नितळ प्रेमाच्या वाचनीय कहाण्या डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक कर्तबगार स्त्री असते. मग ती आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, प्रेयसी असेल, मैत्रीण असेल, नात्यातली असेल किंवा नात्यापलीकडची असेल. अशाच काही कर्तबगार स्त्रीपुरुषांच्या नितळ प्रेमाच्या प्रेरणादायी कहाण्या लिहिल्या आहेत पुणे येथील नामवंत कवयित्री-लेखिका अंजली कुलकर्णी यांनी. 'प्रेम' हा शब्द उच्चारताच सामान्यतः चंदेरी पडद्यावरच्या प्रेमकथाच नजरेसमोर येतात, पण 'ह्या' दोन असामान्य व्यक्तींमधील स्नेहसंबंधांच्या आणि प्रगल्भ प्रेमाच्या कहाण्या आहेत. सदरलेखनातून आधीच वाचकांपर्यंत पोहोचलेल्या ह्या कहाण्या प्रकाशित केल्या आहेत पुण्यातील गोल्डनपेज पब्लिकेशनने. पुस्तकाचे शीर्षक आहे 'नितळ प्रेमाच्या कहाण्या'.

ह्या पुस्तकरूपी मालेत रंगीत गंधित अशी ३२ प्रीतफुले अलवारपणे गुंफलेली आहेत. यातील प्रेमाच्या काही कहाण्या राष्ट्रीय स्तरावरच्या आहेत, तशाच काही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आहेत. काही आपल्या परिचयातील आहेत, तर काही आपल्या ज्ञानात भर घालणा-या आहेत. राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, संशोधन, चित्रपट आणि परिवर्तनवादी चळवळींतील नामांकित स्त्रीपुरुषांच्या उज्ज्वल आणि उदात्त प्रेमाच्या ह्या नेत्रदीपक कहाण्या आहेत.

प्रेमाचा परीसस्पर्श झालेल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या ह्या आदर्श प्रेमकथा आहेत. काळाच्या भाळावर आपल्या कर्तृत्वाची अमीट नाममुद्रा उमटवणाऱ्या महनीय व्यक्तींच्या ह्या कहाण्या आहेत.

परस्परांसाठी प्रेरक आणि पूरक ठरलेल्या महात्म्यांच्या ह्या ऊर्जादायी कहाण्या आहेत.

सावित्रीबाई आणि जोतिबा, कस्तुरबा आणि गांधीजी, रमाबाई व माई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या भारतासाठी ललामभूत ठरलेल्या जोडप्यांनी आपल्या देशाचे भविष्य घडविले. यांनी आपल्या वैयक्तिक दु:खांवर मात करून जगाचे दु:ख कमी करण्यासाठी आयुष्य समर्पित केले. यांचे परस्परांशी असलेले तादात्म्य लेखिकेने फारच छान वर्णन केले आहे. ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या पत्नी शीलवती ह्या मूळच्या एडिथ. परदेशस्थ. शीलवतीबाईंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत केतकरांना जी साथ दिली, त्याला तोड नाही.

मादाम कामा आणि वीर सावरकर हा लेख उत्कंठावर्धक आहे. रुस्तुम कामा यांच्याशी सूर न जुळल्यामुळे मादाम कामा यांनी घटस्फोट घेऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. पॅरिसमधील मादाम कामांचे घर म्हणजे क्रांतिकारकांचे केंद्र बनले होते. सावरकरांना अटक झाली, तेव्हा कामांनी सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. सावरकर आणि मादाम कामा यांचं बंधू भगिनीवत जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं होतं. (पृष्ठ ३३)

पु. ल. देशपांडे यांना त्यांच्या पत्नीची, सुनीताबाई नावाच्या एका धारदार बुद्धिमत्तेच्या प्रेमिकेची तेवढीच समृद्ध साथ मिळाली. पुलंच्या यशात सुनीताबाईंची सावधानता आणि शिस्त यांचे योगदान महत्त्वाचे आहे. पुलंसोबतचे सुनीताबाईंचे सहजीवन सखी, सचिव, सहचारिणी अशा तिहेरी भूमिकेतून फुलत गेले.

समाजसुधारक डॉ. विठ्ठल रामजी शिंदे आणि प्रज्ञावंत कृष्णाबाई केळवकर यांच्यात तरल मैत्री होती, पण त्यांचा विवाह होऊ शकला नाही. दोघांनीही एकमेकांना सामाजिक कार्यात भरपूर साथ दिली. दोघांची ही अनुच्चारित, उदासरम्य प्रेमकहाणी वाचकांनाही अस्वस्थ करून जाते. कवी नारायण सुर्वे मास्तर आणि कृष्णाबाई सेविका यांच्या सफल प्रेमाची कहाणी एका शाळेत फुलली. समदु:खी, एकटे आणि एकाकी असलेल्या ह्या दोन जीवांच्या लग्नात कविवर्य कुसुमाग्रज यांनी पालकत्व निभावले. ह्या महाकवीचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला, त्या वेळी कृष्णाबाईंनी आपले मंगळसूत्र विकून पैसे दिले होते. कृष्णाबाईंनी सुर्व्यांना सावलीसारखी साथ दिली. त्यांनी आपल्या आत्मकथनाचे शीर्षक 'मास्तरांची सावली' हेच दिले होते. 

भारतीय चित्रकलेला एक अत्यंत वेगळं परिमाण बहाल करून भारतीय चित्रकलेच्या वैभवात भर घालणारी अल्पायुषी चित्रकर्ती अमृता शेरगील आणि तिचा प्रियकर - पती व्हिक्टर एगन यांची प्रेमकहाणी तर जगावेगळी आहे. यांच्यातील समंजस प्रीतीच्या सामर्थ्यानं अमृतातल्या सर्जनशीलतेला बळ दिलं. पंडिता रमाबाई आणि बिपिन बिहारीदास मेधावी यांचा १८८०मध्ये झालेला विवाह आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि आंतरप्रांतीय होता. त्यामुळे त्यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. तरी त्यांनी परस्परांना विचारांच्या पातळीवर अतिशय समृद्ध केले. 

शोमैन राज कपूर आणि देखणी, प्रतिभावान अभिनेत्री नर्गिस ही जोडी म्हणजे चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न होते. या संवेदनशील जोडीत उत्कट असं गहिरं झपाटलेपण होतं. तो तिच्या आयुष्यातला संपूर्ण आनंद, संपूर्ण समाधान आणि एक मोठं प्रेरणास्थान होता. त्यामुळे त्याच्या सहवासात तिच्या अभिनयाला वेगळीच खुमारी चढली होती. ही प्रेमकहाणी फार काळ टिकली नसली, तरी या जोडीने चित्रपट चाहत्यांना १६ अनमोल चित्रपटांची देणगी दिली आहे. 

बाया कर्वे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे या जोडीने समाजसुधारणेची सुरुवात स्वतःपासूनच केली होती. महर्षी कर्वे यांनी आनंदीबाई ह्या तेवीस वर्षीय विधवेशी विवाह केला. ह्या आनंदीबाईंना 'बाया कर्वे' म्हणून ओळखले जाते. ह्या दांपत्याने सनातन्यांच्या विरोधाचा सामना करत समाजसुधारणेचे आणि शिक्षणप्रसाराचे कार्य चालूच ठेवले. समाजाला आधुनिकतेचा मार्ग दाखविणारे हे दांपत्य आणि त्यांचे कार्य आजही आदरणीय आहे.

अमृता प्रीतम, इमरोज आणि साहिर लुधियानवी यांच्या प्रेमाचा त्रिकोण वाचून, ऐकून अनेकांना माहीत आहे. अमृता साहिरच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती, पण साहिरने तिची फारशी दखल घेतली नाही. अमृताच्या एकलेपणाचा कोश इमरोज ह्या महान चित्रकाराने तोडला. पुढची ४० वर्षे त्यांनी प्रेमातल्या अभिन्नतेचा, अद्वैताचा अनुभव घेतला आणि परस्परांना समृद्ध केलं. 

कमला, एडविना आणि पंडित नेहरू हाही असाच एक उदात्त प्रेमाचा त्रिकोण होता. नेहरूंना प्रिय पत्नी कमलाचा सहवास केवळ २१ वर्षे लाभला. नेहरूंनी उर्वरित आयुष्य देशासाठी समर्पित केले. लॉर्ड माऊंटबैटन हे स्वातंत्र्यप्रक्रियेचा आराखडा तयार करण्यासाठी पत्नी एडविनासह भारतात आले होते. नेहरू आणि एडविना यांच्यात निरपेक्ष बौद्धिक आणि आत्मिक मैत्रीचे नाते निर्माण झाले. 

यावर लेखिकेने 'अत्यंत प्रखर बुद्धिमत्ता, प्रतिभा, प्रज्ञा असणाऱ्या आणि एखादं फार मोठं कार्य शिरावर घेतलेल्या व्यक्तींनाही वैयक्तिक आयुष्यात ऊबदार स्नेहाची, नितळ प्रेमाची गरज असतेच' असे भाष्य केले आहे. 

सरलादेवी राय आणि नामदार गोखले यांच्यात भाषाभेद, प्रांतभेद आणि लिंगभेदाच्या पलीकडे पोहोचलेले एक सुंदर, प्रगल्भ आणि प्रेरक मैत्र निर्माण झाले होते. त्यांच्यात सामाजिक व राजकीय सुधारणांवर चर्चा होत. वैचारिकता आणि भावनाशीलतेच्या भक्कम पायावर हे नाते उभे होते. सरलादेवींच्या शब्दाखातर ना. गोखले यांनी आपलं जानवं काढून टाकलं होतं. दोघांनीही कधीच संयमाची भिंत ओलांडली नाही. गोखल्यांच्या पश्चात सरलादेवींनी कोलकात्यात गोखले मेमोरियल स्कूलची स्थापना केली होती. मैत्रीच्या सुंदर स्मृतींना जपण्यासाठी केलेली ही अप्रतिम उत्कट कृती किती विलक्षण! किती आगळीवेगळी! (पृष्ठ क्र. ९५)

कलादृष्टी नि सौंदर्यदृष्टी लाभलेला चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्त आणि भावमधुर, बोलका चेहरा असलेली प्रगल्भ अभिनेत्री वहिदा रहमान त्यांच्यातील निखळ मैत्रीने परस्परांना ऊर्जा दिली. पत्नी गीता दत्तशी झालेल्या विसंवादामुळे गुरुदत्त अस्वस्थ असत. 'प्यासा' ह्या चित्रपटापासून ह्या दोन उमद्या कलाकारांत गहिरं नातं निर्माण झालं. गुरुदत्त तिचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड बनले. एका विशिष्ट वळणावर हे नातं संपुष्टात आलं, तरी गुरुदत्त - वहिदा ह्या एखाद्या स्वप्नासारखं सुंदर नात्याचं नाव त्यांच्या चाहत्यांच्या मनात रुणझुणत राहिलं. 

मेहरुन्निसा आणि हमीद दलवाई हा सुधारणावादी मुस्लीम समाजातील इतरेतर द्वंद्व समास मानला जातो. लोकशाही समाजवादी कार्यकर्ते, नेते हमीद दलवाई यांनी राष्ट्र सेवा दल आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून अफाट कार्य केले. देव न मानणारा देवमाणूस अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या ह्या कार्याच्या पाठीमागे मेहरुन्निसा यांचा त्याग आणि पाठबळ होते. हमीद दलवाई ह्या द्रष्ट्या सुधारकाचं वादळी समाजजीवन मेहरुन्निसा नावाच्या सुकाणूने नीटपणे तीराला नेलं. (पृष्ठ क्र. १०५) 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यात वेणूताईंना अनन्यसाधारण स्थान होते. सह्याद्रीएवढ्या उंचीच्या ह्या महापुरुषाला

वेणूताईंनी सर्वतोपरी साथ दिली. यशवंतरावांच्या सहवासात वेणूताईंच्या व्यक्तिमत्त्वाला सुंदर पैलू पडले. हे जोडपे म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे.

तरल, संवेदनशील, प्रतिभावंत कवी अनिल आणि असामान्य बुद्धी- प्रतिभेच्या विदुषी कुसुमावती देशपांडे ही अक्षरयात्री जोडी म्हणजे मराठी साहित्यविश्वातील 'कुसुमानिल'. त्यांनी परस्परांना विलक्षण ऊर्जा पुरविली. ह्या जोडीने आपल्या वैवाहिक जीवनात बौद्धिक सहजीवनाची मौलिक भर घालत परस्परांचे जीवन उजळून टाकले. अनिलांनी कुसुमावतीबाईंचे विदुषीपण तितक्याच ममतेनं सांभाळलं, जोपासलं, फुलवलं. हे दोघेही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, हा दुर्मीळ योग म्हटला पाहिजे.ओम

शोकसम्राज्ञी, कवयित्री मीनाकुमारी ही बालपणापासून माया, प्रेम, जिव्हाळा यांसाठी तडफडत होती. लेखक-दिग्दर्शक - निर्माता कमाल अमरोहीच्या रूपाने तिला तिचं प्रेम मिळालं. तो निर्माता दिग्दर्शक म्हणून ग्रेट होता. कलाकार म्हणून ती ग्रेट होती. दोघांचं लग्नही झालं, पण दोन आत्ममग्न, मनस्वी कलाकार परस्परांना समजून घेऊ शकले नाहीत. कमाल - मीनानं 'बैजू बावरा' , 'पाकीजा' सारखे एकापेक्षा एक सुंदर चित्रपट दिले, हीच त्यांच्या चाहत्यांसाठी समाधानाची बाब!

याशिवाय अवंतिकाबाई आणि बबनराव गोखले, सीमॉन द बोव्हा आणि जॉं पॉल सार्त्र, कमलादेवी आणि हरींद्रनाथ चटोपाध्याय, सुधाताई आणि आबा करमरकर, कमल आणि किशाभाऊ भागवत, पर्ल बक आणि रिचर्ड वॉल्श, इस्मत चुगताई आणि सहादत हसन मंटो, सलीना आणि अन्वर हुसेन, कॉरेटा स्कॉट आणि मार्टिन ल्युथर किंग, मिर्था बार्लात आणि फिडेल कॅस्ट्रो यांच्याही नितळ प्रेमाच्या कहाण्या मुळातून वाचाव्यात, इतक्या वाचनीय उतरल्या आहेत.

पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत शेवटी 'अर्नेस्ट हेमिंग्वे आणि त्याच्या चार बायका' असे शीर्षक छापले आहे, पण ह्या शीर्षकाचा लेख पुस्तकात नाही. अनवधानाने राहून गेला असावा, असे दिसते.

प्रेम, जिव्हाळा, मैत्री ही गोष्ट प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. ती कोणाला मिळते, तर कोणाला मिळत नाही. ज्यांना मिळते, त्यांचे आयुष्य उजळून निघते. ज्यांना मिळत नाही, त्यांचे आयुष्य काळवंडून जाते. अशा उजळून निघालेल्या आणि काळवंडून गेलेल्या, दोन्ही प्रकारच्या आयुष्यांच्या ह्या कहाण्या आहेत. विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचे डोंगर निर्माण करणाऱ्या प्रेमी जोडप्यांच्या ह्या प्रेमकथा जगाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांत लिहिल्या गेल्या आहेत. प्रेमापोटी परस्परांत विसर्जित झालेल्या आणि 'प्रेममय' बनलेल्या जीवनाच्या ह्या कहाण्या वाचकालाही समृद्ध करतात. उच्च स्तरावर जीवन जगणाऱ्या माणसांचे प्रेमही तितकेच उच्च, उदात्त आणि उत्तुंग असते, हे अधोरेखित करणा-या ह्या कहाण्या आहेत. 

नितळ प्रेमाच्या कहाण्या (लेखसंग्रह)

लेखिका : अंजली कुलकर्णी

प्रकाशक : गोल्डनपेज पब्लिकेशन, पुणे.

मुखपृष्ठ : प्रदीप खेतमर, पुणे.

पृष्ठे १४४ किंमत रु. २००


sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या