जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सीईओ मीनल करनवाल यांच्या पुढाकरातील घरेलू गोबरगॅस दुग्धविकास क्लस्टर योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे-खा.डॉ.अजित गोपछडे

 

नांदेड (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सीईओ मीनल करनवाल यांच्या पुढाकरातून अंमलात आलेली घरेलू गोबरगॅस दुग्धविकास क्लस्टर योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी होऊन या शासकीय योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन खा.डॉ.अजित गोपछडे यांनी शेतकरी बैठकीत केले.
खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या निवासस्थानी सोमवारी आयोजित शेतकरी बैठकीत ते बोलत होते.नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पशूपालक शेतकर्‍यांनी आपल्याकडे असलेल्या पशूधनापासून मिळणारे दूध आणि गोमय-शेण यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकर्‍यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनेल, असा आशावाद व्यक्त करून खा.डॉ.गोपछडे यांनीदुग्धव्यवसायात नांदेडच्या शेतकरी बांधवांनी संघटितपणे सहकारातून श्वेतक्रांती घडवावी, प्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
नांदेडला अव्वल बनू-जिल्हाधिकारी
गुजरात येथील आनंद येथून आलेले प्रमुख अतिथी राष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड मृदाचे निदेशक संदीप भारती यांनी शेतकरी बैठकीत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात या दोन्ही ठिकाणी दृकश्राव्य माध्यमाद्वारे सादरीकरण केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यात दुग्धव्यवसाय आणि गोबरगॅस क्लस्टर योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबवू, शेतकर्‍यांना विशेष प्रशिक्षण देऊ आणि दुग्धव्यवसायात नांदेडला अव्वल बनवू असा निर्धार व्यक्त केला. प्रमुख मार्गदर्शक संदीप भारती यांनी गोबरगॅस क्लस्टर शेतकरी पशुपालकांना कसे फायदेशीर आहे, याबाबत महत्वपूर्ण मांडणी करुन समजावून सांगितले.
सामान्यतः ग्रामिण भागात पशुपालक कुटुंब आपल्या घरात अन्न शिजवण्यासाठी स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस, लाकूड-गोवर्‍यांचा वापर करतात. लाकूड गोळा करणे, गोवर्‍या बनवणे यासाठी वेळ आणि मेहनत लागते तर एलपीजी सिलेंडरसाठी पैसे खर्च होतात. सध्याच्या दरवाढीनुसार सामान्य पशुपालक कुटुंबाला स्वयंपाक इंधनासाठी वार्षिक 15 ते 16 हजार रु. खर्च करावे लागतात. शेणाच्या गोवर्‍या इंधन म्हणून वापरल्यास शेणखतासाठी वापरल्या जाणार्‍या शेणाची किंमत ही गमावली जाते. लाकुड विकत घेतले तर पैसे मोजावे लागतात. याशिवाय चुलीचा मोठा तोटा म्हणजे  यामधून निघणारा धूर महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून शेतकर्‍यांना जास्त पाऊस - कमी पाऊस, अतिउष्णता, वादळ, दुष्काळ यामुळे सतत नुकसान सोसावे लागत आहे, ग्लोबल वार्मिंगमुळे पीक वाढीवर दुष्परिणाम होत आहे, गुरांचे दूध उत्पादन कमी होत आहे. या सर्व समस्यावर सोपा व स्वस्त उपाय म्हणजे पशुपालक शेतकर्‍यांनी गोबरगॅस सयंत्र बसवणे हाच आहे. असे स्पष्ट केले.

टिप्पण्या