डॉ. सुरेश सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान


पुणे, दि. २१

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार पुणे येथे आयोजित एका विशेष समारंभात ज्येष्ठ साहित्यिक अनंत भावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी विचारपीठावर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, ज्येष्ठ लेखिका डॉ. मंदा खांडगे, डॉ. दासू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी कवी दासू वैद्य यांना ग. ह. पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

आरंभी कवयित्री आश्लेषा महाजन यांनी ग. ह. पाटील यांचे 'देवा, तुझे किती सुंदर आकाश' हे गीत सादर केले.  श्री. राजन लाखे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याचा अहवाल सादर केला. डॉ. मंदा खांडगे यांनी ग. ह. पाटील यांच्या लेखनकार्याची माहिती देऊन डॉ. सुरेश सावंत आणि दासू वैद्य यांच्या लेखनकर्तृत्वाचा गौरव केला.

डॉ. सुरेश सावंत यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन सौ. सीमा चव्हाण यांनी केले. दासू वैद्य यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन भारत सुरसे यांनी केले.

डॉ. सुरेश सावंत यांनी आपल्या भाषणात अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बालकुमार वाचकांना सर्जनशील लेखनाकडे कसे तयार केले, याची माहिती दिली. बालसाहित्याच्या समृद्ध परंपरेचा आढावा घेत बालसाहित्याचा उपेक्षेची कारणमीमांसा केली. संत ज्ञानेश्वर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सानेगुरुजी यांच्या वचनांचे दाखले देत  बालसाहित्याची आवश्यकता प्रतिपादन केली. बालसाहित्य चळवळीच्या सशक्त वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.

दासू वैद्य यांनी ग. ह. पाटील पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करत आपली कविता सादर केली. डॉ. न. म. जोशी आणि अनंत भावे यांनी आपल्या भाषणात डॉ. सावंत आणि वैद्य यांनी बालसाहित्यात मोलाची भर घातल्याबद्दल दोघांचाही गौरव केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जगताप यांनी केले. कविता मेहेंदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे कार्यवाह डॉ. दिलीप गरूड, बी. आर. माडगूळकर, विश्वनाथ भुजबळ, मीरा शिंदे, विनोद वाघ, विलास रासकर यांनी विशेष परिश्रम घेतले. 

या वेळी ज्येष्ठ साहित्यिक ल. म. कडू, अंजली कुलकर्णी, डॉ. वर्षा तोडमल, शिवाजीराव चाळक, विश्वास वसेकर, तुकाराम जाधव चाकणकर, आश्लेषा महाजन, प्रशांत गौतम, ज. गं. फगरे, नीलिमा गुंडी, संगीता बर्वे, संगीता पुराणिक, रश्मी गुजराथी, रूपाली अवचरे, सुरेखा कटारिया, बाळकृष्ण बाचल, अरविंद गाडेकर, लता पाडेकर, सौरभ आणि डॉ. संकेत सावंत, सौ. रूपाली आणि डॉ. तनुश्री सावंत  यांच्यासह साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या