कु. साची ही सौ. प्रतिमा आणि साकेत भांड यांची मुलगी. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि आशाताई भांड यांची नात. भांड परिवारात तीन पिढ्यांची समृद्ध साहित्यिक परंपरा आहे. तिसऱ्या पिढीची प्रतिनिधी असलेली, दहा वर्षांची साची सध्या पाचव्या वर्गात शिकत आहे. साची मोठी गोष्टीवेल्हाळ मुलगी आहे. तिच्या गोष्टीवेल्हाळपणाचा अनुभव मी घेतला आहे. आजीआजोबांकडून गोष्टी ऐकत ऐकत साची स्वतंत्र गोष्टी लिहायला (सांगायला) लागली. तिसरीत असताना तिने स्वतः रचून पाच गोष्टी सांगितल्या. चौथीत असताना तिने आणखी पाच गोष्टी सांगितल्या. तिच्या सुदैवाने तिला लेखनिक म्हणून लाभले तिचे आजोबा, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड. पण साची ही काही कच्ची लेखिका नाही. तिने लेखनिकाला बजावले, माझ्या कथेत एका शब्दाचाही बदल करायचा नाही. जसे सांगितले, तसे लिहून काढायचे. मग काय हिंमत आहे, लेखनिकाने गोष्टीत बदल करण्याची!
साकेत प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केलेल्या 'साचीच्या गोष्टी' ह्या पुस्तकात छान छान अशा दहा गोष्टी आहेत. 'मदत करावी' ह्या पहिल्याच गोष्टीत सोहम आणि विशाल हे दोन मित्र आहेत. सोहम विशालच्या जखमेवर मलमपट्टी करतो. दोन दिवसांनी जखम बरी झाल्यावर विशाल सोहमला 'धन्यवाद' म्हणतो. सोहम म्हणतो, 'धन्यवाद म्हणू नकोस. अडचणीत असेल, त्याला मदत कर'.
कुत्र्याच्या पिलाला आणि पक्ष्यालाही ते हाच संदेश देतात. कोरडे आभार मानून मोकळे होण्यापेक्षा मदत करण्याची ही परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे, असा संदेश साचीने ह्या कथेतून दिला आहे.
'रेखा, मैना, ससा आणि कावळा' ह्या गोष्टीतला कावळा उपाशी आहे. त्याला एका माठाच्या बुडाला थोडासा भात दिसतो, पण खोल असल्यामुळे त्याला तो खाता येत नाही. मैना, ससा आणि रेखा नावाची मुलगी त्याला मदत करतात. माठ तिरपा केल्यावर भात बाहेर येतो. तिघेही कावळ्याला म्हणतात, 'तुला खूप भूक लागली आहे. तू हा भात खा'.
कावळा म्हणतो, 'तुम्ही तिघांनी मला मदत केली आहे. आपण चौघे मिळून हा भात खाऊ'. ज्याचे श्रेय त्याला देण्याचा हा गुण फारच महत्त्वाचा आहे. ह्या गोष्टीतून साचीने सहकार्य आणि कृतज्ञता ही मूल्ये अधोरेखित केली आहेत. गोष्टीच्या शेवटी तिने तात्पर्य सांगितले आहे, 'अजूनही प्राणिमात्रांत मानवता जिवंत आहे'.
'राधिका बनली लेखिका' ह्या कथेची नायिका राधिका लेखिका बनली, पण खूप उशिरा. एकवीस वर्षांची झाल्यावर.
साचीने ह्या गोष्टीचे तात्पर्य सांगितले आहे, 'आपण मुलांना लहानपणी त्यांना जे बनायचं ते समजावून सांगितले, तर ते मोठेपणी हवं ते बनून दाखवू शकतात'. दहा वर्षांच्या मुलीची ही दूरदृष्टी लक्षात घेण्यासारखी आहे. ह्या गोष्टीच्या माध्यमातून साचीने आपल्या अपेक्षा पाल्यांवर लादणा-या पालकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे.
'वाईट काम केले की शिक्षा मिळते' ह्या गोष्टीत एक गाढव आहे आणि गाढवासारखा वागणारा त्याचा मालक आहे, मनोज. दोघेही खोडकर. दोघांनाही त्यांच्या दुर्गुणांची शिक्षा मिळते. गोष्टीच्या शीर्षकातच गोष्टीचे तात्पर्य आले आहे.
'खोडकर गोपाळ' ह्या गोष्टीचा नायक गोपाळ, जादूगाराकडून जादू शिकण्याचा प्रयत्न करतो. अर्धवट ज्ञानाच्या बळावर जादूचा प्रयोग करून काकूचे नुकसान करतो. त्याचे बाबा त्याच्यावर रागावतात.
साचीने ह्या गोष्टीचे तात्पर्य सांगितले आहे, दुसर्यांचे नुकसान करू नये.
प्राण्यांनाही समज असते, हा संदेश देणारी 'आजोबा, टीना आणि टॉमी' ही कथा मुळातून वाचण्यासारखी आहे. गोष्टीतला टॉमी कुत्रा अतिशय आज्ञाधारक आहे.
'उंदीर आणि त्याची पिलं' ह्या गोष्टीतली उंदराची पिलं लबाड आहेत. त्यांना दूध प्यायला नको आहे, पण चॉकलेट खायला आवडते. ही पिलं पावभाजीसुद्धा खातात. लेखिकेच्या सगळ्या आवडीनिवडी ह्या पिलांनी उचलल्या आहेत, असे दिसते. गोष्टीचे तात्पर्य आहे, खोटं कधीच बोलू नये.
'भांडण्यापेक्षा समजावून सांगणे सोपे आहे' हा संस्कार बिंबविणा-या 'बीणाचं पत्र' ह्या गोष्टीत दोन मैत्रिणी आहेत, बीणा आणि मीना. एके दिवशी दोघीत भांडण झाले. भांडणाचा विषय होता, तुझे हस्ताक्षर चांगले का माझे चांगले. चूक लक्षात आल्यावर बीणाला पश्चात्ताप झाला. तिने मीनाला माफीचे पत्र लिहून तिच्या आजोबांकडे दिले. त्यांनाही वाईट वाटले. त्यांनी दोघींचीही समजूत घातली. दोघीही भांडण मिटवून खेळू लागल्या. एकमेकींना मदत करू लागल्या. चूक वेळीच लक्षात येणे आणि स्वतःला सुधारून घेणे महत्त्वाचे! ह्या गोष्टीत एक प्रकारची सहजता आणि साधेपणा आहे.
'शेजा-यांची आठवण ठेवून त्यांना मदत करावी', अशी शिकवण देणारी ह्या पुस्तकातील बगळा आणि बेडूक ह्या मित्रांची गोष्ट अफलातून आहे! एका नदीकिनारी एक बगळा आणि त्याचे काही बेडूक-मित्र राहत होते. उन्हाळ्यात ती नदी आटली. बगळा सहकुटुंब उडून दुसर्या नदीकिनारी गेला. त्याला आपल्या बेडूक मित्रांची आठवण येऊ लागली. बगळा पुन्हा जाऊन आपल्या मित्रांना पाठीवर बसवून घेऊन येतो. पाणीदार नदीत सगळे मित्र आनंदाने राहू लागले. साचीची ही मुक्या जीवांची गोष्ट संवेदनशीलता शिकवून जाते. आनंददायी सहजीवनाचा संदेश देऊन जाते.
'अति इच्छा आणि हाव आपणास मूर्ख बनवितात' हा तात्पर्यार्थ सांगणारी दहावी आणि शेवटची कथा मिडास राजाच्या ग्रीक कथेशी मिळतीजुळती आहे. ह्या संग्रहातील सर्वच कथा ह्या संस्कारकथा आहेत. दहापैकी पाच कथा ह्या पशुपक्ष्यांच्या कथा आहेत. हे सगळे पशुपक्षी मानवासारखे वागतात आणि बोलतात. साचीने ह्या कथांमधून आपले अव्याज बालभावविश्व आणि अनुभवविश्व अतिशय प्रांजळपणे चितारले आहे. सुदैवाने ह्या निष्पाप बालमनावर अजून ह्या मतलबी जगाच्या कटू अनुभवाचा एकही ओरखडा उमटलेला नाही. त्यामुळे ह्या कथा आणि त्यातील पात्रे अतिशय निष्पाप, संवेदनशील, समजूतदार आणि परोपकारी अशी आहेत. ह्या पात्रांना खोटारडेपणाचा, अतिरेकाचा, भांडखोरपणाचा आणि हव्यासाचा तिटकारा आहे.
साचीच्या लेखनावरून काही निष्कर्ष नोंदविता येतील:
कुटुंबातील वातावरणात जर वाचनसंस्कृती आणि लेखनसंस्कृती पक्की रुजली असेल, तर पुढच्या पिढीवर आपोआपच चांगले संस्कार होतात. त्यातून चांगल्या गोष्टी रुजून, उमलून येतात. त्यासाठी मुद्दाम ओरड करण्याची गरजच पडत नाही.
साचीच्या गोष्टींमध्ये आजोबा हे एक महत्त्वाचे पात्र आहे. हे आजोबा नातवाचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. भांड परिवारातील निकोप आणि स्नेहशील वातावरणाचा हा परिणाम आहे, असे वाटते.
साचीच्या आत्याबाई धारा भांड मालुंजकर यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केली आहे.
बाबा भांड यांनी सहावीत असताना १९६२ साली 'वहीतलं बालपण' लिहिलं होतं.
धारा भांड यांनी शैक्षणिक जीवनातच १९९४ साली 'टिटुडू' लिहिला होता. त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता.
साचीची आत्तेबहीण पालवी मालुंजकर हिचे सातवीत असताना 'सर्जक पालवी' (२०२०) हे पुस्तक प्रकाशित झाले.
आता साचीने तिसरी-चौथीत असतानाच ह्या गोष्टी लिहून आणि त्याचे सुंदर पुस्तक प्रकाशित करून नवीनच विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याबद्दल साचीचे करावे तितके कौतुक कमीच आहे!
'डिक्टेशन' देऊन लेखनिकाकडून लिहून घ्यायला जो आत्मविश्वास लागतो, तो आत्मविश्वास साचीच्या ठायी नक्कीच आहे!
साचीच्या ह्या १० गोष्टी म्हणजे साकेतच्या शिवारातील अर्धोन्मीलित अशा १० कलिका आहेत. ह्या १० गोष्टी म्हणजे नीतिमूल्यांचे संस्कार रुजविणा-या उत्तम अशा बोधकथा आहेत. आपल्या 'ओरिजिनल' लेखनाबाबत साची कमालीची दक्ष असल्यामुळे तिने आपल्या लेखनाचे पुनर्लेखन केले नाही, त्यावर मुद्दाम कलाकुसर करण्यासाठी संपादकीय संस्कार केलेले नाहीत किंवा इतरांनाही ते करू दिले नाहीत. त्यामुळे ह्या लेखनाची कोवळीक टिकून आहे. साचीने हे पुस्तक अतिशय कृतज्ञतापूर्वक आपल्या आबूंना अर्पण केले आहे. भांड परिवाराची सर्जनशीलतेची परंपरा साची निष्ठेने पुढे चालवील, असा विश्वास वाटतो. त्यासाठी तिला अनेकोत्तम आशीर्वाद!
'साचीच्या गोष्टी' (बालकथासंग्रह)
लेखिका : कु. साची साकेत भांड
मुखपृष्ठ, आतील चित्रे : सरदार जाधव
प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद.
पृष्ठे ३२ (आर्ट पेपरवर रंगीत छपाई)
किंमत रु. १००
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा