- एकनाथ आव्हाड यांचे 'ज्ञानरंजक काव्यकोडी' हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे. ह्या पुस्तकाला मी लिहिलेली ही प्रस्तावना :
- हसत-खेळत ज्ञान देणारी एकनाथ आव्हाड यांची 'ज्ञानरंजक काव्यकोडी'
- डॉ. सुरेश सावंत, नांदेड
एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्याचा मी एक रसिक, चाहता, आस्वादक आणि अभ्यासक आहे. एकनाथ आव्हाड यांचे बव्हंशी बालसाहित्य मी वाचले आहे आणि यापूर्वी त्यांच्या बहुतेक सगळ्याच पुस्तकांविषयी मी लिहिले आहे. ज्येष्ठ बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांना त्यांच्या 'छंद देई आनंद' ह्या बालकवितासंग्रहासाठी गतवर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. आव्हाड हे अक्षरपंढरीचे वारकरी आहेत. आव्हाड हे बालसाहित्याच्या क्षेत्रातील एक झपाटलेले झाड आहे. बालकुमारांसाठी त्यांनी सातत्याने, कसदार आणि गुणात्मक लेखन केले आहे. आजवर त्यांची बालकथा, बालकविता, नाट्यछटा, काव्यकोडी, चरित्र इ. वाङ्मयप्रकारांतील ३३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
बालसाहित्यावर त्यांचे निखळ प्रेम आहेच, शिवाय अव्यभिचारी निष्ठा आहे. केवळ विरंगुळा म्हणून ते लेखन करत नाहीत, तर एक ध्यास घेऊन ते लेखन करतात. आपल्या सकस निर्मितीतून त्यांनी उपेक्षित असा बालसाहित्याचा प्रांत समृद्ध केला आहे. चरित्रलेखनाची पारंपरिक चौकट मोडून त्यांनी 'मिसाईलमैन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम' हे चार भागांतील गोष्टीरूप चरित्र लिहिले आहे. स्वाभाविकपणे एखाद्या कळीचे रूपांतर सुंदर फुलात व्हावे, इतक्या सहजतेने ही चरित्रकथा फुलत जाते.
'करील मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे।
जडेल नाते प्रभूशी तयाचे।' हा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा गुरुमंत्र मनाशी जपत त्यांनी प्रयोगशील बालसाहित्य निर्मिती केली आहे. मातृह्रदयी सानेगुरुजींचा आदर्श त्यांच्या नजरेसमोर आहेच. मुंबई महापालिकेच्या शाळेतील एक उपक्रमशील आणि सेवाव्रती शिक्षक असाही त्यांचा लौकिक आहे. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी कथाकथनाचे आणि कवितावाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या कार्यक्रमात बालकुमार श्रोते मंत्रमुग्ध होतात, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. बालकुमारांशी संवाद साधण्याची त्यांची शैली वाखाणण्याजोगी आहे. बालकुमारांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता त्यांच्या वाणीत आणि लेखणीत आहे. आपल्या कथाकथनातून, कवितावाचनातून आणि भाषणांतून बालकुमारांच्या मनावर ते संस्कारांची सहज साखरपेरणी करत असतात.
एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्य हा बालशिक्षणाचाच एक भाग आहे. मुळात त्यांचे व्यक्तिमत्त्वच अतिशय संवेदनशील आहे. त्यांच्या कथेत एक कविता दडलेली असते आणि त्यांची प्रत्येक कथा ही काव्यमय असते. त्यांनी आपल्या बालसाहित्यातून अक्षरशः आनंदाची फुलबाग फुलविली आहे. बालसाहित्याच्या माध्यमातून ते सुगंध पसरविणाऱ्या वा-याची भूमिका बजावत आहेत. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या बालसाहित्याची फारच छान आस्वादक समीक्षा केली आहे. आम्ही त्याचे 'एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्य : बालसमीक्षकांच्या नजरेतून' हे पुस्तक सिद्ध केले आहे.
आता छान छान काव्यकोडी घेऊन एकनाथ आव्हाड बालकुमार वाचकांच्या भेटीला आले आहेत. उमलत्या वयातील मुलामुलींना, एकमेकांना कोडी घालायला आणि कोडी सोडवायला खूप आवडते. कोडी ऐकताना किंवा वाचताना ऐकणा-याच्या किंवा वाचणा-याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. ही चमक उत्कंठेची असते, उत्सुकतेची असते, जाणून घेण्याची असते. काव्यकोडी तशी कमीच लिहिली जातात. जी लिहिली आणि छापली जातात, ती फारशी रंजक आणि उत्कंठावर्धक असतात, असेही नाही. ही अडचण लक्षात घेऊन आव्हाड यांनी जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक उत्तमोत्तम काव्यकोडी लिहिली आहेत. त्यांची ही कोडी यापूर्वी दैनिकांच्या पुरवण्यांत आणि मासिकांत छापून आलेली आहेत. ही कोडी बालकुमार वाचकांना अतिशय आवडलेली आहेत.
एखादी नवीन गोष्ट किंवा माहिती सरळ साध्या विधानातून किंवा वाक्यातून सांगितली, तर फारशी मजा येत नाही. तीच गोष्ट जर आडपडद्याने किंवा आडवळणाने, कोड्यातून सांगितली, तर ऐकणाऱ्याची किंवा वाचणाऱ्याची उत्सुकता वाढते. उदाहरणच द्यायचे झाले तर,
सह्याद्रीच्या कुशीत, हा आहे वसलेला
शिवराज्याभिषेकाचा, तो साक्षीदार झाला
अभेद्य, अजिंक्य हा, स्वराज्याची राजधानी
पूर्वीचं नाव रायरी, आताचे नाव सांगा कुणी?
याचे उत्तर काय बरं असेल? मुलांचे विचारचक्र सुरू होते, उत्सुकता वाढवते. रायगड हे याचे उत्तर त्यांना सांगता आले की मग आनंदही होतो आणि नकळत अभ्यासही होतो.
मला वाटतं, उत्सुकता निर्माण होणे, जिज्ञासा जागृत होणे हीच ज्ञानग्रहणाची पहिली कसोटी असते. एक चांगला शिक्षक अध्यापनाला सुरुवात करण्यापूर्वी उत्कंठावर्धक प्रस्तावनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करत असतो. त्याप्रमाणे एकनाथ आव्हाड यांनी विविध विषयांवरील वाचकांची जिज्ञासा जागवून ह्या कोड्यांच्या माध्यमातून नवीन माहिती आणि ज्ञान दिले आहे. उदाहरणार्थ
पुरलेला, टांगलेला, दोरीचासुद्धा असतो
अढी, तेढी, बगली,फिरकी घेताना दिसतो
कधी डोके खाली, तर कधी वर पाय
या कसरतीच्या खेळाचे, सांगा नाव काय ?
या कोड्यातून त्या खेळाची विशेष माहिती मिळते. अढी, तेढी, बगली, फिरकी ज्या खेळात तो खेळ म्हणजेच मल्लखांब.
मल्लखांबाबद्दलची बरीच माहिती मुलांच्या ज्ञानात भर घालते.
कुत्रा हा सर्वसामान्य प्राणी. पण यावरच कोडं किती खास आहे ते पाहा...
आंधळे दळते, कोण पीठ खाते?
कोणाचे शेपूट बरं, वाकडेच राहते ?
भीक नको पण, कोणाला आवर?
या म्हणींत कोण लपलंय, सांगा भरभर?
या कोड्याचे उत्तर कुत्रा असले तरी कुत्र्यासंबंधीच्या म्हणींचा येथे सहज अभ्यास होतो. अशी अनेक वैशिष्ट्ये या कोड्यांची सांगता येतील.
ह्या कोड्यांमध्ये विषयांची विविधता आहे. विविध खेळ आणि खेळाडू, समाजसुधारक आणि शास्त्रज्ञ, संशोधक आणि क्रांतिकारक, लेखक आणि कवी, गडकिल्ले आणि शहरे, पशुपक्षी आणि फुलेफळे, धान्य आणि खाद्यपदार्थ, व्याकरणातील रूक्ष आणि अवघड संकल्पना, आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्याविषयीची रंजक माहिती कोड्यांच्या माध्यमातून सांगितली आहे. म्हणी आणि वाक्प्रचारही यातून सुटले नाहीत. विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्दही ह्या कोड्यांमध्ये छान गुंफले आहेत. एरवी विरामचिन्हांच्या व्याख्या पाठ करून त्या लक्षात ठेवायला अवघड गेल्या असत्या. पण कोड्यांमध्ये विरामचिन्हांची ओळख अतिशय लालित्यपूर्ण पद्धतीने करून दिली आहे. बाष्पीभवन आणि सांद्रीभवन यांसारख्या विज्ञानातील संकल्पनाही सोप्या करून सांगितल्या आहेत.
आयते ज्ञान मिळण्याच्या ह्या काळात कोड्यांचा मनोरंजक खेळ दुर्मीळ होत चालला आहे. अशा कालखंडात ह्या कोड्यांच्या माध्यमातून मनोरंजन आणि ज्ञान जिवलग मित्रांसारखे हातात हात घालून आले आहेत. १४५ काव्यकोडींचा खजिना म्हणजे काही साधी गोष्ट नाही. काव्यकोडी रचणे हा शब्दांचा खेळ किंवा रिकामपणाचा उद्योग नव्हे. ह्या ज्ञानवर्धक काव्यकोड्यांच्या निमित्ताने एकनाथ आव्हाड यांचे मनापासून, अगदी मनापासून अभिनंदन!
डॉ. सुरेश सावंत, नांदेड
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा