*जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन: काळाची गरज - केशव वाबळे

नांदेड:( दि.३ सप्टेंबर २०२४)

          .श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने "जैव विविधता आणि वन्यजीव व्यवस्थापन" या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान व भित्तीपत्रक - पोस्टर सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

          कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे अध्यक्ष म्हणून,तर प्रमुख अतिथी नांदेड वनविभाग कार्यालयाचे उपवनसंरक्षक मा. केशव वाबळे (आय.एफ.एस.), प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.संजय नंनवरे, प्रा.डॉ.संदीप शिंदे,सर्व प्राध्यापक वृंद,विद्यार्थी, विद्यार्थिनी,संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने कऱण्यात आली.प्राणीशास्त्र विभागप्रमूख डॉ.संजय नंनवरे यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला आणि जैवविविधतेच्या महत्त्वावर विद्यार्थ्यांना प्रेरित केले.त्यांनी सांगितले की,'जैवविविधता ही पृथ्वीवरील जीवनाची एक अनमोल संपत्ती आहे ज्याचे संवर्धन करण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांमध्ये जैवविविधतेविषयी जागरूकता वाढवणे आणि त्यांना संशोधनासाठी प्रेरित करणे आहे',असे त्यांनी नमूद केले.

          महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, 'जैवविविधतेच्या संरक्षणासाठी तरुण पिढीने पुढाकार घेण्याचे आवाहन करून जैवविविधतेचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य असून यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे' असे सांगितले.त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात नवनवीन संशोधनाच्या संधी शोधून त्यात सहभागी होण्याची प्रेरणा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

          प्रमुख अतिथी मा. केशव वाबळे यांनी, 'जैवविविधता आणि व्यवस्थापन' या विषयावर अतिशय सखोल,माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक व्याख्यान दिले.त्यांनी सादर केलेल्या पावर पॉइंट सादरीकरणात जागतिक, राष्ट्रीय,राज्य,आणि स्थानिक स्तरावरील जैवविविधतेच्या स्थितीचा आढावा घेऊन,महत्त्व उलगडून दाखवले.जैवविविधतेचे संवर्धन हे केवळ पर्यावरणीय स्थिरतेसाठीच नाही तर मानवाच्या आर्थिक, सामाजिक जीवनासाठीही आवश्यक आहे.जैवविविधता संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनाबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच जैवविविधतेच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती देवून विविध योजना,कायदे,आणि धोरणाबद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले.

          विविध संदर्भानी युक्त असलेल्या आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले की,'आपल्या पृथ्वीवर विविध प्रकारच्या वन्यजीवांचा समृद्ध साठा आहे. या वन्यजीव संपदेमुळे आपल्याला पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होते. वन्यजीव संपदा केवळ आपल्या पर्यावरणाचे सौंदर्य वाढवते असे नाही, तर ती जैवविविधतेला समृद्ध बनवते आणि आपल्या जीवनात अन्न, औषधे, आणि निसर्गाचे इतर महत्त्वपूर्ण घटक पुरवते.पण दुर्दैवाने, वाढता मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदलामुळे या वन्यजीवांची संख्या कमी होत आहे. यासाठी, वन्यजीवांचे संरक्षण करणे खूप गरजेचे आहे. भारताने या गोष्टीची दखल घेऊन अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या उपाययोजना म्हणजे राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, आणि अभयारण्यांची स्थापना.राष्ट्रीय उद्याने ही संरक्षित क्षेत्रे आहेत, जिथे वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात सुरक्षितपणे राहता येते. व्याघ्र प्रकल्प विशेषतः वाघांच्या संरक्षणासाठी स्थापन केले गेले आहेत. हे प्रकल्प वाघांच्या अधिवासाचे संरक्षण करून त्यांच्या संख्येत वाढ करण्यात यशस्वी ठरले आहेत. अभयारण्ये ही अशी स्थळे आहेत जिथे विविध प्रकारच्या वन्यजीवांना संरक्षण दिले जाते आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास टिकवले जातात.वन्यजीव संपदा आणि त्यांच्या संरक्षणासाठी आपले योगदान महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी मिळून हे सुनिश्चित केले पाहिजे की आपली वन्यजीव संपदा सदैव सुरक्षित आणि समृद्ध राहील.'

          व्याख्यानाच्या दुसऱ्या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्राणीशास्त्रातील विविध करिअर संधीबद्दल माहिती दिली. त्यांनी जैवविविधता आणि संवर्धन हे केवळ पर्यावरणशास्त्रातच नाही तर जैवविज्ञान,औषधनिर्मिती, अन्नसाखळी व्यवस्थापन,जागतिक आरोग्य या क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देते या संदर्भाने विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले.

          कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्रात मोठ्या संख्येने उस्फुर्त सहभाग नोंदवला. जिज्ञासेच्या रुपात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या शंकांचे निराकरण केले.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सौ. मंगल कदम यांनी केले तर प्रा.डॉ. धनराज भुरे यांनी निमंत्रित पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि प्रा.डॉ. नीताराणी जयस्वाल यांनी आभार मानले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आणि कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी केला.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राणिशास्त्र विभागातील प्रा.डॉ. एच.एल. तमलुरकर, प्रा.डॉ.दीप्ती तोटावार, प्रा.साहेबराव माने, प्रा.नारायण गव्हाणे,किरण तांदळे,शंकर मिरेवाड, परमेश्वर राठोड,एजाज शेख आदींनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या