सामाजिक जाणीवा वाढवणाऱ्या कविता

 


   अनिता मेस्त्री या महिला मंडळ बाल विकास केंद्र प्राथमिक शाळा, कुर्ला या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी विकासासाठी त्या अंत:करणपूर्वक त्या सतत प्रयत्नशील असतात. त्यासाठी विविध उपक्रम त्या मुलांसोबत, शिक्षकांसोबत राबवत असतात. विविध प्रकारचे लेखन यानिमित्ताने त्या करीत असतात. सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून त्यांच्या शाळेचा अनेकदा सन्मान झालेला आहे. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्याबद्दल 'आदर्श मुख्याध्यापिका' म्हणून त्यांचा यथोचित गौरवही झालेला आहे. अशा उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय, कर्तव्यदक्ष आणि साहित्याची जाण असलेल्या मुख्याध्यापिका अनिता मेस्त्री या संवेदनशील कवयित्रीसुद्धा आहेत. त्यांच्या कवितांनाही अनेक पारितोषिकं प्राप्त झालेली आहेत. सणासमारंभाच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेल्या काही प्रासंगिक कविता माझ्या वाचनात आलेल्या आहेत . त्या कविता अतिशय तरल, वाचनीय आणि तितक्याच चिंतनशील असतात, याचा कैकदा प्रत्यय आलेला आहे. आता 'आनंदयात्री मी' हा नवीन कवितासंग्रह घेऊन त्या वाचकांच्या भेटीला येत आहेत. 

   त्यांची ही काव्यमय शब्दभेट वाचकांना नक्कीच वाचनानंद देणारी, सकारात्मक विचारांकडे नेणारी आणि सामाजिक जाणीवा वाढवणारी आहे, हे निश्चित ! 

त्यांच्या कवितेत नेमके काय आहे? हे सांगण्यासाठी त्यांच्याच कवितांच्या ओळी मला महत्त्वाच्या वाटतात. 'माझी बोली... माझी कविता' या कवितेत त्या म्हणतात,

बोलीत माझ्या गवसे, कथा अन् कविता 

सांगावया जनांसी, माझ्या मनातील व्यथा

आणखी एका ठिकाणी त्या म्हणतात, 

अंतिम कविता म्हणजे, अखंड ऊर्जा स्त्रोत 

सहज सुंदर जीवनाचा, जणू परिपूर्ण मधुघट

तर 'माझी लेखणी' या कवितेतून या गोष्टींचा आपल्याला पुन्हा प्रत्यय येतो, 

सुखदुःख नैराश्य असो अघटीत

लेखणीतून व्यस्त शब्दही अकल्पित

    खरंतर, मनातील भावभावनांना अलवारपणे शब्दांतून व्यक्त करणारी त्यांची कविता वाचकांना नवनवीन विचारांचं अवकाश देणारी आहे, जगण्याचं भान जपणारी आहे.

'निसर्ग माझा सखा सोबती' या कवितेतून त्या पर्यावरण संतुलन जपण्याचा महत्त्वाचा संदेश देतात. त्या म्हणतात,

निसर्ग आहे खरा मानवाचा श्वास 

मानवाला मात्र प्रगतीची आस

स्वार्थीपणात होतोय निसर्गाचा ऱ्हास 

जागा हो मानवा हाच क्षण खास

ज्यावेळी मानव खऱ्या अर्थाने जागा होईल साऱ्यांसाठीच खास होईल. केवढा हा व्यापक विचार.

'पळस' या कवितेतून त्यांचे शब्द पळसाचे मूर्तीमंत्र चित्रच आपल्यासमोर रेखाटतात.

पानगळी नंतर होईल निष्पर्ण झाड 

वाटे अस्तित्व त्याचे संपेल पार 

नसता ध्यानीमनी पुन्हा उभार 

नयनरम्य पळस रंगोत्सव छान

दुःखानंतर येते सुख हीच जगण्याची रीत, हा जीवनाचा अर्थ नकळत या कवितेतून उलगडत जातो. 

'माय माऊली' बद्दल व्यक्त होताना कवयित्री म्हणतात, 

धैर्याचा हुंकार, माझी माय माऊली 

क्रांतीचा एल्गार, माझी माय माऊली.

आईतला वेळप्रसंगी निर्माण होणारा करारीपणा सांगायला त्यांची कविता विसरत नाही.

'गुरुमहिमा' वर्णन करताना कवयित्री म्हणतात, 

गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश 

संस्कारांचे तेजोमय आकाश 

गुरु म्हणजे अथांग सागर 

भवसागर तारणारा माझा आधार

तर 'आली दिवाळी' या कवितेतल्या ओळीही मनात घर करून राहतात. सगळीकडे झगमगाटी वातावरण... तरीही कवयित्रीला प्रश्न पडतात,

पण सारीच घरे होतात का प्रकाशमान?

की अजूनही आहे दीना घरी अंधार?

कशी संपेल ही विषमता?

मिटतील कशा साऱ्या चिंता? 

एवढा मोठा हा सर्वांना व्यापून उरणारा समानतेचा, एकतेचा, बंधुतेचा विचार कवयित्री अगदी सहजतेने सांगून जातात.

     एकूणच अनिता मेस्त्री यांच्या कविता संस्कार आणि संस्कृती, कुटुंब, पती-पत्नी, मैत्री यावर भाष्य करून सामाजिक भान जागवणाऱ्या आहेत. त्यांच्या अभिनव दिंडी, हेचि दान या चिंतनाची बैठक लाभलेल्या भक्तिपर कविता लक्षवेधक आहेत. प्रतीक्षा, वंदन सेवाव्रतींना, महामानव या देशभक्तीपर कविता आपल्याला नवा विचार देतात. थोडक्यात सांगायचे झाले तर, आनंद पेरत जाणारा, जीवन मूल्यांची कास कसोशीने जपणारा आणि सजगता, माणुसकी, संवेदनशीलता या यांसारख्या सद्गुणांचा परिपोष करणारा अनिता मेस्त्री यांचा 'आनंदयात्री मी' हा कवितासंग्रह सर्वांनी वाचावा, इतरांनाही वाचायला द्यावा असाच आहे. या सुंदर काव्यनिर्मितीसाठी अनिता मेस्त्री यांचे आपण मनापासून अभिनंदन करायला हवे.

पुस्तकाचे नाव -

कवयित्री - अनिता मेस्त्री 

प्रकाशन - उमंग प्रकाशन 

पृष्ठे -   ७६  , किंमत - २५०/- रुपये 


एकनाथ आव्हाड 

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी

९८२१७७७९६८

टिप्पण्या