आंबेमोहराच्या फुलांतून उमलणारी ऋतूची भाषा….

ऋतू बदलतो…

निसर्ग आपली भाषा बदलतो…
आणि छायाचित्रकार त्या बदलाचा साक्षीदार होतो.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ कॅमेरा हातात घेताना माझ्यासाठी छायाचित्रण म्हणजे केवळ दृश्य टिपणे नव्हे, तर काळाला थांबवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. उन्हाळ्याची रखरख, पावसाळ्याची ओलसर शांतता  तर कधी महापूर अतिवृष्टी आणि हिवाळ्याची धूसर बोचरी कडाक्याची थंडी प्रत्येक ऋतू आपल्यासोबत वेगळा रंग, वेगळा गंध आणि वेगळी भावना घेऊन येतो. त्या ऋतूतील सुर्योदय -सुर्यास्त त्या भावना छायाचित्रांच्या माध्यमातून जतन करणे, हेच माझ्या छायाचित्रणाचे मूळ उद्दिष्ट आहे.

शेतात डोलणारी धान्याची पिके, फळबागांतील मोहर, रानावनातील पानझड, नव्याने फुटणारी हिरवी पालवी, गावोगावी होणारे सण-उत्सव, यात्रा, बाजारात येणारी देशी-विदेशी फळे—या साऱ्यांचा ऋतुसापेक्ष संदर्भासह संग्रह करणे म्हणजे निसर्गाचे दस्तऐवजीकरण होय. प्रत्येक छायाचित्रासोबत त्या वस्तूचे नाव, वैशिष्ट्य, आवड-निवड, गुणधर्म आणि त्यामागचा प्रदेशही जतन केला जातो. त्यामुळे हा संग्रह केवळ छायाचित्रांचा न राहता ज्ञान आणि आठवणींचा ठेवा बनतो.

प्रसार साहित्यिक, प्रकाशक आणि विविध प्रसारमाध्यमांच्या गरजेनुसार हा संग्रह वेळोवेळी उपयोगात येतो. एका छायाचित्रातून एखाद्या ऋतूची ओळख होते, तर कधी त्या ऋतूमधील मानवी जीवनाचा संदर्भ अधोरेखित होतो. यामुळे छायाचित्रण हे केवळ कला न राहता समाज आणि निसर्ग यांना जोडणारे माध्यम ठरते.

यावर्षीचा छायाचित्रण प्रवास विशेष ठरला. पत्रकार दिनाच्या निमित्ताने बाळशास्त्री जांभेकर यांच्या कोकणातील पोंबुर्ले गावाकडे जाण्याचा योग आला. नांदेडहून कोल्हापूर, फोंडा घाट, गगनबावडा मार्गे कोकणात उतरताना बदलणारा निसर्ग कॅमेऱ्यात साठवत प्रवास पुढे सरकत राहिला. डोंगररांगा, धुके, वळणावळणाचे घाटरस्ते—प्रत्येक वळणावर नवे दृश्य उलगडत होते.

तारकलीचा अथांग समुद्र, शांत बॅकवॉटर, स्थलांतरित सिगल पक्ष्यांची उडणारी पांढरी रेष, मालवण-पोंबुर्ले परिसरातील रानमाळ आणि नदीकाठची हिरवळ—या साऱ्या दृश्यांनी ऋतुचक्राचा एक सुंदर अध्याय पूर्ण केला. याच परिसरात २०२६ सालचा भरगच्च बहरलेला आंबेमोहर कॅमेऱ्यात कैद झाला. निसर्गाचा हा बहर जणू नव्या वर्षातील छायाचित्रण प्रवासाची शुभ सुरुवात ठरला.

आंबेमोहर जसा फुलतो, तसाच छायाचित्रकाराचाही उत्साह नव्याने बहरतो. प्रत्येक ऋतू नवे विषय देतो, नवी जबाबदारी देतो—तो ऋतू जसा आहे तसाच पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची.
म्हणूनच ऋतुचक्रातील छायाचित्रे ही केवळ सुंदर दृश्ये नसून काळाच्या संग्रहालयातील मौल्यवान दस्तऐवज आहेत.

हा प्रवास यावर्षीही असाच बहरत राहो, निसर्गाच्या प्रत्येक बदलाची नोंद कॅमेऱ्यात साठत राहो—हीच प्रार्थना.

छायाचित्रकार : विजय होकर्णे, नांदेड    
   
आंबेमोहर म्हणजे ऋतुचक्राची
शांत घोषणा.
पांढऱ्याशुभ्र फुलांतून
उमलणारा सुगंध
उन्हाळ्याची चाहूल देत
आंबेमोहर हा आंब्याच्या
फलधारणेचा निर्णायक टप्पा आहे.
या अवस्थेतील हवामान,
आर्द्रता व परागीभवन
थेट उत्पादनावर परिणाम करतात.
सुदृढ मोहर म्हणजे दर्जेदार आंब्याची हमी.
छायाचित्र : विजय होकर्णे, नांदेड
टिप्पण्या