'आभाळमाया' ह्या पुस्तकाविषयी कु. प्रज्ञा दीक्षा राजेभाऊ काकडे ह्या मुलीने मला पत्र लिहून कळवले आहे.

माझ्या 'आभाळमाया' ह्या पुस्तकाविषयी कु. प्रज्ञा दीक्षा राजेभाऊ काकडे ह्या मुलीने मला पत्र लिहून कळवले आहे. प्रज्ञा परभणी जिल्ह्यातील, सेलू तालुक्यातील रायपूरच्या जि. प. प्रा. शाळेत इयत्ता चौथीत शिकते. चौथीत शिकणाऱ्या मुलीची पत्रलेखनातील प्रज्ञा पाहून आपण नक्कीच प्रभावित होतो. 

तीर्थस्वरूप डॉ. सुरेश सावंत सर, 

सप्रेम नमस्कार.

प्रिय सर, तुमचा ‘आभाळमाया’ हा कवितासंग्रह वाचला. मला खूप आवडला. सर, यामधील ‘बहुरूपी झेंडू’ ही कविता मला खूप आवडली. ही कविता किशोरच्या दिवाळी अंकातसुद्धा आली आहे.

मात्र मला एका ओळीचा अर्थ कळाला नव्हता. नंतर सरांनी मला या ओळीचा अर्थ सांगितला. ती ओळ अशी होती…

'झेंडूचा शिवार, गालिचा पिवळाशार,

शेंड्यावर झुलते गेंदाफूल गोंडेदार'.

सर, तुम्ही लिहिले आहे की…

'हळदुल्या शेवंतीचे असे भावंड थोरले,

काळ्या आईच्या कुशीत इंद्रधनुष्य कोरले' 

असं तुम्ही लिहिले आहे. मात्र इंद्रधनुष्याच्या जागी 'निसर्गधनुष्य' पाहिजे असं मला, आमच्या सरांना व माझ्या मैत्रिणींनाही वाटते.

सर, माझी मम्मी मला कविता वाचताना म्हणाली, “परी, येथे ‘आभाळमाया’ या नावाच्या ऐवजी ‘आभाळाची माया’ हे नाव पाहिजे होतं.”

'आभाळमाया' कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ खूप छान आहे. मुखपृष्ठ आणि पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ३६वर सारखंच चित्र आहे. मी त्या दोन्ही चित्रांमध्ये फरक आहेत का ते शोधू लागले. मला चित्रात थोडेफार फरक दिसून आले. जास्त फरक आढळले नाहीत. मुखपृष्ठ पलटलं की तुम्ही किती कवितासंग्रह लिहिलेले आहेत, ते दिसून येतात.

सर, तुम्हाला प्रश्न पडेल की मला हीच कविता का आवडली? कारण झेंडूशिवाय इतर कोणी फुलं देणार नाही. झेंडूच आपल्याला रंगीबेरंगी  फुलं देतो. दिवाळीत पण त्याच्या माळाबिना रंगत येत नाही. मी आता थोडक्यात 'आभाळमाया' कवितेविषयी सांगते…

'पावसाळ्यात आभाळाची 

ओली माया रिमझिमते,

आभाळाच्या अभिषेकाने 

धरती हिरवीगार होते'. 

हे कडवं मला खूप आवडलं, कारण तुम्ही लिहिले आहे , की आभाळाच्या अभिषेकाने धरती हिरवीगार होते, हे खरंच आहे. आपण त्यावर लोळतो. त्यावेळी किती बरं मजा येते! मग असं हे कडवं आवडेलच ना!

आता  ‘पपई’या कवितेविषयी मी सांगते. या कवितेमधील खालील कडवे खूप आवडले…

'सरळसोट वाढले 

फांदी नाही फुटली,

गोलाकार सावली 

छत्रीसारखीच वाटली'. 

खरंच पपईचं झाड हे छत्रीसारखंच दिसतं. तुम्हाला प्रश्न पडेल, की मला हे कसं काय माहिती आहे? कारण मी हे झाड चित्रामध्ये आणि प्रत्यक्षात पण पाहिलेलं आहे. मला पपईच्या झाडाच्या पानाचा भोंगा वाजवायला खूप आवडायचा. आमच्या इथे पपईचे खूप झाडं होते. मात्र ते वाळून जाऊ लागले, म्हणून माझ्या पप्पांनी ते सगळे झाडं तोडून टाकले.

‘झाड माझा मित्र’ ही कविता खूपच छान आहे. आता या कवितेविषयी सांगते. कवितेच्या नावावरूनच कळते, की झाडं हे तुमचे मित्र आहेत. सर, आमच्याकडेसुद्धा झाडं खूप आहेत आणि ते आमचेपण मित्र आहेत. पुस्तकातील झाडाचे चित्र छान आहे. मला चित्र खूप म्हणजे खूपच आवडले. मला वाटते, की ते झाड चाफ्याच्या फुलांचे आहे. त्या झाडावर एक मुलगा आहे. त्या मुलाच्या हातात लाल चाफ्याचे फूल आहे व झाडावर पांढरे फुलं आहेत. असं का बरं केलं आहे?

आता ‘काजव्यांच्या गावात’ या कवितेविषयी सांगते. मला ही कविता काजव्यांमुळेच आवडली, कारण माझी आजी मला तिच्या लहानपणीच्या काजव्यांच्या गोष्टी सांगायची. ती म्हणायची, “आम्ही एका डब्यात काजवे पकडून ठेवायचो आणि अंधारात गेलोत की तो डब्बा घेऊन जायचो. दुसऱ्या दिवशी ते सोडून द्यायचो.” अशी माझी आजी तिच्या लहानपणीची गोष्ट सांगायची. 

‘वड आजोबा’ या कवितेविषयी सांगते  आमच्या गावात एक वडाचे झाड आहे. वडाखाली म्हातारी माणसं बसतात. शाळेची इंटरवेल झाली, की मुलं-मुली वडाच्या झाडावर चढतात. काही खाली खेळतात. लहान लेकरं जसं आजोबांच्या खांद्यावर खेळतात, तसंच वडाच्या अंगाफांद्यावर मुलं-मुली खेळतात, हे मला आठवलं.

सर, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या.

       धन्यवाद. 

प्रज्ञा दीक्षा राजेभाऊ काकडे 

वर्ग - चौथा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रायपूर

ता. सेलू जि. परभणी.

टिप्पण्या