मुंबई : महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्री. अमोल गजानन कीर्तिकर यांनी आज वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. ढोल-ताशाच्या गजरात, 'जय शिवाजी, जय भवानी' च्या घोषणा देत महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते, हे पदाधिकारी व नेत्यांसह अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत सामिल झाले होते.
शिवसेना उमेदवार श्री. अमोल कीर्तिकर यांनी सर्वप्रथम शिवतीर्थावरील वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जावून अभिवादन केले. चैत्यभूमिवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस वंदन केले. नंतर 'मातोश्री' येथे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हजारो महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह पोहोचले.
शिवसेना उमेदवार श्री. अमोल कीर्तिकर यांचा अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते व आमदार अनिल परब, आमदार सुनिल प्रभू आमदार विलास पोतनीस, राष्ट्रवादीचे नेते राजेश शर्मा, खा. प्रियांका चतुर्वेदी, आमदार ऋतुजा लटके, युवानेते व सचिव वरुण सरदेसाई, काँग्रेसचे सर्व माजी आमदार श्री. सुरेश शेट्टी, अशोक जाधव, बलदेव खोसा, माजी मंत्री अस्लम शेख, राष्ट्रवादीचे अजित रावराणे, महिला विभाग संघटक राजुल पटेल, साधनाताई माने, समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पुरुष व महिला नगरसेवक, उपविभागप्रमुख, युवासेना पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
वांद्रे पूर्व येथील परिसर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, समाजवादी, आप, रिपब्लीकन पक्ष, कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गजबजून गेला होता. आघाडीच्या घटक पक्षाचे झेंडे सर्वत्र दिसत होते. महाविकास आघाडीच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते गळयात गमछे, हाती झेंडे घेवून 'जय भवानी, जय शिवाजी', महाविकास आघाडीचा जयजयकार करीत अमोल कीर्तिकर यांच्या मिरवणुकीत सामील झाले होते. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते.
वर्सोवा अंधेरीतील कोळी बांधव आणि आरे कॉलनीतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आपला पारंपारिक वेष परिधान करीत, ढोल-ताशा वाजवत नाचत सहभागी झाले होते.
शिवसेना उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी निवडणुकीतील लढाई सत्ताधारी हुकुमशाही विरुध्दची लढाई आहे. या लढाईत लोकशाही विजयी होणार असा विश्वास प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

addComments
टिप्पणी पोस्ट करा