डॉ. नरेंद्र पाठक यांचा ललितरम्य आणि विचारप्रवर्तक 'वानोळा' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

'चैत्रेय' वासंतिक अंकाचे संपादक व प्रकाशक डॉ. नरेंद्र पाठक यांचा 'वानोळा' हा ललित लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. ह्या संग्रहात विविध विषयांवरील १४ लेख आहेत. पैकी ४ व्यक्तिचित्रे आहेत. ह्या पुस्तकाचा आकार छोटा असला, तरी ह्या पुस्तकाने सामाजिक आशयाचे फार मोठे अवकाश आपल्या कवेत घेतले आहे. 

'निजरूप दाखवा हो' ह्या लेखात ह. भ. प. विश्वनाथबुवा यांचे ठसठशीत व्यक्तिचित्र रेखाटले आहे. बुवा आध्यात्मिक वृत्तीचे कीर्तनकार होते, पण त्यांनी कधीही बुवाबाजी केली नाही. भाविकांच्या हाताला गंडेदोरे बांधून भक्तांच्या झुंडी तयार केल्या नाहीत. कधी कर्मकांडाचा आग्रह धरला नाही. भक्तीचा बाजार मांडला नाही. उलट जनसामान्यांना गीतेतील कर्मसिद्धान्त समजावून सांगितला. चमत्काराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. श्रद्धा जपत असताना अंधश्रद्धांना मूठमाती दिली. लेखकाने विश्वनाथबुवांचे कालोचित असे पुरोगामी व्यक्तिचित्र उभे केले आहे.

डॉ. पाठक यांनी 'ऋणानुबंधाची भेट' ह्या लेखात ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांचे अतिशय लोभसवाणे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी लेखकाने कोल्हटकरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्या भेटीत कोल्हटकरांनी लेखकाचा हात आपल्या हातात घेतला. त्या स्पर्शाने लेखक रोमांचित झाले. त्या भेटीविषयी लेखकाने लिहिले आहे : 'त्या पंधरा-वीस सेकंदात मला त्यांच्या सिद्धहस्त लेखणीची, त्यांच्या प्रतिभेची आणि सरस्वतीच्या अव्यक्त स्पर्शाची अनुभूती मिळाली होती'. (वानोळा पृ. ४३)

पुढे लेखकाने कोल्हटकरांच्या अविस्मरणीय व्याख्यानाची आठवण शब्दबद्ध केली आहे. डॉ. महेश केळुसकर यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे या लेखनात लेखकाच्या विचारांची स्पष्टता, भाषेचे सौंदर्य आणि भावनांची गहराई जाणवते. 

'सुधास पत्र.... आणि सुधाचे पत्र' ह्या लेखात साने गुरुजींची पुतणी सुधाताई साने-बोडा यांचे अतिशय विलोभनीय व्यक्तिचित्र शब्दांकित केले आहे. शालेय वयापासून,       'सुधास पत्रे' हे साने गुरुजींचे पुस्तक वाचल्यापासून लेखकाला सुधाताईंना भेटण्याची इच्छा होती. ती इच्छा अमळनेरच्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने पूर्ण झाली. या संदर्भात लेखकाने लिहिले आहे : 'एखाद्या गोष्टीचा मनापासून ध्यास असेल किंवा लहानपणातील एखादी उत्सुकता मनाच्या तळाशी रुजलेली असेल, तर आज ना उद्या ती गोष्ट साध्य होते'. अशा शब्दांत लेखकाने आकर्षणाचा सिद्धान्तच अधोरेखित केला आहे.

त्या भेटीत सुधाताईंनी लेखकाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. त्याबद्दल लेखकाने 'शब्दांना भावना असतात, तर स्पर्शाला संवेदना असतात' अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

'धवल वस्त्रांकित सात्त्विकता आणि नम्रतेचं शिल्प मधाळ वाणीने किती सहज बोलून गेलं' ह्या एकाच वाक्यात सुधाताईंचे व्यक्तिमत्त्व साक्षात केले आहे.

'दादा' हे भागवत गुरुजींचे, म्हणजे लेखकाच्या वडलांचे शब्दचित्र आहे. ते सामान्य, पण निष्ठावंत शिक्षक आणि असामान्य माणूस होते. एका अमेरिकन शास्त्रज्ञाने एका झाडाला विविध प्रकारची चाळीस फळे लागू शकतात, हे सिद्ध केले होते. त्यासाठी त्यांनी 'ट्री ऑफ फॉर्टी' ही संकल्पना वापरली होती. तो संदर्भ घेऊन लेखकाने लिहिले आहे : 'या ट्री ऑफ फॉर्टी प्रमाणे जिद्द, चिकाटी, सहनशीलता, सचोटी, स्वाभिमान, संघर्ष, कृतिशीलता, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, अफाट कष्ट अशा विविध गुणवैशिष्ट्यांचं झाड म्हणजे दादा'. (वा. पृ. ७९)

देवपूजा म्हणजे आत्मपूजा असे मानणारे दादा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांना सांधणारा सेतू होते, याचे काही दाखले लेखकाने ह्या लेखात दिले आहेत. माणसाचे यंत्र बनत चाललेल्या ह्या गतिमान कालखंडात लेखकाने अतिशय आस्थेने मानवतावादी विचारांचा 'वानोळा' वाचकांच्या हाती दिला आहे. वेगवेगळ्या लेखांमध्ये लेखकाने आपल्या संस्कारांची श्रीमंती अभिमानाने सांगितली आहे. 

'आठवणी दाटतात' ह्या लेखात लेखकाने गेल्या अर्धशतकात, ग्रामीण भागात झालेले सामाजिक बदल फारच बारकाईने टिपले आहेत. 'शहरीकरण आणि जागतिकीकरणाच्या बदलाचा पांडू शिकार झाला होता' ह्या शब्दांत लेखकाने खंत व्यक्त केली आहे.

'मंदिराचं देवस्थान झालं होतं, पण ते देवाचं स्थान आहे असं जाणवत नव्हतं. ऐश्वर्य आणि वैभव ओसंडून वाहत होतं, पण पंचमुखी परमेश्वर त्या ऐश्वर्यात शोधावा लागत होता. विश्वाचं रक्षण करणारा देव सुरक्षिततेच्या भीतीनं विश्वस्तांनी बंदिस्त केला होता' (वा. पृ. १६) अशा शब्दांत लेखकाने आपल्या परखड भावना व्यक्त केल्या आहेत.

'या परिवर्तनाच्या चक्रात आपण आपलेपण, आपल्यातला संवाद, नातेसंबंध, कुटुंब तर हरवणार नाही ना? मित्र, नातेवाईक, नातीगोती तर दुरावणार नाहीत ना? 'माणूस'पण जपलं जाईल ना? अशी चिंता व्यक्त केली आहे. परिवर्तनाच्या ह्या झंझावातात आम्ही काय काय गमावले, याचा लेखाजोखा मांडला आहे. 

पूर्वी आजच्यासारखी मोबाईल आणि समाजमाध्यमं नसल्यामुळे पत्ररूप संवाद हेच संपर्काचे एकमेव साधन होते. मोबाईलमुळे आता हा पत्ररूप संवाद जवळजवळ संपुष्टात आला आहे. 'पत्रसंस्कार' ह्या लेखात लेखकाने पत्ररूप संवादाचा फारच छान आढावा घेतला आहे. ते म्हणतात, 'भावनांनी भरलेल्या आणि भारलेल्या पत्ररूप संवादात अधीरता होती, उत्सुकता होती. ते अमोल असं संस्कारधन होतं. पत्रसंस्कृती हाच मैत्री जपण्याचा, नाती दृढ करण्याचा, स्नेहबंध गुंफण्याचा पाया होता. बोलकी पत्रं म्हणजे चालतीबोलती माणसंच होती. पत्रलेखन व पत्रवाचन हा एक संस्कार होता' अशा शब्दांत लेखकाने गतस्मृतींना उजाळा दिला आहे. ह्या पुस्तकात लेखकाने आपल्या सुह्रदांची दोन अतिशय सुंदर पत्रं छापली आहेत. ती वाचताना वाचकही गतकातर होत जातो. 'पत्र' ही कविताही वाचनीय आहे. हे लेख म्हणजे मानवी वृत्यंतराचा आणि स्थित्यंतराचा लख्ख लख्ख असा आरसा आहे. 

डॉ. नरेंद्र पाठक यांना २०१५ सालचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या त्या देखण्या सोहळ्याचा आनंदानुभव 'देखणी ती पाऊले' ह्या लेखात वर्णन केला आहे. तो पुरस्कार स्वीकारताना लेखकाला आचार्य परंपरेचे थोरपण जाणवले. आपण केलेल्या कार्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. शिक्षकी पेशाविषयी त्यांनी मांडलेले प्रेरणादायी विचार मुळातून वाचण्यासारखे आहेत. 

'वाडा' ह्या लेखात, ग्रामीण भागातील लोप पावत चाललेल्या समृद्ध वाडा परंपरेची मौलिकता अधोरेखित केली आहे. या संदर्भात लेखकाने लिहिले आहे :

'आमच्या घरासमोरील प्रशस्त ओटा म्हणजे जणू काही संपूर्ण वाड्याचं एक सांस्कृतिक केंद्रच होतं. मंगळागौरी, हरतालिकांची जागरणं, पारंपरिक खेळ, झिम्मा, फुगड्या, गाण्यांच्या भेंड्या, ऐसपैस गप्पांमुळे ओटा संस्कारधन देणारं संस्कारपीठ मानलं जात असे'. ( वा. पृ. ६०)

हे संस्कारपीठ काळाच्या उदरात गडप झाल्याबद्दल हळहळ व्यक्त करण्याशिवाय आपल्या हातात काय शिल्लक आहे? 

'कामगारांच्या घामातून क्रांती जन्माला आली. शेतकऱ्यांच्या घामातून कृषी क्षेत्रात हरितक्रांती आली'. ही अवतरणे आहेत 'घाममाहात्म्य' ह्या लेखातली. कष्टकऱ्यांच्या श्रमाघामातून जगभर क्रांती झाली, हे खरे असले, तरी हल्ली आपल्या शिक्षणातून एक पांढरपेशा वर्ग तयार झाला आहे. या वर्गाला शारीरिक श्रम करणे आणि घाम गाळणे कमीपणाचे वाटते. त्यांना घामाचं महत्त्व, श्रमसंस्कारांचं महत्त्व सांगण्यात आपण शिक्षक कमी पडलो, अशा शब्दांत लेखकाने प्रांजळ कबुली दिली आहे. हा संस्कार मुलांच्या मनावर लहानपणापासून बिंबविण्याची गरज लेखकाने प्रतिपादन केली आहे. ते पुढे लिहितात : 'घामाचा महिमा अगाध आहे. आपणही घामनिर्मितीचा वसा घ्यावा आणि घाममाहात्म्याचं हे व्रत मोठ्या श्रद्देनं पाळावं, पुजावं. या व्रताचे श्रद्धेने पालन केल्यास उत्तम आरोग्य, मूल्यसंस्कार आणि उत्तम प्रतिष्ठा आपणास लाभेल, यात शंकाच नाही'. (वा. पृ. ६६)

तसे पाहिले, तर हा ललितलेख म्हणजे एक गंभीर वैचारिक काव्यच आहे. 

पूर्वी खेड्यापाड्यांत 'वानोळा' म्हणून स्नेहांकितांना आपल्या शेतातील पहिली भाजी, फळं, कांदे, मुळा, हरभरे, गहू, ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या शेंगा, घरच्या गायीचं दूध असे जिन्नस भेट देण्याची पद्धत होती. आजही काही ठिकाणी ती अस्तित्वात आहे. त्या वानोळ्यातून मैत्री, नाती, श्रद्धा, आपुलकी, मोठेपण असं सारं काही प्रतिबिंबित होत असे. वानोळा कितीही छोटा असला, तरी ती माणूसपण भक्कम करणारी, आपलेपण टिकवणारी मोठी कृती होती. वानोळा देण्याघेण्यात विश्वास, प्रेम, निरपेक्षता, कृतज्ञता, कृतार्थता आणि दातृत्व ह्या भावना होत्या. शेजारधर्माचा आणि आदर्श मूल्यांचा तो वानोळा होता. ह्या लेखाच्या माध्यमातून लेखकाने छान छान 'विचारांचा वानोळा' वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. हे विचारप्रवर्तक ललितलेख म्हणजे लेखकाने आपल्या मुळांचा घेतलेला शोध आहे. प्रत्येक लेखात लेखकाने काही एक चिंतन मांडले आहे. 

'सिनेमा' ह्या लेखात लेखकाने ग्रामीण भागातील साध्यासुध्या चित्रपटगृहांनी आपली कलेची अभिरुची कशी जपली जोपासली, हे सांगितले आहे. 'जे भरतात रिकाम्या जागा' ह्या लेखात 'स्वातंत्र्याच्या पाठीवर विश्वासाचा हात फिरायला हवा' अशा शब्दांत तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. 'भेटीत तुष्टता मोठी' ह्या लेखात एक हळुवार प्रेमकथा सांगितली आहे. 'साखरझोप' ह्या विनोदी शैलीतील हलक्याफुलक्या लेखात झोपेचे माहात्म्य वर्णिले आहे. साखरझोप ही स्वप्नरंजनासाठीच असते, असा मजेशीर दावा केला आहे. मूळ कवितांचे विडंबन करून झोपेचे उदात्तीकरण केले आहे. मंदतरंग, मध्यम झोप, कुंभकर्णी झोप असे झोपेचे वर्गीकरण केले आहे. बिनधास्त झोपणाऱ्यांना 'निद्राश्रेष्ठ' आणि 'निद्रावीर' अशा उपाधी दिल्या आहेत. लेखकाने दिलखुलासपणे रंगविलेले हे निद्रापुराण मोठेच रंजक आहे.

डॉ. नरेंद्र पाठक यांनी ह्या लेखांतून गावाकडच्या टपरीवरचा पांडू, ह. भ. प. विश्वनाथबुवा, बुवांचा उनाड मुलगा नरेंद्र, नाटककार बाळ कोल्हटकर, अमळनेरचा निरक्षर शेतकरी भिला महाजन यांची ठसठशीत व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. गावाकडचे महादेव मंदिर, बालपणची प्राथमिक शाळा, हरवलेले गावपण, हरिनाम सप्ताह, कोल्हटकरांच्या भेटीचा अविस्मरणीय प्रसंग, नवी दिल्लीच्या विज्ञान भवनातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा, अमळनेरची वाडा संस्कृती यांची लेखकाने केलेली वर्णने अतिशय चित्रदर्शी आहेत. ही वर्णने वाचत असताना आपण एखादा चित्रपट पाहतोय, असेच वाटत राहते. स्मरणरंजनाच्या माध्यमातून लेखकाने ५० वर्षांपूर्वीचा रम्य काळ जिवंत केला आहे. खान्देशच्या खेड्यापाड्यांतील लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले आहे. 

ललितगद्याच्या जडणघडणीत निवेदक 'मी' फारच महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीने पाहिल्यास यातील प्रत्येक लेखातून निवेदक 'मी' च्या मिश्कील, कृतज्ञ, अभिरुचीसंपन्न, संस्कृतिनिष्ठ, सुसंस्कृत, संवेदनशील, चिंतनशील आणि समाजशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. उत्तमोत्तम कवितांच्या ओळी, सुभाषिते, सुवचने आणि संतवचने उद्धृत केल्यामुळे ह्या लेखनाला संदर्भसमृद्धता लाभली आहे. लेखांची शीर्षके अतिशय उत्कंठावर्धक आहेत. ललितरम्य आणि काव्यमय भाषाशैली हा ह्या लेखनाचे बलस्थान आहे. ह्या भाषेत रूपलाघव आहे आणि अर्थलाघवही आहे. संतोष घोंगडे यांच्या सूचक मुखपृष्ठासह सृजनसंवाद प्रकाशनाने केलेली पुस्तकाची निर्मिती अतिशय छान आहे. अंतर्बाह्य सुंदर 'वानोळ्या'साठी लेखक आणि प्रकाशक, दोघेही अभिनंदनास पात्र आहेत. 

'वानोळा' (ललितलेखसंग्रह)

लेखक : डॉ. नरेंद्र पाठक

प्रकाशक : सृजनसंवाद, चरई, ठाणे.

मुखपृष्ठ : संतोष घोंगडे

पृष्ठे ९६         किंमत रु. २५०

पुस्तक परिचय :

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या