प्राणी व पक्ष्यांचा काव्यमय ज्ञानकोश : 'एलियन आला स्वप्नात' कु. स्वाती संतोष शिंदे (वर्ग८वा)

 

'एलियन आला स्वप्नात' हा डॉ. सुरेश सावंतसरांचा बालकवितासंग्रह नुकताच वाचला आहे. डॉ. सुरेश सावंतसर हे एक सुप्रसिद्ध बालसाहित्यिक आहेत. 'एलियन आला स्वप्नात' हे नावच खूप गमतीदार आहे. परग्रहावरील सजीवांना एलियन असे म्हणतात. 'कोई मिल गया' या हिंदी चित्रपटात मी एलियन पाहिला आहे. तो मुलांशी मैत्री करतो आणि त्यांची विविध कामे जादूने करतो. तसाच एलियन जर स्वप्नात आला, तर काय होईल? याचे उत्तर या कवितासंग्रहातून मिळते. या संग्रहात खूपच वेगवेगळ्या कविता वाचायला मिळतात. जसे की 'डायनासोरची बहीण', काटेरी साळींदर, एकशिंगी गेंडा, अशा आम्ही न पाहिलेल्या प्राण्यांविषयी कवीने मस्त कविता लिहिल्या आहेत.

इतर बालकवितासंग्रहांपेक्षा हा संग्रह खूपच आगळावेगळा आहे. यातील कविता वाचून ज्ञानात भर पडते. या संग्रहात एकूण एकोणतीस कविता आहेत. सगळ्याच कविता एकापेक्षा एक सुंदर आहेत.

उदा. 'डायनॉसोरची बहीण' ही कविता. डायनॉसोर प्रत्यक्षात कोणीच पाहिला नाही. टीव्हीवरच, तेही डिस्कव्हरी चँनेलवर आपण पाहतो. हजारो वर्षांपूर्वी डायनासोर होते, असे म्हणतात. त्यांच्यासारखीच, पण आकाराने लहान असणारी मगर. कवीने या मगरीला 'डायनॉसोरची बहीण' म्हटले आहे. या कवितेत मगरीच्या सर्व गुणवैशिष्ट्यांची माहिती मिळते.

'क्षणात जलचर ,क्षणात भूचर

अत्यंत सावध तुम्ही उभयचर'. 

पाण्यामध्ये व जमिनीवर, अशा दोन्हीही ठिकाणी मगर राहाते, म्हणून मगर हा उभयचर प्राणी आहे. त्याचा रंग राखाडी, करडा व काळपट असतो. त्याची त्वचा टणक व बुलेटप्रूफ असते. मगरीचे दात अतिशय तीक्ष्ण, धारदार असतात. मगर वाघ आणि सिंहालाही जखमी करते. मगर शिकारीला सहजपणे गिळत असते. शिकार गिळताना अश्रू ढाळत असते. ते अश्रू खोटे असतात. आपण म्हणतो ना 'मगरमछ के आंसू'. मगर हा एक मांसाहारी प्राणी आहे. कवीने मगरीला प्रेमाने 'मगरबाई' असे म्हटले आहे. मगर ही डायनॉसोरसारखीच दिसते, म्हणून कवितेच्या शेवटी कवी म्हणतो..

'चित्रात, टीव्हीवर जेव्हा मगर भेटते

डायनॉसोरची धाकटी बहीणच वाटते'. 

'वाघाची डरकाळी' या कवितेत जंगलातील प्राण्यांचे वर्णन आहे. सुगरण घरटं विणते, तर कोळी जाळं विणतो. वानराचे तोंड काळे असते. ससा टुणुक टुणुक उड्या मारतो. खारुताई सरसर धावते. माकड खोड्या काढते. कोकिळा मंजुळ गाणी गाते. टिटवी बेसूर ओरडते. वटवाघळे उलटी लटकतात. मुंग्या रांगेत चालतात. बगळा म्हशीच्या पाठीवरून स्वारी करतो. जिराफाची मान उंच असते. जंगलचा राजा असलेल्या वाघाची भलतीच शान असते, म्हणून कवी म्हणतो :

'वृक्षावरती वानरांचा 

कळप करतो हूप हूप

वाघाच्या डरकाळीने 

सारे झाले चिडीचुप'. 

जंगलात राहणाऱ्या या सर्व प्राण्यांविषयी कवीने कवितेत किती सुंदर वर्णन केलेले आहे! 

'जिराफदादा' या कवितेत कवीने जिराफाला काही प्रश्न विचारले आहेत. त्यावर जिराफानेही योग्य उत्तर दिली आहेत.

'जिराफदादा जिराफदादा, 

तुम्ही आलात तरी कुठून?

'दूर आमचे वसतिस्थान 

आलो आफ्रिका खंडातून'. 

जिराफ हा आफ्रिका खंडातून आलेला प्राणी आहे. 'टांझानिया' या देशाचा 'राष्ट्रीय प्राणी' आहे, ही खूप महत्त्वाची माहिती या कवितेतून मिळते. जिराफाची उंच, उतरती मान म्हणजे घसरगुंडी आहे की काय, असेच वाटते. त्याची त्वचा जाड असल्यामुळे त्याला थंडी वाजत नाही. जिराफ स्वभावाने गरीब दिसत असला, तरी शत्रूला लाथा मारून ठार करतो. जिराफाची मान उंच असल्यामुळे त्याला उंचउंच झाडाचा पाला खाता येतो. जिराफाची मान उंच असली, तरी तो सर्वांशी खूप चांगल्या रीतीने वागत असतो. म्हणून कवी म्हणतो ..

'सर्वात उंच प्राण्याकडून ह्या 

तुम्ही आम्ही शिकायचे काय? 

डोके आभाळाला भिडले तरी

जमिनीवरच असावेत पाय'. 

कवीने शेवटी खूप छान संदेश दिला आहे. आपण कितीही मोठे झालो, तरी आपले पाय सदैव जमिनीवरच असावेत. 

'एकशिंगी गेंडा' हा खूप मोठा, वजनाने भारी असलेला प्राणी. त्याला वाघही घाबरतो. हा कांजीरंगा अभयारण्यात पाहायला मिळतो. तो वासावरून संकटाचा अंदाज घेत असतो. एवढा मोठा हा प्राणी शाकाहारी आहे. जंगलात गवत खाऊन राहणारा आहे. जणू हत्तीचा धाकटा भाऊच वाटतो. गवताळ दलदलीत राहणारा हा प्राणी, याला चिखलात राहायला आवडत असते. म्हणून गेंडाभाई म्हणतो :

'गेंडाभाई गेंडाभाई, 

निघालात का खेळायला? 

खेळायला नाही आवडत 

चला चिखलात लोळायला'. 

समुद्रात अनेक मोठमोठे मासे असतात. त्यातलाच एक देवमासा. आकाराने खूप मोठा असतो. देवमाशाला व्हेल असेही म्हणतात. तो समुद्रात खूप खोलवर राहत असतो. त्याचे दात करवतीसारखे असतात. खोल पाण्यात तो समाधी घेतल्यासारखा स्तब्ध राहतो. समुद्रातील इतर मासे आणि जलचर यांची शिकार करतो. हा खूप मोठा असल्याने जहाजांना धक्के देऊन उलथून टाकतो. अशा खोड्याही करत असतो. तो एक सस्तन प्राणी आहे. तो एक प्रकारचा आवाज काढतो.

'अजस्त्र देहाचा हा 

एक सस्तन प्राणी

चित्रविचित्र आवाजात 

गुणगुणत असतो गाणी'. 

'एलियन आला स्वप्नात' या कवितेत एलियन हा परग्रहावरील सजीव एका मुलाच्या स्वप्नात येतो. 

बट बट डोळे, नकटं नाक, 

डोईवरती नुसतं टक्कल. असा हा कमी उंचीचा, पायात चप्पल बूट न घालणारा, अंगात पांढरा सूट घालणारा, दुबळा- पतला असणारा एलियन. त्याची अंतराळात वस्ती असते, असे म्हणतात. जर एलियन स्वप्नात आला तर काय मज्जा येईल! आपणही त्याच्यासोबत अंतराळात फिरण्यासाठी जायचं. किती सुंदर कल्पना कवीने केलेली आहे! 

'एलियन माझ्या स्वप्नात आला

मला म्हणाला, चल रे भाऊ

एका जागी कंटाळला आहेस

छानपैकी चंद्रावर फिरून येऊ'. 

खरोखरच एलियनशी मैत्री झाली, तर आपली सर्व कामे तो लवकरात लवकर करेल. आपण चित्रपटात पाहतो ना, त्याचे जादू असे नाव असते. त्याच्या मदतीने ते मुले फुटबॉलचा सामना जिंकतात. अगदी तसेच मी त्याला करायला लावेन. मला ही कल्पनाच खूप आवडली.

ससा आणि कासवाची गोष्ट आपणा सर्वांना माहीत आहे. त्याच कासवाची 'कासवा कासवा' ही कविता. कासवाची पाठ खूपच टणक असते. तलवारीने वार केला, तरी त्याला काहीच होत नाही. कासव समुद्रकिनारी अंडी घालतो. जमिनीवर तुरुतुरु पळतो. कासव जमिनीवरही राहतो आणि पाण्यातही राहतो. कवीने त्याला 'डायनॉसोरचा नातेवाईक' म्हटले आहे. त्याचे आयुष्यमान खूप जास्त असते.

'आयुष्यमान सगळ्यात भारी

मित्रा, तू शाकाहारी की मांसाहारी?' 

कवीप्रमाणेच मलाही प्रश्न पडतो, की कासव शाकाहारी आहे की मांसाहारी? तो पाण्यात काय खात असेल बरे? जमिनीवर काय खात असेल बरे? तो खूप वर्षं जगतो. त्याचे आयुष्य खूप वर्षं असते.

पावसाचा दूत असणारा, शेतकऱ्यांना 'पेर्ते व्हा' असा संदेश देणारा 'पावशा पक्षी', ज्याला सर्वजण अशुभ मानतात, असा 'घुबड', रात्री फिरतो आणि दिवसा झोपतो. भुताचे वाहन म्हणून त्याला ओळखतात. शेती व फळबागायतीचे नुकसान करणारा, जमिनीत खोल बोगदा करून राहणारा, अंगावर अतिशय तीक्ष्ण काटे असणारा, वाघालाही जखमी करणारा 'काटेरी साळींदर', आमच्याकडे त्याला 'सारसूळ' असे म्हणतात. 'बुलबुलचे घरटे', 'हॉर्न बिल', सापांचा शत्रू म्हणून ओळखला जाणारा 'मुंगूसमामा', हसरा प्राणी म्हणून ओळखला जाणारा 'तरस' या प्राण्यांच्या कवितेतून त्यांच्याविषयी मजेशीर माहिती मिळते व खूप काही शिकायला मिळते. या कविता वाचताना मी विज्ञान किंवा भूगोलाच्या तासातच आहे की काय, असे मला वाटले.

कवीने या पुस्तकात खूप सुंदर कविता लिहिल्या आहेत. अशा प्राण्यांवर कविता लिहिल्यात, की आजपर्यंत ज्यांच्यावर कोणीच कविता लिहिलेली नसेल. म्हणून या कवितासंग्रहातील सर्वच कविता मला खूपच आवडल्या. यासह फळांच्या बागेत, मामाच्या मळ्यात, शहाणे गाढव, पतंगबाजी, बहुरूपी अननस, फणसबाळे, खेळाच्या तासाची तक्रार इ. कविता मस्तच आहेत! खरोखरच, खेळाच्या तासाची तक्रार माझ्याही मनात होतीच. माझ्या शाळेतील इतर विषयांचे शिक्षक असेच करत असतात. हिमालयाची हाक, जांभयांची साथ आली, बालवाडी आनंदवाडी, असून नसून सारखेच, आजीची देवपूजा, लाडका लाडोबा याही कविता खूपच सुंदर आहे.


या पुस्तकाचे मुखपृष्ठ तर खूपच सुंदर आहे! त्यावर एलियन एका मुलाला अंतराळात नेत आहे व दुसरा मुलगा त्याच्याकडे गमतीने पाहत उभा आहे. प्रत्येक कवितेवर खूप उत्कृष्ट अशी चित्रे रेखाटली आहेत. ही चित्रे पुंडलिक वझे सरांनी रेखाटली आहेत. कवितासंग्रह रंगीत असल्यामुळे खूपच सुंदर डिजिटल बनला आहे. मला तर वाटत होते, की लॅपटॉपवरच मी या कविता वाचत आहे की काय! पाठपानावर डॉ. सुरेश सावंतसरांचा परिचय छापला आहे. ह्या कविता वाचताना मला खूप आनंद मिळाला. 

कवितासंग्रह : 'एलियन आला स्वप्नात' 

कवी : डॉ. सुरेश सावंत

प्रकाशन : चेतक बुक्स पुणे

पृष्ठे : ५६

मूल्य: ३६० रु. 

______________________________

नाव : कु. शिंदे स्वाती संतोष 

वर्ग : आठवा 

शाळा : श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येवती ता. मुखेड जि. नांदेड

टिप्पण्या