच आवडल्या. त्यातील पहिली कविता ‘मामाच्या मळ्यात’ व दुसरी कविता ‘कासवा कासवा’ या कविता खूपच आवडल्या.
सर, आमचे सर कविता वाचत होते. वाचताना सर फक्त पहिल्या ओळीतले यमक सांगायचे. दुसऱ्या ओळीतील यमक सांगतच नव्हते. मग आम्हीच सांगायचो. यमक शब्द सांगताना आम्हाला खूप मज्जा यायची.
सर, मी जेव्हा कविता वाचत होते, तेव्हा मला डायनॉसोर म्हणजे काय, ते कळालंच नाही. पण डायनासोरचं चित्र पाहिलं, की मला तो कसा असतो हे समजलं.
आम्ही वाघाची डरकाळी जर ऐकली, तर आमचा थरकाप होतो.
सर, मी 'वाघाची डरकाळी' हे कवितेचं नाव वाचलं, तरीही मला खूप भीती वाटत होती. पेंग्विन हे नाव कधी ऐकलंच नव्हतं, पण पेंग्विनला मी टीव्हीमध्ये पाहिलं आहे. पण त्याचं बारकाईनं निरीक्षण केलं नव्हतं. आज या कवितेच्या निमित्तानं त्याचं निरीक्षण केलं. कवितेतील जिराफ हा स्त्री आहे की पुरुष हे मला माहीत नव्हतं, पण कविता वाचल्यानंतर जिराफ स्त्री आहे की पुरुष आहे हे कळालं.
सर, आता आहे माझी आवडती कविता. त्या कवितेचं नाव आहे ‘मामाच्या मळ्यात’. मला या कवितेतील ‘सराईत’ या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. सरांनी मला त्या शब्दाचा अर्थ सांगितला…
मामाच्या मळ्यात /फळांची बागाईत
पिकवितो सोनं /मामा माझा सराईत/
मला बागायत म्हणजे बाग हे आधीच कळालं होतं.
सर, मला या कवितेतील खालच्या ओळी आवडल्या.
मामाच्या मळ्यात/ तुडुंबलेले शेततळे/
पानोपानी लगडली/ रसरशीत गोड फळे/
सर, रसरशीत गोड फळे वाचलं की, माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आम्ही आजोळी गेल्यावर शेतात जातो. फळं खातो.
आम्ही एकशिंगी गेंडा कधीच पाहिला नव्हता, पण रंगीत चित्रामुळे तो गेंडा पाहण्यात आला. सर, तुम्हाला प्राण्यांची पक्ष्यांची, माशांची खूप माहिती आहे.
सर, तुम्ही देवमासा प्रत्यक्षात पाहिला आहे का..? तुमच्या कवितेतून मला हे कळालं, की देवमासा खोडकर असतो. उगीचच जहाजांना, होड्यांना धक्के देतो.
सर, मला जो पक्षी आवडतो, त्याची कविता यात आहे. त्या पक्ष्याचे नाव आहे पोपट आणि कवितेचे नाव आहे, ‘फळांच्या बागेत’. सर, आता आली ‘शहाण्या गाढवाची कविता’. गाढवाला उकंड्यात लोळायला आवडते, हे मला आधीच माहीत होतं.
सर, आम्ही 'उकंड्यावर' म्हणतो, तर तुम्ही त्याला ‘उकिरड्यावर’ हा शब्द वापरला आहे. आम्हाला तुमच्या या कवितेतून हे कळालं की, गाढव त्याच्या स्वतःच्या ओझ्याइतकं ओझं वाहून नेते.
दोन कविता झाल्यावर तिसरी कविता येते, त्या कवितेचं नाव आहे ‘कासवा कासवा. ज्या शब्दाला आम्ही 'पूर्वीचा काळ' म्हणतो, त्याच शब्दाला तुम्ही ‘पुराणात’ असा शब्द दिला आहे.
पुन्हा एक कविता सोडल्यावर येते ती ‘काटेरी साळींदर’ ही कविता.
सर, मी साळींदर पाहिलं होतं, पण त्याला साळींदरच म्हणतात हे माहिती नव्हतं. पुन्हा तीन कविता सोडल्यावर 'बहुरूपी अननस’ ही कविता येते. आम्ही पहिलीला होतो तेव्हा अ- अननसाचं, आ- आईचं असं सरांमागे म्हणत होतो. आम्ही तरस हे नाव ऐकलं होतं, पण तो प्राणी पाहिला नव्हता. त्या प्राण्याला हसरा प्राणी असेही नाव आहे हे आत्ता कळालं. आता शेवटची कविता आहे ‘अप्पू अस्वल.’ सर, तुम्ही आम्हाला एवढं छान पुस्तक पाठवलं, याबद्दल तुमचे खूप आभार.
सर, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या.
कु. संस्कृती संगीता राहुल गाडेकर
वर्ग चौथा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रायपूर
तालुका सेलू, जि.परभणी.
addComments
टिप्पणी पोस्ट करा