*देशातील शेतकरी व कामगारांच्या हक्कासाठी सहकार्य करू - शरद पवार*

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांनी सार्वजनिक उद्योग निर्माण करून कामगारांना कायमचे रोजगार मिळवून दिले, तर सध्याचे केंद्र सरकारने आऊटसोर्सिंग करून सार्वजनिक उद्योग विकण्याचे धोरण आणून बेरोजगार निर्माण केले आहे. त्यामुळे आपल्या हक्कासाठी शेतकरी व कामगारांनी एकजूट करून मोदी सरकारला हटवले पाहिजे. शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या हक्कासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. असे स्पष्ट उद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंद मजदूर सभेच्या उद्घाटन प्रसंगी जाहीर सभेत काढले. 

हिंद मजूर सभा महाराष्ट्र कौन्सिलच्या वतीने २६ व २७ ऑगस्ट २०२३ रोजी कोल्हापूर येथील सैनिक दरबार हॉलमध्ये ३२ वे त्रैवार्षिक अधिवेशन हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. सुरुवातीला हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलच्या वतीने शरद पवार, हरभजन सिंग सिद्धू व डॉ. डी . एल. कराड यांचा शाल, सन्मान चिन्ह व मोठा पुष्पहार देऊन भव्य स्वागत करण्यात आले. या अधिवेशनात १०७ कामगार संघटनांचे २५०० कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. शरद पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या काळात रोजगार निर्माण झाले तर भाजपच्या राजवटीत रोजगार घालवण्याचे काम चालू आहे. देशाच्या प्रगतीमध्ये शेतकरी व कामगारांचे मोठे योगदान आहे. कामगारांनी संघर्ष करून कामगार हिताचे बनवलेले कायदे सध्याचे सरकार मोडीत काढीत आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात संघर्ष करावा लागेल. त्यासाठी सर्व शेतकरी व कामगारांनी एकत्रित येऊन लढ्यासाठी तयार रहावे. शेतकरी व कामगारांच्या हक्कासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू यांनी आपल्या मार्गदर्शनात भाषणात सांगितले की, सध्याचे केंद्रातील सरकार सरकारी उद्योग विकून त्याचे खाजगीकरण करीत आहे. त्यामुळे मालकांचा फायदा होत असून, कामगारांचे शोषण होत आहे. कंत्राटी कामगारांना किमान वेतन देखील दिले जात नाही. जर हे सरकार पुन्हा आले तर कामगारांना युनियन बनवणे देखील कठीण जाईल. संप केला तर नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल. लोकसंख्या व बेरोजगारीत जगात भारत प्रथम क्रमांकावर आहे तर आपल्या देशामध्ये प्रचंड महागाई वाढली आहे. येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये शेतकरी व कामगार विरोधी सरकार घालविण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे. महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष व सीटूचे नेते डॉ.डी. एल. कराड यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाविरुद्ध कडाडून टीका केली. देशातील सर्व शेतकरी कष्टकरी व असंघटित कामगारांनी एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी या सरकारच्या धोरणाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे.

हिंद मजदूर महाराष्ट्र कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात हिंद मजदूर सभेच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेऊन सांगितले की, कोरोना काळात संघटनेने अनेकांना विविध स्वरूपात मदत केली आहे . नुसी कामगारांचे प्रॉव्हिडंट फंडाचे मिळत नसलेले १०० कोटी रुपये डॉ. शांती पटेल यांच्या पुढाकाराने शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून मिळून दिले. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे जनरल सेक्रेटरी साथी वेणू नायर यांनी आपल्या तडाखेबाज भाषणात रेल्वेतल्या खाजगीकरणाविरुद्ध कामगारांनी आवाज उठविला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाविरुद्ध तीव्र संघर्ष केला जाईल. दुसऱ्या दिवशी प्रतिनिधींचे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनामध्ये चार लेबर कोड, जुनी पेन्शन योजना, महिला धोरण, असंघटित कामगार, अंगणवाडी, आशा कामगार व घरेलू कामगार अशा विविध विषयावरील १२ ठराव करण्यात आले. या ठरावावर सविस्तर चर्चा होऊन ते अमलात आणण्याचाही निर्णय झाला. या अधिवेशनात हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवृत्ती धुमाळ, जनरल सेक्रेटरी पदावर संजय वढावकर तर खजिनदार पदावर विकास गुप्ते यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्याचे अधिकार ठराव करून सभागृहांनी या नेत्यांना दिले. पहिल्या दिवशी हॉटेल रेडियंट मध्ये सभेचे कार्याध्यक्ष सुधाकर अपराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणीची मिटिंग होऊन सर्वांचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिल निर्मित संजय वढावकर व संज्योत वढावकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला, विजय सोमा सावंत यांनी लेखन व दिग्दर्शन केलेला, तसेच मारुती विश्वासराव यांनी सहाय्य केलेला हिंद मजूर सभेचा ऐतिहासिक दस्तऐवज असलेला माहितीपट दाखविण्यात आला.

स्वागतपर भाषण साखर कामगारांचे नेते साथी तात्यासाहेब काळे यांनी केले तर आभार एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मानले. व्यासपीठावर वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे नेते साथी जे.आर.भोसले, नॅशनल रेल्वे मेन्स युनियनचे नेते साथी वेणू नायर, पी.जे. शिंदे, अरुण मनोरे, एसटी कामगारांचे नेते साथी हनुमंत ताटे,संदीप शिंदे , कोळसा कामगारांचे नेते शिवकुमार यादव, नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर, मेरीटाईम्स युनियनचे अध्यक्ष कॅप्टन तुषार प्रधान, इंडिया सेक्युरिटी प्रेसचे नेते जगदीश गोडसे, राजेश टाकेकर, मुन्सिपल मजदूर युनियनचे नेते अशोक जाधव, वामन कविस्कर, त्रिशीला कांबळे, गोदी कामगारांचे नेते विद्याधर राणे, दत्ता खेसे, मारुती विश्वासराव, व्यंकटस्वामी, माथाडी कामगारांचे नेते निवृत्ती धुमाळ, मधुकर भोंडवे, हमाल पंचायत संघटनेचे नेते विकास मगदूम, सी.बी.पाटील, उत्तम पाटील आदी युनियन पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

आपला 

मारुती विश्वासराव 

प्रसिद्धीप्रमुख

टिप्पण्या