संतांची शिकवण मानवी जीवनातील ऐहिक व पारमार्थिक विकासासाठी आवश्यक .......डाॅ. विजय लाड


नांदेड ः दि.17 ः मानवी जीवनात ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्षासाठी संत वाङ्मयाचा अभ्यास अत्यंत आवश्यक असून तो लहान वयापासुनच केला पाहीजे असे मत डाॅ. विजय लाड यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्यावतीने मसापच्या पटवर्धन सभागृहात स्व. डाॅ. निर्मल कुमार फडकुले स्मृति, "संत साहित्य पुरस्कार" अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ. श्री रवींद्र शोभणे यांचे शुभहस्ते, म.सा.क.प्र. सभेचे अध्यक्ष डाॅ. सचिन इटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि म.सा.प. पुणे चे अध्यक्ष प्रा. डाॅॅ. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमात दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे संचालक डाॅ.विजय लाड यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

सर्वच संतांनी त्यांचे वाङ्मय सामान्य जनांच्या शाश्वत सुखासाठी शब्दबद्ध केले, ते त्यांच्या लहान वयातच हे विशेष होय. दुर्दैवाने आता शाळा,महाविद्यालयातील पिढीला संत साहित्याचा अभ्यास हे म्हातारपणीचे काम वाटते तर ज्येष्ठांना वय संपत आल्यावर आता या अभ्यासाचा काय उपयोग असा प्रश्न पडतो. ही मानसिकता बदलून मानव जातीचा सर्वंकष विकास आणि मानवी कल्याणाचा मार्ग म्हणून संताच्या साहित्याचा विचक्षण पद्धतिने अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत डाॅ विजय लाड यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन म.सा.क.प्र. सभेचे कार्याध्यक्ष उद्धव कानडे यांनी केले. या पुरस्कार सोहळ्यास समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, समर्थ भक्तांची विशेष उपस्थिती होती.



टिप्पण्या