"शेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे"

   आज लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशेष म्हणजे दलित, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या दुःखाला ते स्वतःचे दुःख मानत. त्यामुळे आपल्या खणखणीत शाहिरीद्वारे त्यांनी सर्व जनतेचे दुःख जनतेसमोर अगदी परखडपणे मांडलेले दिसते.  महाराष्ट्र मध्ये १९४९ ला  संयुक्त महाराष्ट्र चळवळ उदयास आली. या चळवळीमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर गव्हाणकर आणि शाहीर अमर शेख या तिघांचाही सहभाग होता. शेतकऱ्यांच्या  अन्याय अत्याचाराला या तिघांनी वाचा फोडली ती   'लाल बावटा' या कलापथकाद्वारे... खरंतर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व त्यांचे सहकारी श्रमिक कामगार म्हणून राबत होते, त्यांनीही दुःख भोगले होते. त्या दुःखाची जखम त्यांच्या अंतर्मनाला भिडली होती. त्यांचे अंतर्मन तळमळत होते. आणि तळमळलेल्या त्यांच्या अंतर्मनाने वैचारिक लढा उभा केला. शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर यांनी  स्थापन केलेल्या कलापथकाद्वारे ते विविध कार्यक्रम सादर करीत असत. ठाणे जिल्ह्यातील

 टिटवाळा येथे
 ऐतिहासिक स्वरूपाच्या शेतकरी मेळाव्यामध्ये त्यांनी एक कार्यक्रम सादर केला होता. शेतकरी हा जगाचा पोषणकर्ता  आहे. परंतु सरकार मात्र शेतकऱ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते. जो शेतकरी आपल्या घरादाराची, कुटुंबाची पर्वा न करता जगाचे पोट भरण्यासाठी  रात्रंदिवस कष्ट उपसतो अशा  शेतकऱ्याबद्दल त्याच्या समस्येबद्दल  लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांना जाण होती. म्हणूनच त्यांनी शेतकऱ्याला उद्देशून  एक सुंदर लावणी गायली आहे.

"तू मराठमोळा शेतकरी घोंगडी शिरी!
 जुनी ती काठी, जुनी लंगोटी!
 बदल ही दुनिया सारी रे!
चल बदल ही दुनिया सारी रे!"
   या  गीतामधून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शेतकऱ्यांना जग बदलविण्यासाठी प्रेरित करतात.  शेतकरी  पाऊस-पाणी, थंडी-वारा यांचा विचार न करता शेतामध्ये रात्रंदिवस राब राब राबतो आणि मोती पिकवितो. तो जेव्हा  मोती पिकवितो त्यावेळी हे जग जगते. शेतकरी एवढ्या मेहनतीने कष्टाने पिकं पिकवितात आणि येथील सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांनाच  उपाशी ठेवते. त्यांच्या पिकाला योग्य तो मोल येत नाही. अगदी किरकोळ भावामध्ये त्यांची पिकं विकली जातात. त्यामुळेच अण्णा भाऊंना हा अन्याय सहन होत नाही ते शेतकऱ्याला 'जग बदल' असे  आव्हान करतात.
 लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांनी ७० वर्षापूर्वी सांगितलेली शेतकऱ्यांची व्यथा व आजच्या शेतकऱ्यांची परिस्थिती यामध्ये काहीच फरक दिसून येत नाही. शेतकरी आजही त्याच्याकडे शंभर ते दीडशे एकर शेती जरी असली तरी तो आर्थिक विवंचनेमध्ये दिसून येतो. याचे एकमेव कारण म्हणजे शेतीची मशागत करण्यासाठी शेतीमध्ये धनधान्य पिकविण्यासाठी शेतकरी  सरकारकडून  कर्ज काढतो  आणि करतो व्याजाच्या स्वरूपात दुप्पट तिप्पट रकमेने सरकारला भरतो. भविष्यकाळात शेतकऱ्यावर येणाऱ्या संकटांची चाहूल अण्णा भाऊंना चाळीस वर्षांपूर्वीच लागली होती. त्यामुळेच त्यांनी शेतकऱ्यांना जागृत होण्यासाठी आपल्या शाहिरी  द्वारे आवाहन केले.
" तू खाशी कांदा, भाकरी बसुनि अंधारी!
 भुकेला कोंडा, निजेला धोंडा- बदल ही दुनिया सारी"
     शेतकऱ्यांबद्दल कितीही आत्मीयता अण्णाभाऊंच्या नसानसामध्ये भिनली आहे .. शेतकरी हा जगाचा निर्माता आहे. खरंतर तोच या जगाचा पोशिंदा आहे. परंतु सरकारचे व्याज भरून भरून तो भिकेला लागला. म्हणूनच अण्णा भाऊ साठेंनी  शेतकऱ्यांना तत्कालीन परिस्थितीतील कायद्याविरुद्ध बंड करण्यास प्रेरित केले. त्या काळात अण्णा भाऊ हे शेतकऱ्यांचे नेतृत्व करत होते.
 पण आजच्या परिस्थितीमध्ये मात्र शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते फार कमी आहेत. म्हणून तर शेतमालाच्या किमती पूर्वी होत्या तेवढ्याच आहेत. खतं बी बियाणं, अवजारे यांच्या किमती वाढल्या. आजच्या शेतकऱ्याला शेती करून परवडत नाही  पण  'घेतला वसा सोडता येत नाही. अशा अवस्थेत शेतकरी जगतो.  आजच्या पिढीला शेतीमध्ये स्वारस्य दिसून येत नाही. त्यामुळे ही पिढी हळूहळू शहराकडे स्थलांतरित होत आहे आणि खेडी ओस पडत आहे.  सरकार सध्या ज्या काही योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. त्या योजनांची खैरात म्हणजे विकास नव्हे, खरंतर ह्या योजना शेतकऱ्यांना आळशी बनवितात. कष्टावर निष्ठा असणाऱ्या अण्णांना आजच्या या योजना पटल्या नसत्या. त्यांचा विश्वास फक्त शेतकऱ्यांच्या कष्टावरच होता, आज लोकशाहीर अण्णा भाऊ साठे असते तर शेतकऱ्यांवर अशी वाईट वेळ आली नसती. सध्या ग्रामीण भागा मध्ये विदारक परिस्थिती दिसून येते. शेतीमध्ये कष्टाने पिकविलेल्या पिकांना योग्य तो भाव न आल्यामुळे शेतकरी आपल्या शेतजमीनी विकत आहेत. शेतीच्या जागा आता प्लॉटिंगने घेतल्या.  शेतीच्या ठिकाणी आज हिरवी गर्द पिके नव्हे तर सिमेंटची भली मोठी जंगलं दिसू लागली. खेड्यात जगणे आता लोकांना असह्य होत आहे. म्हणून शहरीकरण फार झपाट्याने वाढले. याचे मूळ कारण म्हणजे शेतीची बिकट अवस्था. आजचे सरकार मूळ प्रश्न सोडविण्याऐवजी त्यावर मलमपट्टी करताना दिसतात. शेतकऱ्यांची हीच मूळ समस्या, व्यथा अण्णा भाऊंनी ७० वर्षांपूर्वी अगदी पोट तिडकीने मांडली होती. त्यामुळे त्यांच्या कार्याची एक आठवण इथं मी सांगत त्यांच्या कार्यकर्तुत्वाला  आदरांजली वाहतो आहे.

-प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे
जय क्रांती वरिष्ठ महाविद्यालय लातूर.


टिप्पण्या