'अखेर सापडली वाट' : बालकथेचा राजमार्ग डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

अखेर सापडली वाट' हा एकनाथ आव्हाड यांचा नवीन बालकथासंग्रह सकाळ प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. ह्या संग्रहात एकूण ११ कथा आहेत. 'पोचपावती' ह्या कथेतील मंगेश, रमाकांत, शंतनू, विश्वनाथ आणि शैलेश हे विद्यार्थी सशस्त्र ध्वजदिन निधी गोळा करायला निघाले आहेत. पण त्यांना आपण हा निधी कशासाठी गोळा करतोय, तेच माहीत नाही. मंगेशचे बाबा त्यांना समजावून सांगतात, की माजी सैनिकांचे कल्याण आणि पुनर्वसन करण्यासाठी सरकारने हा निधी स्थापन केला आहे. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी, तसेच युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी, वृद्ध, निवृत्तीवेतन नसलेल्या सैनिकांच्या विधवा बायका आणि अनाथ मुलांच्या कल्याणासाठी हा निधी वापरला जातो. सर्वाधिक निधी गोळा केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते मंगेशचा सत्कार करण्यात आला. देशकार्य केल्याची मंगेशला 'पोचपावती' मिळाली. 

'अखेर सापडली वाट' ह्या कथेतील सुधीर हा एक आळशी मुलगा आहे. त्याला सुधारण्यासाठी समजावून सांगताना त्याचे बाबा त्याला म्हणतात, 'इतरांना मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो'. बाबा त्याला एका कार्यतत्पर विळ्याची आणि गंजत पडलेल्या आळशी विळ्याची गोष्ट कवितेतून सांगतात. याचा सुधीरच्या मनावर चांगला परिणाम होतो. शेवटी तो म्हणाला, 'कोप-यात बसून गंजून पडण्यापेक्षा पुढे येऊन काम करून सदैव लखलखीत राहीन'. 

बाबांनी प्रेमळ प्रयत्न केल्यामुळे सुधीरला अखेर वाट सापडलीच! दुसर्‍या एका गोष्टीत, 

शाळेचा कंटाळा करणाऱ्या रघुनाथच्या वर्तनात असेच अपेक्षित परिवर्तन झाले आणि त्याला 'शाळेचा लळा' लागला.

हल्ली मराठी माध्यमाच्या शाळेकडील लोकांचा कल कमी झाला असून महागड्या इंग्रजी माध्यमाचे आकर्षण वाढले आहे. 'छोटेसे बहीण - भाऊ' ह्या कथेतली मोलकरीण राधामावशीची मुलगी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकते आहे. परवडत नसतानाही, राधामावशी आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देऊ इच्छिते. 

बाळूची आई बच्छेंद्री पॉल, हिना सिंधू, सायना नेहवाल, मिताली राज, फातिमा बेवी इ. कर्तबगार महिलांची उदाहरणे देऊन समजावून सांगते, 'मुलगा मुलगी एकसमान, दोघंही उंचावतील देशाची मान'. 

अखेर राधामावशी 'मुलगा - मुलगी असा भेदभाव कधीच करणार नाही' असा निर्धार करते. समतेचा हा संस्कार कमी वयातच मुलामुलींच्या मनावर बिंबविणे गरजेचे आहे. 

यशाच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. 'यशाकडे जाणारा मार्ग' ह्या कथेची नायिका रिया ही शिक्षणासाठी खेड्यातून मुंबईत आली आहे. ती आठवीत शिकते आहे. रियाचे उच्चार खेडवळ असल्यामुळे सगळे तिला हसायचे. एके दिवशी सरोदे सर रियाच्या वर्गात 'आईसक्रीम'ची गोष्ट सांगतात. 'आ' म्हणजे आत्मविश्वास, 'इ' म्हणजे इच्छाशक्ती, 'स' म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, 'क्री' म्हणजे क्रियाशीलता, 'म' म्हणजे महत्त्वाकांक्षा. रियाला आईसक्रीमची ही गोष्ट फारच आवडली. सरोदे सर रियाला सांगतात, 'कुणी उपहासाने हसले, म्हणून खचून जाऊ नये. कौतुक प्रेरणा देतं आणि टीका आपल्याला सुधारण्याची संधी देते'. हाच मंत्र लक्षात ठेवून रियाने आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. त्या वेळी रिया म्हणते, 'यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो'.

'बक्षीस' ह्या कथेतील दत्तूला त्याच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस मिळाले आहे. 'मैत्री' ही कथा सहकार्य आणि संवेदनशीलतेचा संस्कार बिंबविते. आपण सगळेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळे संकल्प करतो आणि हळूहळू ते विसरूनही जातो. ज्यांचे संकल्प सिद्धीला जातात, तीच माणसे मोठी होतात. अशाच आशयाची कथा आहे, 'नववर्षाभिनंदन'. ह्या कथेची नायिका सोनाली गावडे हिने रोजनिशी लिहिण्याचा संकल्प सिद्धीस नेला. तिच्या गुरुजींनी तिची ती रोजनिशी पुस्तकरूपात छापली. त्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ५० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. सत्काराला उत्तर देताना सोनाली म्हणाली, 'आपण सोडलेला एखादा संकल्प आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो'. 

सोनालीच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी खरोखरच कौतुकास्पद आहे. ह्या कथेत लेखकाने कल्पना आणि वास्तव यांचा छान मेळ साधला आहे.

कष्टकरी वर्गातील, कनिष्ठ मध्यमवर्गातील मुला-माणसांच्या ह्या आशावादी गोष्टी आहेत. प्रत्येक कथेची भाषा ओघवती आहे. काव्यकोडींतून करून दिलेली महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख अतिशय प्रेरणादायी आहे. दैनंदिन जीवनातील म्हणींच्या वापरामुळे ह्या कथांची रंजकता आणखी वाढली आहे. एकनाथ आव्हाड यांच्या लेखनात कथा आणि कविता हातात हात घालून येतात. त्यामुळे ह्या कथा काव्यमय झाल्या आहेत. एकनाथ आव्हाड हे बहुप्रसवा बालसाहित्यकार असले, तरी त्यांच्या लेखनात तोचतोचपणा कधीच येत नाही. उलट प्रत्येक कथा काही एक नवीन विचार देऊन जाते. 

'वाढदिवसाची भेट' ह्या कथेत लेखकाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सफर घडवली आहे. 'आनंदाच्या नव्या वाटा' ह्या कथेत निसर्गरम्य कोकणाची आनंददायी सहल घडवली आहे. शेवटच्या कथेत 'आवड असली, की सवड मिळतेच' हा संदेश दिला आहे. ह्या सर्वच कथा अतिशय साध्या सोप्या आणि वाचनीय आहेत. उषा तांबे यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, बालसाहित्य बालिश होऊ नये आणि ते बोजडही होऊ नये, याची जाण एकनाथ आव्हाड यांना आहे. त्यांची कोणतीही कथा निव्वळ रंजनपर नाही किंवा उपदेशपरही नाही. प्रत्येक कथेच्या शेवटी लेखकाने नकळतपणे काही एक संदेश दिला आहे, जो लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोन दर्शवितो. 

'अखेर सापडली वाट' (बालकथासंग्रह) 

लेखक : एकनाथ आव्हाड 

प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे. 

पृष्ठे : ७८       किंमत रु. १४०

मुखपृष्ठ : संतोष घोंगडे 

पुस्तक परिचय :

डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या