राजन लाखे हे साहित्य क्षेत्रातील एक कुशल संघटक आणि संयोजक आहेत.
ते गेली अनेक वर्षे अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील कविकट्ट्याचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. प्रौढांसाठी लेखन करत असतानाच त्यांनी आता आपला मोर्चा बालसाहित्याकडे वळवला आहे. 'ढब्बू ढेरपोट्या' हा त्यांचा नवीन बालकवितासंग्रह ज्ञानगंगा प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे.
हल्ली मुले टीव्हीसमोर बसून जेवण करतात. त्यामुळे त्यांचे जेवणावर नियंत्रण राहत नाही. परिणामी ह्या मुलांमधे स्थूलता वाढत आहे. ह्या कवितेतला 'ढब्बू ढेरपोट्या' हा त्यापैकीच एक. पुढे ढब्बूला आपल्या लठ्ठपणाची लाज वाटू लागली. त्याने आपला आहार नियंत्रित केला आणि व्यायाम वाढवला. त्यामुळे त्याचे 'ढेरपोट्या' हे नाव कायमचे गेले. पहिल्याच कवितेत कवीने फारच छान सकारात्मक संदेश दिला आहे. पुस्तकांशी गट्टी करण्याचा कानमंत्र दिला आहे.
आजीआजोबा म्हणजे बच्चेकंपनीसाठी अपील कोर्ट असते. कारण ते हमखास लाड पुरवणारच. म्हणून कवीने एका कवितेत 'आजीचे गुपित' सांगितले आहे.
फुलांचे, फळांचे संमेलन भरलेले आपण कथा कवितांतून वाचतो. राजन लाखे यांच्या कवितेत चक्क पानांचे संमेलन भरले आहे. वेगवेगळ्या झाडावेलींची पाने एकत्रित येऊन आपली ओळख करून देत आहेत.
'मी आहे आपट्याचं पान
दस-याला सोन्याचा मान'
अशी प्रत्येकाची खासियत!
बालवाचकांना निसर्गाच्या जवळ नेण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
खरे तर पोलीस हा आपला मित्र. पण मोठी माणसे लहान मुलांना विनाकारण पोलिसांची भीती घालतात. पुढे ती भीती दृढ होत जाते. लहान मुले पोलिसांना का घाबरतात, याचे गुपित कवीने 'पोलीसदादा' ह्या कवितेत सांगितले आहे.
शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर. शाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार. शाळा म्हणजे गुरुकुल. शाळेमुळे आमच्या जीवनाला आकार मिळतो. शाळेची ही थोरवी वर्णन करताना राजन लाखे यांची लेखणी थकत नाही.
वाढत्या शहरीकरणामुळे नवीन पिढी आपल्या मूळ खेडेगावापासून आणि पर्यायाने निसर्गापासून तुटत चालली आहे. बालकुमारांची गावखेड्यांशी नाळ बांधून ठेवण्यासाठी कवीने 'आमचे गाव' ह्या कवितेत निसर्गाशी गळाभेट घडविली आहे. पूर्वी घराघरांत सांजवेळी दिवे लावल्यावर शुभंकरोती म्हटली जात असे. आता ती दुर्मीळ होत चालली आहे. शुभंकरोती हे केवळ कर्मकांड नसून तो एक संस्कार आहे.
'संस्कारांची जपते नाती
शुभंकरोती, शुभंकरोती'
अशा शब्दांत कवीने ह्या संस्काराची आठवण करून दिली आहे.
पिझ्झा बर्गरच्या ह्या जमान्यात आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा विसर पडत चालला आहे. धिरडे हा आपल्याकडचा रसना तृप्त करणारा एक खास खाद्यपदार्थ. धिरडे आणि तेही आजीच्या हातचे. मग तर काही विचारायलाच नको. 'धिरडे' ह्या कवितेतील नातवंडे आजीच्या हातचे खमंग धिरडे खाऊन तृप्त झाले आहेत.
स्कूल बस म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाचे निधान! घरी आणि शाळेत जो धिंगाणा करता येत नाही, तो स्कूल बसमध्ये करता येतो. या बसमधल्या गमतीजमती कवीने 'बस आली' ह्या कवितेत वर्णन केल्या आहेत.
दूध प्यायचे म्हटले, की बाळगोपाळांच्या कपाळाला आठ्या पडतात. चहा, कॉफी म्हटले, की जोश येतो.
'चहा आणि कॉफी
आहेत बहीण भाऊ
कुणाला आवडते बहीण
कुणाला आवडतो भाऊ'
अशा प्रत्येकाच्या आवडीनिवडी ठरलेल्या.
शेवटी कवीने दुधाचे महत्त्व पटवून दिले आहे :
'दूध आहे आरोग्यदायी
दूधच प्यावे नित्यदिनी
दुधात असते खूप प्रोटीन
दुधात खूप सारे व्हिटैमिन'
ह्या ओळी वाचल्यावर बच्चेकंपनी दुधाला नाके मुरडणार नाही, अशी अपेक्षा आहे.
पाणीपुरी किंवा गोलगप्पे हा बाळगोपाळांचा असाच एक आवडता चमचमीत खाद्यपदार्थ. तो खाताना जिभेवर नियंत्रण ठेवायला कवी सांगतो.
एका कवितेतील बालक देवबाप्पाशी गप्पा मारतो आहे. देवबाप्पा आकाशात राहात असेल, तर मग घरात देवघर कशाला? आई हात जोडून देवाला काय मागणं मागत असेल? देवबाप्पा कधी तरी प्रसाद खातो का? असे अनेक प्रश्न या बालकाला सतावत आहेत.
दादा आणि गुड्डू यांच्यातील संवादही मोठा विचारप्रवर्तक आहे.
होळी हा मुलांचा आवडता सण. कारण होळीच्या विविध रंगांत न्हाऊन निघता येते. रंग लावताना डोळ्यांची काळजी घ्यायला कवीने सुचविले आहे.
'चांदोबाच्या गाडीवर
लखलखणारे दिवे
काळ्याकुट्ट अंगणात
चांदण्यांचे काजवे'
अशा शब्दांत ही कविता निसर्गदर्शन घडवते.
'हसणे, रडणे, पडणे' हे एक उत्तम असे अभिनयगीत आहे.
'एक गहू आणि प्रकार बहू' हे जितके खरे आहे, तितकेच 'कागद' ह्या कवितेतील कागद आपल्याला वही, पुस्तक, वृत्तपत्र, पोथी, कागदी पिशवी अशा विविध रूपांत भेटतो. हाच कागद ज्ञान, विज्ञानाचा सोबती आहे, हे कवीने आवर्जून सांगितले आहे.
बाळगोपाळांना काव्यकोडी सोडवायला आवडते. मुलांची ही आवड लक्षात घेऊन कवीने शेवटी नऊ काव्यकोडी दिली आहेत. ही काव्यकोडी जितकी रंजक तितकीच उत्कंठावर्धक आहेत.
ह्या संग्रहात अशी छकुली, परी, सिंह आणि हरीण, गुलाबाचे पान व मुंगीताई, राघू आणि साधू, ससा आणि कासव अशी काही कथाकाव्ये आहेत. कवीने कवितेत गुंफून गोड गोड गोष्टी सांगितल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बच्चेकंपनीला आवडण्यासारख्याच आहेत. प्रत्येक कथाकाव्यात काही एक जीवनोपयोगी संदेश दिला आहे.
राजन लाखे यांच्या कवितेत अवघे बालभावविश्व अवतरले आहे. यात आजीआजोबा, आईवडील, दादा, ताई अशी सगळ्या नात्यांची गुंफण आहे. मनोरंजन तर आहेच, संस्कारांचे शिंपणही आहे. प्राचीन संस्कृतीबरोबरच नवता आणि आधुनिकताही आहे. राजन लाखे यांच्या कवितेला नाद, लय आणि तालाची चांगली जाण आहे. राजन लाखे यांचा 'ढब्बू ढेरपोट्या' बालकुमार वाचकांचा सखा - सवंगडी बनेल, असा विश्वास वाटतो.
'ढब्बू ढेरपोट्या' (बालकवितासंग्रह)
कवी : राजन लाखे
मुखपृष्ठ आणि सजावट : राजेंद्र गिरधारी
प्रकाशक : ज्ञानगंगा प्रकाशन व वितरण
पृष्ठे ६४ किंमत रु. १५०
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

addComments
टिप्पणी पोस्ट करा