'यशोगाथा संघर्षाची' ही धुळे जिल्ह्यातील धांद्रे ह्या आदिवासीबहुल गावात बहुजन समाजात जन्मलेल्या आणि आपल्या कष्टाने आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कृषिउद्योग कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बनलेल्या डॉ. टी. टी. पाटील ह्या कर्तबगार माणसाची प्रेरणादायी आत्मकथा आहे. नायकाच्या अनेक पिढ्यांनी शेती हा व्यवसाय म्हणून नव्हे, तर आपला धर्म म्हणून वाढवला. अशा राबत्या शेतकरी कुटुंबाची ही जीवनकथा आहे. शेती करत करत शिक्षण आणि शिक्षण घेत घेत शेती असा ह्या नायकाचा समांतर जीवनप्रवास झालेला आहे. किंबहुना नायकाला शेतीच्या शाळेनेच घडविले आहे. शेती हाच ह्या नायकाचा ध्यासही आहे आणि श्वासही! त्या अर्थाने हे आत्मकथन म्हणजे कृषिसंस्कृतीची पवित्र पोथी आहे.
आठवीत शिकत असताना नायकाचा सिंधू ह्या मुलीसोबत बालविवाह झाला असला, तरी ख-या अर्थाने त्यांचा संसार लग्नानंतर १४ वर्षांनी सुरू झाला. दरम्यान घरापासून दूर हॉस्टेलला राहून नायकाचे शिक्षण चालू होते. नायकाने आपल्या आयुष्यात विद्यार्थी, शेतकरी, शेतमाल विक्रेता, कॅंटीनवाला, खतकंपनीचा विक्री प्रतिनिधी, रिसर्च फेलो, कृषिसंशोधक, कृषिविद्यावेत्ता, बियाणे महामंडळात उत्पादनप्रमुख व व्यवस्थापकीय संचालक आणि शेवटी स्वतः स्थापन केलेल्या कंपनीचा मालक अशा नानाविध भूमिका निष्ठेने निभावल्या. यातली सुरुवातीची बरीचशी वाटचाल ही संघर्षपूर्ण आणि अनवाणी होती. नायकाने अनेकदा मानाचे आणि अपमानाचेही प्रसंग हलाहलासारखे पचवले, पण कुठेही कटुता येऊ दिली नाही.
कौटुंबिक ओढगस्तीमुळे नायकाला कमी वयातच जबाबदारीची जाणीव झाली. कितीही संकटे आली, तरी त्यांनी कधी निराशा आणि हताशा येऊ दिली नाही. पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशासाठी गुणवत्ता असूनही मोठा संघर्ष करावा लागला. आंदोलन करून तुरुंगवास भोगावा लागला, पण अखेर जिद्दीने प्रवेश मिळवलाच. एम. एस्सी. (कृषिविद्या) ही पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नायकाला असा कडवा संघर्ष करावा लागला. नायकाला कोणतेच यश सहजासहजी मिळाले नाही. प्रत्येक वेळी निकराची झुंज द्यावी लागली. सुरुवातीला मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत विविध पदांवर काम केले. महाबीज, नागार्जुन फर्टिलायझर्स, कल्याणी ॲग्रो कॉर्पोरेशन, ई. पी. सी. लि. इत्यादी कंपन्यांमध्ये नोक-या केल्या. कंपनीकडून शोषण होत आहे, हे लक्षात येताच नोकरीचा त्याग केला.
या काळात दोन तरुण मुली आणि दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. डॉ. टी. टी. पाटील यांनी वयाच्या पन्नाशीत लठ्ठ पगाराची सुरक्षित नोकरी सोडून हिंमतीने स्वतःची पायोनियर ॲग्रो टेक्नोस्कैन ॲंड एक्स्पोर्ट प्रा. लि. ही कंपनी स्थापन केली. नायकाने आपल्या आयुष्यात कधी साचलेपण येऊ दिले नाही, कारण झापडबंद आणि चाकोरीबद्ध जगणे त्यांना आवडत नव्हते. नोकरीत धरसोड करण्याच्या या वृत्तीमुळे निकटवर्तीय त्यांना उपहासाने हसत. दोष देत. पण नायकाने ह्या कोल्हेकुईकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले. कारण त्यांचा स्वतःच्या हिंमतीवर, गुणवत्तेवर आणि कर्तबगारीवर ठाम विश्वास होता.
डॉ. टी. टी. पाटील यांनी आपल्या 'महाफीड' ह्या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि भारतात विद्राव्य खतांचे तंत्रज्ञान रुजविले. त्याचा प्रचार आणि प्रसार केला. त्यासाठी पायांना चाके लावून देशभर फिरले. आपल्या देशातील स्थितिप्रिय शेतकरीवर्गात विद्राव्य खतांचे नवीन कृषितंत्रज्ञान रुजविणे ही साधी सोपी गोष्ट नव्हती. ते एक अवघड आव्हान होते. नायकाने ते आव्हान स्वीकारले आणि पेललेही. या मार्गातील अनेक अडथळ्यांची शर्यत जिद्दीने पार केली आणि अखेरीस गरुडझेप घेतलीच. डॉ. टी. टी. पाटील हे स्थानिक हवामान आणि पिकांचा अभ्यास करून भारतीय शेतकऱ्यांना विद्राव्य खतांचे कोष्टक तयार करून देणारे पहिले भारतीय ठरले.
डॉ. टी. टी. पाटील यांनी शिक्षणप्रेमाची पताका खांद्यावर घेऊन यशाचा मार्ग अवलंबला. कृषितंत्रज्ञानावर आधारित उद्योग व्यवसायांची उभारणी केली. पहिल्या वर्षी ह्या कंपनीची वार्षिक उलाढाल साडेतीन लाख रुपयांची होती आणि निव्वळ नफा होता केवळ दहा हजार रुपये. नायकाने विद्राव्य खतांच्या प्रचार-प्रसारासाठी देशातील १२ राज्यांत भ्रमंती केली. जगभर व्यापाराचे जाळे निर्माण केले. गावोगावी तांत्रिक प्रशिक्षण, परिसंवाद आयोजित करून नवीन कृषितंत्रज्ञान शेतकऱ्यांना पटवून दिले. आधी तांत्रिक प्रशिक्षण आणि नंतर व्यवसाय असे धोरण ठेवले. हजारो तरुणांना रोजगार दिला.
सध्या त्यांच्या महाफीड कंपनीकडे २०० कर्मचारी आणि ३००० विक्रेते आहेत. ह्या कंपनीला ४ राष्ट्रीय आणि २ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. शून्यातून विश्व निर्माण करण्याचाच हा प्रकार होय. पुढच्या २५ वर्षांचा कंपनीच्या विस्ताराचा आराखडा तयार आहे. व्यवसायवृद्धीसाठी इतरांनाही सहकार्य व मार्गदर्शन केले. हे करत असताना त्यांना अनेक कटुगोड अनुभव आले. नायकाने संघर्ष आणि यश यांची सारखीच चव चाखली आहे. ह्या आत्मकथनातून नायकाचे संतुलित आणि समृद्ध व्यक्तिमत्त्व साकार झाले आहे. म्हणूनच वनाधिपती मा. विनायकराव पाटील यांनी त्यांना 'महाराष्ट्राचा कार्व्हर' असे संबोधले आहे.
ह्या आत्मकथनात मागील ७०-७५ वर्षांपूर्वीचे खान्देशातील खेडे, ग्रामजीवन, समाजजीवन, लग्नविधी, चालीरीती, लोकरुढी, लोकसंकेत, प्रथापरंपरा यावर छान प्रकाश टाकला आहे. नात्यागोत्यांची ह्रद्य गुंफण केली आहे. नायकाने अतिशय डोळसपणे समाजातील सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्तीही टिपल्या आहेत. ह्या लेखनातून जनजीवनाचे चित्र साक्षात होते. हे आत्मकथन म्हणजे खान्देशी संस्कृतीचा आडवा छेद होय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकत्र कुटुंब पद्धतीचे काही फायदे आणि तोटेही इथे दिसतात. नायकाने आप्त, गुरुजन, सहचारिणी सिंधू आणि मित्रांविषयी वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यामुळे ही एका व्यक्तीचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची जीवनकथा बनली आहे. ह्या आत्मकथनात जीवनशिक्षण आहे आणि समाजशिक्षणही आहे.
धांद्रे ह्या खेडेगावातून एकलव्याच्या निष्ठेने निघालेल्या आणि ५० देशांचा प्रवास, अभ्यास करून आलेल्या जिद्दी नायकाचा जीवनप्रवास मोठाच रोमांचकारी आहे. संघर्ष हेच ह्या नायकाचे खरे सामर्थ्य आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रम, आत्मविश्वास, निरंतर शिक्षणाचा ध्यास, ज्ञानलालसा, प्रबळ इच्छाशक्ती, कर्तव्यदक्षता, पुरोगामी आचारविचार, तीव्र समाजभान, प्रतिकूल परिस्थितीला धीरोदात्तपणे सामोरे जाण्याची तयारी, काटकसरीची वृत्ती, सदैव सकारात्मकता, समंजसपणा आणि सुसंस्कृतपणा इ. गुणसमुच्चयामुळे नायकाची प्रतिमा वाचकाच्या मनात दृढ होते. कारण नायकाने कृतज्ञता आणि कृतार्थता ही मूल्ये सांभाळली आहेत. कठोर परिश्रमाला पर्याय नाही, हाच ह्या आत्मकथनाचा संदेश आहे.
ह्या पुस्तकाच्या यशात शब्दांकनकर्त्या, प्रतिभावंत लेखिका डॉ. पद्मश्री पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. नायकाने आपल्या पूर्वायुष्यातील आठवणींचे खोदकाम केले आहे आणि लेखिकेने परकायाप्रवेश करून ह्या रचनेचे उत्कृष्ट बांधकाम केले आहे. 'हिरवळ', 'चढण', 'उष:काल' आणि 'स्वप्नपूर्ती' अशा ४ भागांमध्ये आत्मकथनाची नेटकी मांडणी केली आहे. लेखिकेची भाषाशैली अतिशय ओघवती, काव्यात्म आणि चित्रदर्शी आहे. त्यामुळे हे लेखन अतिशय उत्कंठावर्धक झाले आहे. ह्या पुस्तकात अहिराणी बोलीतील कंडोलनी, फुणके, हयद, पोयते, तगारी असे काही शब्द खान्देशी मातीचा गंध घेऊन आले आहेत. संतवचनांचे दाखले, विचारवंतांच्या विचारांची अवतरणे आणि कवितांच्या ओळी यामुळे ह्या आत्मकथनाची वैचारिक उंची वाढली आहे. यातून लेखिकेचा विद्याव्यासंग जाणवतो.
'यशोगाथा संघर्षाची' हे आत्मकथन म्हणजे शेतीमातीचे प्रांजळ अनुभवकथन आहे. शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, शेती, संशोधन यांचा हा कॅलिडोस्कोप आहे. नायकाने अथक परिश्रमाच्या बळावर अपेक्षित यशोशिखर गाठले. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने सिंधू ह्युमॅनिटी फाऊंडेशनची स्थापना केली. डॉ. टी. टी. पाटील यांनी अनुभवाअंती उद्योग व्यवसायासंबंधी ज्या टिप्स दिल्या आहेत, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. शॉर्टकटचा अवलंब करून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांनी हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की लखलखीत यश मिळविण्यासाठी किती खस्ता खाव्या लागतात!
'यशोगाथा संघर्षाची' (आत्मकथन)
निवेदन : डॉ. टी. टी. पाटील
शब्दांकन : डॉ. पद्मश्री पाटील
प्रकाशक : सिंधूबाई त्र्यंबकराव पाटील, पुणे
मुखपृष्ठ : प्रशांत गोखले, पुणे
पृष्ठे ३२३ किंमत रु. ४५०
addComments
टिप्पणी पोस्ट करा