बाई'पणाचा साचा मोडू पाहणारी कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड

'मी एक स्रीजातीय अस्वस्थ आत्मा', 'संबद्ध', 'बदलत गेलेली सही', 'रात्र, दु:ख आणि कविता', 'जगण्याचे सुंदर ओझे' यानंतरचा 'शाबूत राहो हे लव्हाळे' हा अंजली कुलकर्णी यांचा सहावा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. स्त्री हा तर कवयित्रीच्या चिंतनाचा मुख्य विषय आहेच, त्याशिवाय त्यांनी ह्या संग्रहात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, हरवत चाललेले माणूसपण, वाढाळू माणसाला बोन्साय करू पाहणारी समाजव्यवस्था, वाढती जातीयता आणि धर्मांधता, वाढत चाललेला द्वेष मत्सर, हिंसाचार, समाजमाध्यमांचे आभासी विश्व, वाढती मनोरुग्णता, कृत्रिम झगमगाटातील गुदमरलेपण, स्वप्नविझल्या माणसांचे शोषण, निसर्गाचे बदलते रूप, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, देवाधर्माच्या नावाखाली मांडलेला भक्तीचा बाजार, समाजविघातक असहिष्णू फूत्कार, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, तृतीयपंथीयांची उपेक्षा, पुरुषी मानसिकता, स्त्रीभ्रूणहत्या इ. विषयांवरही काव्यात्म प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.


विकासाच्या नावाखाली परस्परांतील संवाद हरवत चालला आहे. जातिधर्मांच्या, पक्षांच्या आणि इझमच्या अंधभक्तांच्या भावना अनिर्बंध झाल्या आहेत. डिवचलेल्या सापांसारखे ते कधीही क्रुध्द होत आहेत. अंधभक्त अगदी सहजपणे बुद्धाकडून युद्धाकडे निघाले आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. याचे कवयित्रीला सापडलेले उत्तर मोठे सूचक आहे. 

'माणसांपेक्षा जात मोठी

माणसांपेक्षा धर्म मोठा 

माणसांपेक्षा तत्त्व मोठे

माणसांपेक्षा वाद मोठे

माणसांपेक्षा मानवतेच्या घोषणा मोठ्या 

सगळ्यांमध्ये सत्ता मोठी'. (शा. रा. हे ल. २१)

हे ते उत्तर होय. 

विद्वेषाच्या या प्रवृत्तीवर कवयित्री एक नामी उपाय सुचवते :

'जात धर्म लिंग। विषमांचे मूळ। 

बुडवू समूळ। समुद्रात। (शा. रा. हे ल. ८१)

ह्या उपायामुळे आता ही कविता महात्मा फुल्यांनी दाखविलेल्या सार्वजनिक सत्य धर्माच्या मार्गाने जाताना दिसते. 


आपल्या समाजव्यवस्थेला वटवृक्षाचा बोन्साय बनवण्याचं बेमालूम कौशल्य अवगत आहे. 'व्यवस्था' ह्या कवितेत कवयित्री लिहिते:

'शाळा नेते त्याला कोसो मैल दूर 

जगण्याच्या शिक्षणापासून 

नि भलभलतेच शिकून चुकतो तो

विद्वत्तापूर्ण पोपटपंचीमधून'.(शा. रा हे ल. २२)

ह्या ओळींतून कवयित्रीने आपल्या पोपटपंची शिक्षणव्यवस्थेचे डागाळलेले चारित्र्य उजागर केले आहे. हीच व्यवस्था विकसनशील व्यक्तिमत्त्वाला चरकातून पिळून काढून त्याला आपल्या साच्यात फिट बसवते आणि मग त्याला 'सुखी आणि यशस्वी' माणसाचे सर्टिफिकेट बहाल करते. ही माणसाच्या आयुष्याची क्रूर, करुण विटंबना आणि शोकांतिका आहे, असे कवयित्रीला वाटते. 

धर्माच्या नावाखाली एकमेकांना कापून काढण्याचीच शिकवण दिली जात असेल, तर उद्या मनुष्यहीन पृथ्वीवर धर्म, धर्मग्रंथ आणि धर्मस्थळे तरी आनंदाने नांदतील का? हा प्रश्न कवयित्रीलाअस्वस्थ करतो आहे. 


आजचे सामाजिक पर्यावरण फारच दूषित झाले आहे. सामान्य माणसाला सर्वार्थाने भेडसावणारा हा कालखंड आहे. कवयित्रीला असे वाटते, की सामान्यतः काही लोकांना सतत एक शत्रू किंवा एक प्रतिस्पर्धी हवा असतो, म्हणूनच कदाचित आम्ही धर्म, वर्ग, जाती निर्माण केल्या आहेत की काय? असाही प्रश्न पडतो. इथे लिंगभेदही कटाक्षाने पाळले जातात. पुरुषाला 'पुरुष' म्हणून आणि स्त्रीला 'स्त्री' म्हणूनच घडविले जाते. दोघांनाही 'माणूस' म्हणून घडविले जात नाही. जणू शत्रू मिळवणं, हीच आमच्या जगण्याची मूलभूत प्रेरणा आहे आणि यातच आमच्या व्यवस्थेचा पराभव आहे. 


मोबाईलवर 'विष्णू' हा शब्द टाईप करत असताना तो शब्द 'विषाणू' होऊन कवयित्रीच्या समोर उभा ठाकला. म्हणून कवयित्री म्हणते, 'समजलंच नाही, विष्णुमय जग विषाणूमय कधी झालं'. हल्ली विद्वेषाचे, त्वेषाचे आणि हिंसेचे आक्रमक विषाणू एकमेकांचे अस्तित्व संपवण्यासाठी परस्परांवर तुटून पडत आहेत. 'विष्णुमय' आणि 'विषाणूमय' हे दोन प्रासयुक्त तरीही परस्परविरोधी शब्द शेजारी योजून कवयित्रीने विसंगतीतून अर्थाचे फार मोठे अवकाश कवेत घेतले आहे. 

'विषाणूमय' ह्या कवितेच्या शेवटी कवयित्री लिहिते :

'विषाणूमय जग। विषाणूंचा मेळा। 

संसर्गाचा मळा। पंढरपुरी।' (शा. रा. हे ल. ३०)

ह्या ओळींतून समकालीन धगधगत्या समाजवास्तवाचा उपहास आणि उपरोध अतिशय टोकदारपणे व्यक्त झाला आहे. तात्पर्य, अंजली कुलकर्णी यांची कविता म्हणजे कलात्मक स्वरूप लाभलेले सुंदर असे विचारकाव्य आहे. 


सोशल मीडियाच्या मृगजळात लोकांना आभासी नात्यांची अनावर नशा चढवलेली आहे. आपला चेटकिणीसारखा दिसणारा सेल्फी सोशल मीडियावर डकवण्यात लोकांना धन्यता वाटते आहे. परिणामी, रोमॅण्टिकपणाचा रंगीत बगीचा ओसाड झाला आहे. सगळीकडे निरंग नि  निरर्थकाचा फापटपसारा माजला आहे. 'माझे माझे' म्हणताना प्रत्येकाला अपरिहार्यतेची करुण मिठी पडलेली आहे. यालाच कवयित्रीने 'चांदण चकव्याचं भासमय विश्व' संबोधले आहे. हा सगळा असा एकूण विषादाचा काळ आला आहे. अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीत

'पैसा झाला मोठा पाऊस आला खोटा

पाऊस कोसळतोय बाहेर धुवांधारसा

कळत नाहीये फुटपाथवर बसलेला

स्किझोफ्रेनिकांचा

जत्था का वाढलाय अचानकसा?' (शा. रा. हे ल. ३८)

हा कवयित्रीप्रमाणेच संपूर्ण समाजाला पडलेला यक्षप्रश्न आहे. आता माणसांची अवस्था पंखकापल्या पाखरांसारखी झाली आहे. 


जसा समाज, तशीच राजकीय परिस्थिती. 

म्हणूनच कवयित्रीला प्रश्न पडतात :

'हा देश आहे की एखादी कॉर्पोरेट कंपनी? 

ही माणसे आहेत की चार्ज केलेले रोबोट बाहुले? 

हे सरकार आहे की महाकाय पिंजरा? 

हा समाज आहे की जातिधर्मांनी 

उघडलेला कत्तलखाना?' (शा. रा. हे ल. ४३)

विकृत मनोवृत्तीच्या ह्या मूलतत्त्ववादी माणसांना व्हायरल फिवरनं पछाडलय, म्हणूनच हे एकमेकांवर असहिष्णू फूत्कार टाकत आहेत. कोणाच्याही अंतःकरणातून प्रेमाच्या झिरपझ-यांचे आवेग पाझरताना दिसत नाहीत. म्हणूनच कवयित्रीला अपरिहार्यपणे कवितेकडे वळावे लागते. त्यांच्या कवितेत उत्कट संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवते. 


आज आपल्या भोवताल महाप्रलयासारखी, भोवंडून टाकणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मानवी मूल्यव्यवस्था बदलली आहे. जसा माणूस बिघडला, तसा निसर्गही बिघडला आहे. त्याचे चित्र उभे करताना कवयित्रीने लिहिले आहे :

'पावसानं तोडलय नातं ऋतूंशी

नि मातीनं सृजनाशी. 

फुलं आणि फुलपाखरं

वाटेवरच आहेत

नरभक्षक होण्याच्या'. (शा. रा. हे ल. ४५)

माणसाच्या सहवासात सौंदर्याचे प्रतीक असलेल्या फुलांना आणि फुलपाखरांनाही हिंसाचाराची लागण झाली आहे, ही कल्पनाच फार भयावह आहे. फुले आणि फुलपाखरे नरभक्षक होण्याच्या मार्गावर असतील, तर मानवजातीसाठी हा केवढा मोठा धोक्याचा इशारा आहे! 


ह्या सडलेल्या समाजव्यवस्थेत 'बाई'ची स्थिती यापेक्षा वेगळी असणे शक्यच नाही. कारण तीही ह्या समाजव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. स्त्रीच्या स्थितिगतीचा शोध घेताना कवयित्रीने लिहिले आहे :

'झगमगत्या प्रकाशापासून लपतछपत

जगणाऱ्या समूहांचे पाऊल 

पडतच गेले एकेका शतकाने मागेमागे 

नि स्त्रिया झाल्या बंदिस्त गुहांमध्ये'. (शा. रा. हे ल. २७)

अश्मयुगापासून संगणकयुगापर्यंत मानवाने केलेली प्रगती म्हणजे शाब्दिक बुडबुडे तर नव्हेत ना, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा. दिसामासाने एकेक पाऊल पुढे पडण्याऐवजी आमचा समाज एकेका शतकाने मागेच जात असेल, तर याला पुच्छप्रगती म्हणायचे का अधोगती? पशूंसारखे गुहांमध्ये बंदिस्त होणे, हा रानटीपणाचा प्रवास आहे. यातून मानवी जंगलराज माजेल की काय,अशी भीतीही कवयित्रीने व्यक्त केली आहे. 


वास्तविक 

'बाईला हवा असतो संवेदनांचा सोबती

मनाच्या हरेक हिंदोळ्याला जोजवणारा साजण

ती देते लिहून तिच्या देहमनाची मालकी

ठेवते भरून त्याच्या खुशीसाठी शंभर रांजण'. (शा. रा. हे ल. १०४)

हे 'त्या'ला समजत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. दुर्दैवाने तिच्या सभोवताल दिसतात ते लालस नजरांचे ययाती, हे कटूवास्तव आहे. व्यापक जीवनानुभवांतून अवतरलेली, अंजली कुलकर्णी यांची कविता ही माणसातील 'माणूसपणा'ला आवाहन करणारी कविता आहे. 


नदीसाठी वापरले गेलेले स्त्रीचे रुढीबाज प्रतीक कवयित्रीला मान्य नाही. नदीने आणि स्त्रीने आपला मोकळा खळाळ जपावा, असे कवयित्रीला वाटते. पुरुष हा स्त्रीचा जिवाभावाचा, छानसा मित्र असावा, ही किमान अपेक्षा आहे. परंतु प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. म्हणून 'हे नेहमी पुरुष म्हणूनच का भेटतात पुरुष?' हा प्रश्न कवयित्रीला सतावतो आहे. 

याचे उत्तरही कवयित्रीला लगेच सापडते :

'तिची धार, तिची शक्ती, तिची क्षमता 

त्याला ठाऊक असते 

म्हणून त्याला सारखी भीती वाटते, 

सारखी भीती वाटते'. (शा. रा. हे ल. ९२)


कळस म्हणजे, कधीकधी तिचा जन्माला येण्याचा हक्कही नाकारला जातो. अशा वेळी गर्भातली 'ती' आपल्या जन्मदात्रीला विनंती करते आहे :

'जन्मदे, जन्म दे मला

आणि स्त्री-पुरुष समानतेलाही

जन्मदे, जन्म दे मला 

आणि माणसांच्या न्यायबुद्धीलाही

जन्मदे, जन्म दे मला.... ' (शा. रा. हे ल. ९३)

गर्भातील स्त्रीदेहधारी अमूर्त जीवाचा हा टाहो कठोर काळाच्याही काळजाला भेदून जातो. अंजली कुलकर्णी यांच्या पहिल्या कवितासंग्रहात (मी एक स्रीजातीय अस्वस्थ आत्मा) रुजलेली अस्वस्थता त्यांच्या सहाव्या संग्रहातही कायम आहे. किंबहुना उत्तरोत्तर ती अधिक धारदार होत गेली आहे. आपल्या मिताक्षरी शैलीत ही कविता प्रश्न उपस्थित करते आणि प्रश्नांची उकलही करते. 


नाइलाजाने देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांचे दु:खही कवयित्रीला अस्वस्थ करते. 

'अरे बाजार बाजार 

जसा देह मोलावर

आधी डसती इंगळ्या 

तेव्हा मिळते भाकर'. (शा. रा. हे ल. ६०)

बहिणाबाईंच्या अक्षरवाटेने जाणारी ही अभिव्यक्ती जितकी अर्थसघन, तितकीच भावस्पर्शी आहे. समाजाने ज्यांना कायम समासात ठेवून दिले आहे, अशा वंचित समाजघटकांचा कैवार घेऊन ही कविता तळमळीने बोलते. अंजली कुलकर्णी यांनी ह्या कवितेत उपेक्षितांच्या व्यथावेदनांना उद्गार दिला आहे. 


'समजल्यावर' ह्या कवितेत आपले मनोगत मांडताना कवयित्रीने लिहिले आहे :

'घडवली गेले बाई म्हणून, बालवयापासून 

दुनियादारीच्या साच्यात बसवून 

माणूस म्हणून त्यात काहीच नाही 

हे समजल्यावर साचे मोडून काढले'. (शा. रा. हे ल. ७१)

बाईपणाच्या साच्यात बसविण्याचा व्यवस्थेचा क्रूर डाव ओळखून कवयित्रीने हे पारंपरिक साचेच मोडून काढले, हा कवयित्रीचा 'माणूस' म्हणून मोठाच विजय आहे. 


कवयित्रीने एका ठिकाणी भोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे असहाय्यता आणि हतबलता व्यक्त केली आहे. 'कोवळे कवित्व' ह्या कवितेत म्हटले आहे :

'हे स्वतःमधले इवले कोवळे कवित्व जपणे

कठीण होत चालले आहे 

आणि दिवसेंदिवस दुनियेशी टक्कर घेणेही'. 

(शा. रा. हे ल. ११९)

तथापि ही हतबलता फार काळ टिकणारी नाही. 


विजिगीषू वृत्तीच्या कवयित्रीने सभोवतालच्या कुचंबणेतून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी कवितेला जवळ केले आहे. कारण कविता ही जिवाभावाची सखी वाटते, म्हणूनच कवयित्री लिहिते :

'या कविताच आहेत माझ्या 

संवेदनांचा प्रवास 

या कविताच आहेत 

माझ्या पाठीचा कणा 

माझ्या अस्तित्वाचा मूलाधार 

मला इथे तगवून ठेवलेल्या.

या कविता माझ्यासारख्याच

साध्यासुध्या, ओबडधोबड, 

महानतेचा सोस नसलेल्या'. (शा. रा. हे ल. १२१) 


ह्या कवितेला महानतेचा सोस नसला, तरी ह्या कवितेची महत्ता वादातीत आहे. अंजली कुलकर्णी यांची कविता म्हणजे मानवतेचा आणि विवेकाचा भारदस्त आवाज आहे. 

हल्ली दमनकारी यंत्रणेच्या दहशतीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे, हे नोंदवताना कवयित्रीने लिहिले आहे :

'कधीकाळी कवी लिहीत होता कविता 

परिवर्तनाची, क्रांतीची, जग बदलाची... 

आताशा कवीला भीती वाटतेय

आपल्याच ऊर्जावान शब्दांची 

लेखणीतून बाहेर येणार्‍या सत्याची

राजद्रोहाच्या शिक्क्याची'. (शा. रा. हे ल. १२६)

चिंतनशीलता हा अंजली कुलकर्णी यांच्या कवितेचा स्थायीभाव असून ही कविता शब्दांचा फुलोरा फुलविण्यापेक्षा विचारचिंतनाला प्राधान्य देते. 


अंजली कुलकर्णी यांची कविता अतिशय साधी, सोपी, सरळ, सुबोध आणि आशयसंपन्न आहे. ही कविता अंगावर येणारा वर्तमान अधिक गडद करते आणि वाचकाशी थेट संवाद साधत ती वाचकाला अंतर्मुख करते. आपला भयाण भोवताल अल्पाक्षरांत बांधण्यासाठी कवयित्रीने उपयोजिलेली रोजगाराचा पर्वत, विंडोतलं आकाश, निरर्थकाचा पसारा, पंखकापली पाखरं, स्वप्नविझली माणसे, अपरिहार्यतेची करुण मिठी, असहिष्णू फूत्कार, झिरपझ-यांचे आवेग, रुढीबाज प्रतीक, आदिम प्रेरणांचे चिरे, विषादाचा काळ, लालस नजरांचे ययाती, संवेदनांचा प्रवास इ. प्रतिमा-प्रतीके मोठीच अन्वर्थक आहेत. 


सांस्कृतिक क्षेत्रातील दहशतवादाची जाणीव करून देणारी ही कविता आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कवयित्रीचा आपल्या कवितेवर दृढ विश्वास आहे. म्हणून कवयित्री तितक्याच आत्मविश्वासाने लिहिते :

'मी लिहिते तेव्हा 

उसळतात लाटांवर लाटा

समुद्राला भरती येते

पूर्ण चंद्र बनून कविता 

आसमंत उजळून घेते'. (शा. रा. हे ल. १११)

अंजली कुलकर्णी यांची कविता ही आत्मभानाची कविता आहे. कवयित्रीने व्यक्त केलेला आपल्या कवितेवरचा हा उदंड विश्वास सार्थ ठरावा. मानवतावादी कवितेचे हे रसरशीत लव्हाळे चिरायू व्हावे, ही शुभकामना! 


'शाबूत राहो हे लव्हाळे' (कवितासंग्रह) 

कवयित्री : अंजली कुलकर्णी 

प्रकाशक : सृजनसंवाद, चरई, ठाणे. 

मुखपृष्ठ : पुराजित

पृष्ठे : १२८        किंमत रु. २५० 


पुस्तक परिचय :

डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या