आज मी तुम्हाला अतिशय छान छान कविता असलेल्या, आपल्या मनातील गोष्टी सांगणाऱ्या एका कवितासंग्रहाविषयी सांगणार आहे. त्या कवितासंग्रहाचे नाव आहे 'नदी रुसली, नदी हसली'.
या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ इतके आकर्षक व रंगीबेरंगी आहे की कोणीही हे पुस्तक वाचण्यास उत्सुक होईल. मुखपृष्ठावर खूप सारे वेगवेगळे चित्र आहेत. पहिल्या चित्रात एक स्त्री आहे. कविता वाचल्यानंतर मला समजले की ही तर नदीमाय आहे. तिच्या आसपास सर्वत्र पाणीच आहे. दुसऱ्या चित्रात एक मुलगा दाखवला आहे. त्याच्यामागे पुस्तक दिले आहे. त्याला बघून असे वाटते, की तो सर्वांना पुस्तक वाचायला सांगत आहे. तिसऱ्या चित्रात एक मुलगा रॉकेटमध्ये बसला आहे. त्याच्या भोवताल काही ग्रह आहेत. चौथ्या चित्रात एक मुलगी पुस्तक वाचत आहे. त्या पुस्तकाचे नाव 'युद्ध नको! बुद्ध हवा!' असे आहे.
या पुस्तकाचे मुखपृष्ठसुद्धा खूप छान आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठसुद्धा रंगीबेरंगी आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरसुद्धा खूप छान चित्रे आहेत. या पुस्तकाचे पाठपृष्ठसुद्धा खूप छान आहे. ती मुलगी 'युद्ध नको! बुद्ध हवा!' या पुस्तकातील कविता म्हणत आहे. या पुस्तकाविषयी गव्हाणे सरने मला एकदा सांगितले होते.
जेव्हा मी या कवितासंग्रहाचे पाठपृष्ठ पाहिले, तेव्हा मला आठवले की, मी जेव्हा 'गूगलबाबा' हा कवितासंग्रह वाचला होता, तेव्हा त्या कवितासंग्रहाचे पाठपृष्ठ हेच होते. म्हणजे त्या कवितासंग्रहाचे पाठपृष्ठ व या कवितासंग्रहाचे पाठपृष्ठ सारखेच आहे. पाठपृष्ठावर डॉ. सुरेश सावंत सर यांचा फोटो आणि त्याखाली त्यांच्या काही पुस्तकांची नावे दिली आहेत.
दुस-या पानावरील चित्रांमध्ये एका स्त्रीला डोंगर बनवले आहे. तिचे केस डोंगरावरील गवताप्रमाणे दाखवले आहेत. गवतावरील फुले म्हणजे तिचे कपडे आहेत. मी जेव्हा 'फुलांचा डोंगर' ही कविता वाचली, तेव्हा मला समजले की, ही तर वनराणी आहे.
पुस्तकात डॉ. सुरेश सावंत सर यांचे खूप छान रेखाचित्र छापले आहे. त्यामागे खूप सार्या मुलांची चित्रे दिली आहेत. कारण सुरेश सावंत सरांच्या कविता वाचल्या की मुलांचे मनोरंजनही होते आणि त्यांना खूप काही शिकायलाही मिळते. त्यांच्या कविता खरंच खूप छान असतात.
'नदी रुसली नदी हसली' ही कविता खूप छान आहे. या कवितेमध्ये सांगितल्याप्रमाणे खरंच माझ्या शहरातले सांडपाणी नदीत सोडतात. नदीतील रेती काढण्यासाठी तिच्यात खड्डे करतात. नदीत घाण, कचरा टाकतात. आपण खरंच तसे केले नाही पाहिजे. ही गोष्ट आम्हाला गव्हाणे सर नेहमी सांगतात. आम्हाला नेहमी पर्यावरणाला वाचविण्याच्या गोष्टी सांगतात.
'वाचनपेटी' ही कविता खूप आवडली.
या कवितेमध्ये सांगितल्याप्रमाणे खरंच पुस्तक वाचल्यावर प्रत्येक अवघड गोष्ट सोपी होते. मलासुद्धा पुस्तकं वाचायला खूप आवडतात.
'कर्णपिशाच' ही कविता खूप छान आहे. ही कविता मोबाईलविषयी आहे. कवितेमध्ये मोबाईलचे दुर्गुण सांगितले आहेत. माणसे नेहमी मोबाईलमध्ये व्हाट्सअप, फेसबुक पाहत असतात. गेम खेळत असतात. त्याऐवजी आपण मोबाईलमधून किती तरी ज्ञान मिळवू शकतो. पण ते ज्ञान मिळवण्याऐवजी आपण मोबाईलमध्ये व्हाट्सअप आणि फेसबुकच पाहतो.
'आमचा परिपाठ' ही कविता मला खूप आवडली. ही कविता वाचताना मला आमच्या परिपाठाची आठवण झाली. या कवितेमध्ये सांगितलेल्या परिपाठाप्रमाणे आमचा परिपाठसुद्धा मस्तच असतो.
'आनंदाने जगण्याचा मंत्र' ही कविता खूप छान आहे. या कवितेमध्ये भीतीविषयी सांगितले आहे. भीती कशी पळवून लावायची ते सांगितले आहे. भीतीला पळवून निर्भय होण्याचा मंत्र या कवितेमध्ये सांगितला आहे. आम्हाला गव्हाणे सर नेहमी सांगतात की, आपण एखादं चांगलं काम करत असताना कधीही भ्यायचं नाही. तेव्हाच भ्यायचं, जेव्हा आपण एखादं वाईट काम करतो.
'चालढकल' ही कविता तर फारच मस्त आहे. या कवितेतून खूप काही शिकायला मिळते. आपल्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण हार न मानता प्रयत्न करत राहायचे, असे शिकायला मिळते.
'पर्यावरणपूरक गणपती' ही कविता खूप छान आहे. या कवितेमध्ये सांगितल्याप्रमाणे घातक रंग न वापरता, थर्माकोल, प्लास्टिक न वापरता पर्यावरणपूरक गणपती बनवायला पाहिजे. पण माणसं घातक रंग असलेले, थर्माकोल, प्लास्टिक वापरलेले गणपती विकत घेतात आणि मोठे मोठे गणपती नदीत विसर्जित करतात. त्यामुळे नदीतील पाणी दूषित होते. ते मोठे मोठे गणपती एक-दोन वर्ष नदीत तसेच पडून राहतात.
'फुलांचा डोंगर' ही कविता मला फार आवडली. मी जेव्हा ह्या कवितेवरील चित्र पाहिले, तेव्हा मला आठवले की हे चित्र मुखपृष्ठाच्या नंतर पहिल्या पेजवर दिले आहे. त्या चित्रामध्ये दिसणारी स्त्री ही वनदेवी आहे, हे मला समजले.
- कवितासंग्रह - नदी रुसली नदी हसली कवी - डॉ. सुरेश सावंत
- प्रकाशन - ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.
- किंमत -120 ₹
- पाने - 64
- कु. वैष्णवी सिद्धार्थ मस्के
- वर्ग -आठवा
- जि.प.प्रा.शाळा, रायपूर
- तालुका सेलू जिल्हा परभणी
addComments
टिप्पणी पोस्ट करा