विद्या नरेंद्र डेंगळे यांचा 'डायनोचा डिस्को आणि इतर कथा' हा एक आगळावेगळा बालकथासंग्रह आहे. ह्या संग्रहात वाचनीय अशा ११ कथा आहेत. ह्या कथांमध्ये मुख्य पात्र प्राणी किंवा पक्षी आहेत. गोष्टीत मुले, मुली आणि माणसेही आहेत, पण ती जरा गौणच आहेत. मुख्य भूमिकेत प्राणी - पक्षी आणि दुय्यम भूमिकेत मुले-माणसे, अशा ह्या सगळ्या कथा आहेत. बालकुमारांना प्राणी आणि पक्ष्यांच्या गोष्टी आवडतात, हे तर खरेच आहे. म्हणूनच कदाचित लेखिकेने कथांची मांडणी अशी केली असेल. पक्षिनिरीक्षण हा लेखिकेचा आवडता छंद आहे, म्हणूनही असेल कदाचित! हे सगळे प्राणी आणि पक्षी बालकुमारांचे आवडते मित्र आहेत, हे मात्र नक्की!
पहिलीच गोष्ट आहे घुबडांची आणि त्यांच्या दोन पिलांची. घुबड हा काही दिवसाउजेडी दिसणारा पक्षी नाही. रात्रीच्या अंधारात मुद्दाम उठून पाहावा, तर त्याच्याविषयी समज कमी आणि गैरसमजच अधिक! त्याच्याविषयी बालजगतात भीतीच्याच कल्पना फार. अशा घुबडाला कोण जवळ करणार? लेखिकेने ह्या श्रृंगे कुटुंबाच्या गमतीजमती सांगितल्या आहेत. हे श्रृंगे कुटुंब रात्रभर जंगलाची सहल करून सूर्य उगवायच्या आत आपल्या घरट्यात परत आले.
कोकिळा आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात घालते आणि त्याला ही अंडी उबवायला भाग पाडते, हे आपण ऐकून आहोत. ह्या गोष्टीतली कोकिळाही असाच प्रकार करते. कोणती पिलं कोणाची हे समजतच नाही. कोकिळेजवळची पिलं 'कावकाव' करतात आणि कावळ्याजवळची पिलं 'कुहूकुहू' करतात. कोकिळेची फजिती पाहून कावळा कावळी खूश होतात.
लामा हा चिली देशातला प्राणी उंटापेक्षा लहान आणि दिसायला बकरीसारखा असतो. हा प्राणी आपल्या बचावासाठी शत्रूवर थुंकीची पिचकारी मारतो. अशा 'गमतीदार लामा'ची ओळख एका कथेत करून दिली आहे.
'डायनोचा डिस्को' ही थापाड्या विशालची आणि प्राणीप्रेमी विवानची गोष्ट आहे. हे दोघेही मित्र आहेत. विशाल वेगवेगळ्या थापा मारतो. विवानला त्या गोष्टी ख-याच वाटतात. विवान दिवसभर प्राण्यांचे व्हिडिओ पाहतो आणि मग रात्री तेच प्राणी विवानच्या स्वप्नात येतात.
'लपंडाव' ह्या कथेत गुब्या, मनी आणि खारूताईचा लपंडाव रंगला आहे.
हिप्पोपोटमस हा आफ्रिकेच्या जंगलात राहणारा प्राणी. भारतात त्याला पाणघोडा म्हणतात. त्याच्या पिलाचे 'पोटू' हे लाडाचे नाव. हा पोटू मासे, बेडूक, कासव, खारूताई, ससा ह्या मित्रांसोबत वेगवेगळे खेळ खेळतो. पोटू हळूहळू मोठा झाला आणि त्याचा हिप्पोपोटमस झाला. अशा एका अनोळखी मित्राची लेखिकेने गमती गमतीने ओळख करून दिली आहे.
लिली ही रश्मीने पाळलेली मांजर आहे. रश्मीचे आजोबा चांगले वाचक आहेत. ते आपल्या खोलीत वेगवेगळी पुस्तके वाचत असतात. ढ लिली त्या पुस्तकांवर खेळत असते. एके दिवशी रश्मी लिलीला मत्स्यालय दाखवायला घेऊन जाते. तिथे शार्क मासा पाहून लिली बिथरली आणि पळून गेली. बरेच दिवस गायबच झाली. एके दिवशी आपल्या एका मित्रासोबत आजोबासमोर हजर झाली. अशी ही अवखळ लिली तिच्या खोड्यांमुळे हवीहवीशी वाटते.
'साप' म्हटले की आपण सगळेच घाबरतो.
'सापाचे कुतूहल' ह्या गोष्टीतला साप स्वतःच आपली गोष्ट सांगतो आहे. तो एका घरात शिरल्यावर घरातील सगळ्यांची कशी धांदल उडाली, हे त्याने रंगवून सांगितले आहे. शेवटी एक सर्पमित्र येतो आणि सापाला पकडून घेऊन जातो. त्याला सर्पोद्यानात दाखल केल्यावर त्याच्या जीवनातील कुतूहल संपून गेले.
'नीलपंखी' हा जुईच्या तळ्यातील एक मासा आहे. तो कमळाच्या तळ्यात मजेत असतो. पण त्याला खाण्यासाठी खंड्या, वटवाघूळ आणि घुबड हे शिकारी टपून बसले होते. गावी गेलेल्या जुईला नीलपंखची आठवण झाली आणि ती लगेच परत आली. तिने 'नीळू' अशी प्रेमळ हाक मारताच तो खूश झाला. ते पाहून जुईच्या आईबाबांचेही डोळे भरून आले.
'धमाल पडीक शाळेत' प्राण्यांची शाळा भरली आहे. या शाळेत मुख्याध्यापक आहेत पंडित भारद्वाज. कावळे सर, पोपटलाल हिरवे, साळुंकेबाई हे शिक्षक आहेत. शेळी शाळेची घंटी वाजवते. एका रात्री बिबट्याने प्राण्यांवर हल्ला केला आणि ही शाळाच पडीक पडली.
हरी हा एक पाळलेला पोपट आहे. तो शिकवलेले शिकतो आणि तसेच बोलतो. नकला करण्यात पटाईत असतो तो. यालाच 'हरीची पोपटपंची' म्हणतात. एके दिवशी आजोबा म्हणाले, 'मिरची पडली'. पोपटाने ते पक्के लक्षात ठेवले. एके दिवशी छोटी मिनी व्हरांड्यातून खाली उभ्या असलेल्या ट्रकमध्ये पडली. ते पाहून पिंज-यातला हरी फडफडाट करत 'पडली पडली' म्हणत होता. हरीमुळे मिनी वाचली. त्या दिवसापासून त्याने 'पडली पडली' चा घोषच लावला. असा हा हुशार हरी बाळगोपाळांना हवाहवासा वाटतो.
ह्या पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ आणि आतील देखणी सजावट स्नेहा उपळेकर यांनी केली आहे. दिलीपराज प्रकाशनाने बहुरंगी छपाई करून पुस्तकाची निर्मिती अतिशय अप्रतिम केली आहे! प्राणी आणि पक्षी हे नेहमीच बालकुमारांच्या कुतूहलाचा विषय राहिले आहेत. ह्या कथांच्या माध्यमातून लेखिकेने परिचित-अपरिचित प्राणिजगताची मनोरंजक सफर घडवली आहे. ह्या कथा वाचत असताना आपण 'कार्टून नेटवर्क' पाहत आहोत, असेच वाटत राहते. ललितलेखाच्या अंगाने विकसित झालेल्या, चाकोरीबाहेरच्या ह्या कथा बालकुमार वाचकांना निश्चित आवडतील, असा विश्वास वाटतो.
'डायनोचा डिस्को आणि इतर कथा' (बालकथासंग्रह)
लेखिका : विद्या नरेंद्र डेंगळे
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे.
मुखपृष्ठ : स्नेहा उपळेकर
पृष्ठे ५६ किंमत रु. १८०
पुस्तक परिचय : डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा