संवेदनशील होऊन शेती-मातीचे प्रश्न समजून घेणे ही विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी!'* : डॉ.ज्ञानदेव राऊत यांचे प्रतिपादन

नांदेड :(दि.३१ जुलै २०२४)

          'मराठी भाषा आणि साहित्याचे विद्यार्थी असणे; ही वरवर पाहता साधी आणि सोपी गोष्ट वाटत असली तरी आपल्या ग्रामसंस्कृतीचे सजग भान बाळगून बदलत्या भवतालाकडे संवेदनशीलतेने पाहून शेती-मातीचे प्रश्न समजून घेणे; ही विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी असल्याचे'  प्रतिपादन डॉ.ज्ञानदेव राऊत यांनी केले. 

          मराठी विभाग आणि श्रद्धेय डाॅ.शंकररावजी चव्हाण लेक्चर सिरीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'माय मराठी महोत्सवातील उद्बोधन व्याख्यानात' ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे होते. यावेळी मंचावर विभागप्रमुख डॉ.संजय जगताप, डॉ. विश्वाधार देशमुख आणि डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

          'शेती प्रश्न आणि मराठी साहित्य' यांचे अभ्यासक असलेल्या डॉ.ज्ञानदेव राऊत यांनी आपल्या व्याख्यानात मराठी साहित्यात आजपर्यंत चित्रित झालेल्या शेतकरी,शेतीप्रश्न तसेच गावगाडा यांचा आढावा घेत कृषी जनसंस्कृतीच्या वास्तव चित्रणाबाबत मराठी साहित्याने दुजाभाव केल्याचे परखड मत व्यक्त केले. आपल्या भवतालातील विविध प्रश्न हे मूलतः शेती-मातीचे प्रश्न असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा आपण ते संवेदनशीलतेने समजून घ्यायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

          'मराठी भाषा ही रोजगाराच्या संधी मिळवून देणारी आहे, हे खरे आहेच; प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी तसेच मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक या दोन्ही माध्यमांमध्ये नोकरीच्या संधींसाठी मराठी पूरक ठरणारी आहे. परंतु आपल्या भाषेचा केवळ नोकरी आणि व्यवसायापुरता सीमित विचार न करता, संवेदनशील होऊन समाजाच्या प्रश्नांकडे पाहणे आणि सर्जनशील होऊन साहित्यातून या प्रश्नांची उकल शोधणे यासाठीही मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांनी पुढे यायला हवे,' असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

          प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात, 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भाषा शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपाचा वेध घेऊन 

विद्यार्थ्यांनी भाषेतील मूलभूत कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची गरज' व्यक्त केली.

          'वाचन कट्ट्या'च्या पुढाकारातून नियोजित  'माय मराठी' महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये गणेश शिंदे,सिंधू कांबळे, गणेश विणकरे,गोदावरी कानशुक्ले,कृष्णा वाघमारे, आश्विनी हातागळे आणि आयुष सोनकांबळे या विद्यार्थ्यांनी आपल्या कवितांचे उत्तम सादरीकरण केले.

          प्रस्तुत कार्यक्रमात पूजा तोटेवाड, शिवानी क्षीरसागर,शेख फातिमा, साक्षी देशमुख तसेच कृष्णा वाघमारे या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून बनवलेल्या भित्तिपत्रकांचे अनावरण करण्यात आले. वाचन आणि रसास्वाद याच्याशी निगडित कार्यक्रमांच्या आयोजनासाठी 'वाचन कट्टा' माय मराठी मंडळाची कार्यकारिणी देखील याप्रसंगी घोषित करण्यात आली.

         प्रस्तुत 'माय मराठी' महोत्सवाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले.

           शुभेच्छापर मनोगतातून विभागप्रमुख डॉ.संजय जगताप यांनी कल्पक विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पाहुण्यांचा परिचय पूजा तोटावाड या विद्यार्थिनीने तर सूत्रसंचालन शेख तबस्सुम आणि आभार प्रदर्शन आशिष चव्हाण यांनी केले.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शुभम राठोड, सुमित ठाकरे, रोहित जैरमोड,सत्यजित जाधव, विनायक शिंदे,प्रणिता तेलंग या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल. व्ही. पदमारानी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आणि डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले. 

          प्रस्तुत कार्यक्रमासाठी डॉ.मदन अंभोरे, डॉ.संतोष राऊत,डॉ. बालाजी जाधव या प्राध्यापकांसह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

टिप्पण्या