नांदेड:( दि.२ ऑगस्ट २०२४)
देशाचे कायदेमंडळ वेगवेगळे कायदे तयार करून, धोरण तयार करून नियोजनाच्या माध्यमातून देशाच्या विकासाला चालना देत असते; परंतु या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य लोकप्रशासनाकडून केले जाते. चांगला प्रशासक बनण्यासाठी प्रथम आपल्याला उत्कृष्ट नागरिक घडणं गरजेचं आहे आणि हे काम लोकप्रशासनाच्या माध्यमातून केलं जाते, असे प्रतिपादन नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा.अनंत कौसडीकर यांनी केले आहे.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकप्रशासन विभागाद्वारे आयोजित सत्र आरंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
प्रारंभी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे आणि उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रास्ताविकात लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. मिरा फड यांनी वर्षभरामध्ये लोकप्रशासनाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात, त्यासाठी वेगवेगळ्या समित्या निर्माण करण्यात आल्या असून या समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासाचे अनेक कार्यक्रम घेतले जातात. गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली जाते. संगीत,कला, क्रीडा, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना इत्यादी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचं काम महाविद्यालयामध्ये केलं जाते. लोकप्रशासन विषयाच्या अभ्यासक्रमांमधून देखील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट नागरिक घडवण्याचे पाठ दिले जातात. त्यामध्ये मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, चांगला प्रशासक होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची माहिती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये दिली जाते. या महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी हाच उद्याचा प्रमुख प्रशासक असू शकतो, उद्याचा राजकारणी असू शकतो, त्याचबरोबर एखादा यशस्वी उद्योजक देखील असू शकतो. असे प्रतिपादन त्यांनी केले.
पुढे बोलताना डॉ.अनंत कौसडीकर म्हणाले की, लोकप्रशासन विषयात अनेक महत्त्वाच्या संधी आहेत. त्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उच्च प्रकारचे ध्येय ठेवले पाहिजे, कारण आपणच आपल्या जीवनाचे प्रशासक असतो. लोकप्रशासनात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियोजन केले जाते. आपण विद्यार्थी जीवनापासूनच योग्य प्रकारचं नियोजन केलं तर आपण आपल्या वैयक्तिक जीवनात यशस्वी होतो. लोकप्रशासनाशिवाय आपण श्वास घेऊ शकत नाही. भारतात एकूण १३ एजन्सीच्या माध्यमातून ५६ प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. ध्येय उच्च प्रतीचे असले पाहिजे, त्यासाठी लागणारा तपशील गोळा केला पाहिजे आणि नियोजन करून त्याला मूर्त रूप दिले गेले पाहिजे. सामाजिक सत्तेचे वाटप करणे म्हणजे प्रशासन करणे होय. राजकीय सत्तेचे वाटप करण्यासाठी आरक्षण आहे, परंतु आर्थिक सत्तेचे वाटप भारतात दुर्दैवाने झालेले नाही.
कार्यक्रमाचे आभार कृष्णा वाघमारे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, प्रा.आर.पी. गावंडे, प्रा.प्रवीण शेलुकर, प्रा.भरत कांबळे,प्रा.बालाजी भोसले,प्रा.वीरभद्र स्वामी, प्रसिद्धी समन्वयक प्रा.अजय गव्हाणे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे इत्यादींनी महत्त्वाचे सहकार्य केले .
addComments
टिप्पणी पोस्ट करा